गाडगे महाराज जयंती - जीवनात बहुमोल ठरेल असा ‘गाडगेबाबांचा दशसूत्री संदेश’

गाडगे महाराज जयंती - जीवनात बहुमोल ठरेल असा ‘गाडगेबाबांचा दशसूत्री संदेश’

महाराष्ट्रातील थोर संत, समाजसुधारक आणि कीर्तनकार गाडगेबाबा (Gadgebaba). ज्यांची साधी राहणी आणि उच्च विचारसरणी होती.

  • Share this:

अमरावती, 23 फेब्रुवारी : संत गाडगेबाबा यांची आज जयंती. महाराष्ट्रातील थोर संत, समाजसुधारक आणि कीर्तनकार. 23 फेब्रुवारी, 1876 मध्ये महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात अंजनगावात त्यांचा जन्म झाला आहे. धोबी कुटुंबात जन्मलेले डेबूजी झिंगराजी जानोरकर पुढे गाडगेबाबा म्हणून ओळखले जाऊ लागले.

साधी राहणी

धर्मशाळेजवळील एका झाडाखाली त्यांनी आपलं पूर्ण आयुष्य घालवलं. डोक्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका हातात झाडू, दुसऱ्या हातात मडकं, फाटलेली चादर हीच त्यांची संपत्ती होती.

समाजसेवा हेच लक्ष्य

अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचं उच्चाटन हेच गाडगेबाबांचं ध्येय होतं. दुर्बल, अनाथ, अपंगांची ते नेहमी सेवा करत. संत गाडगेबाबा जिथं कुठे जायचे तिथंला रस्ता स्वच्छ करण्याचं काम हाती घ्यायचे. गावातील लोक त्यांना पैसे द्यायचा ज्याचा उपयोग त्यांनी समाजविकासासाठी केला. या पैशांतून त्यांनी गावांमध्ये शाळा, धर्मशाळा, हॉस्पिटल आणि जनावरांसाठी निवारा बांधला.

अज्ञान, अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न

गाडगेबाबा शिकलेले नव्हते तरी ते खूप बुद्धिमान होते. त्यांनी समाजाला शिक्षण, स्वच्छतेचं महत्त्व पटवून दिलं. दिवसभर गाव स्वच्छ केल्यानंतर रात्री लोकांचं मन स्वच्छ करण्यासाठी गाडगेबाब कीर्तन करत. कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती करत. अंधश्रद्धा दूर करत, परिश्रम, परोपकार याची शिकवण देत. ‘देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराण, तंत्र-मंत्र, चमत्कार यावर विश्वास ठेवू नका’, अशी त्यांची शिकवण होती. देव दगडात नसून तो माणसांत आहे, हे त्यांनी लोकांच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न केला. मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य म्हणायचं नाही, असे ते म्हणायचे.   

 गाडगेबाबांचा दशसूत्री संदेश

 भुकेलेल्या अन्न द्या

तहानलेल्या पाणी द्या

वस्त्रहीन व्यक्तींना वस्त्र द्या

गरीब मुलांना शिक्षणात मदत करा, प्रत्येक गरीबाला शिक्षण देण्यात योगदान द्या

बेघर असलेल्यांना आसरा द्या

अंध, विकलांग, आजारी व्यक्तींची मदत करा

बेरोजगारांना रोजगार द्या

पशू-पक्षी, मूक प्राण्यांना अभय द्या

गरीब, कमजोर लोकांच्या मुलांच्या लग्नात मदत करा

दुखी आणि निराश लोकांना हिमंत द्या

हाच खरा धर्म आहे आणि हीच खरी ईश्वरभक्ती

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 23, 2020 07:54 AM IST

ताज्या बातम्या