सावधान! कोरोना लशीसाठी डाऊनलोड करू नका CoWIN App; तुमची एक चूक पडेल महागात
कोरोना लशीच्या (Corona vaccine) नोंदणीसाठी सरकारनं CoWIN app तयार केलं आहे. पण हे अॅप डाऊनलोड करू नका असा सल्ला सरकारनंच दिला आहे. यामागे काय कारण आहे वाचा.
नवी दिल्ली, 06 जानेवारी : लवकरच कोरोना लसीकरण (Corona vaccination) मोहीम सुरू होणार आहे. कोरोना लस (Corona vaccine) देण्यासाठी तयारी सुरू आहे. कोरोना लशीसाठी नोंदणी बंधनकारक आहे. यासाठी सरकारनं प्राधान्यक्रम ठरवला आहे. सरकारच्या यादीत नसलेल्यांना जर कोरोना लस घ्यायची असेल तर त्यासाठी CoWIN हे मोबाईल App उपलब्ध करून देण्यात आलं. जिथं तुम्हाला कोरोना लशीसाठी नोंदणी करता येईल. पण हे अॅप डाऊनलोड करू नका असा सल्ला आता केंद्र सरकारनंच दिला आहे.
कोरोना लसीचा साठा, वितरण, पुरवठा आणि नोंदणी सुरळीत व्हावी यासाठी केंद्र सरकारनं CoWIN App तयार केलं. मोबाईलमध्ये हे अॅप उपलब्ध असेल. गुगल प्ले स्टोअरवर आणि अॅप स्टोअरवर हे अॅप मिळेल. तिथं असे काही अॅप उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे काही लोक हे अॅप डाऊनलोड करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण चुकूनही हे अॅप डाऊनलोड करू नका अशा सूचना सरकारनं दिल्या आहेत आणि याचं कारण म्हणजे सरकारनं अद्याप हे अॅप उपलब्ध करून दिलेलंच नाही आहे.
Some apps named "#CoWIN" apparently created by unscrupulous elements to sound similar to upcoming official platform of Government, are on Appstores.
DO NOT download or share personal information on these. #MoHFW Official platform will be adequately publicised on its launch.
CoWIN App च्या नावानं काही बनावट अॅप तयार करण्यात आले आहेत. जे डाऊनलोड केल्यानं तुम्ही फ्रॉडचे शिकार होऊ शकता. तुमची फसवणूक होऊ शकते. याबाबत सरकारनं सावध केलं आहे. त्यामुळे कृपया हे अॅप डाऊनलोड करू नका. सरकारकडून अॅप उपलब्ध झाल्यानंतर सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर याची माहिती दिली जाईल, असंही सरकारनं सांगितलं आहे.
COVID-19 वॅक्सिन ट्रॅकिंग आणि रजिस्ट्रेशन निश्चित करण्यासाठी CoWIN अॅपला 5 मॉड्यूलमध्ये विभागण्यात आलं आहे. ज्यात पहिलं प्रशासनिक मॉड्यूल, दुसरं रजिस्ट्रेशन मॉड्यूल, तिसरं वॅक्सिनेशन मॉड्यूल, चौथं लाभान्वित स्वीकृती मॉड्यूल आणि पाचवं रिपोर्ट मॉड्यूल आहे. जे लोक लसीकरण करू इच्छितात, त्यांना रजिस्ट्रेशन मॉड्यूलअंतर्गत संपूर्ण माहिती द्यावी लागेल. वॅक्सिनेशन मॉड्यूलमध्ये त्यांचा तपशील पडताळला जाईल आणि लाभान्वित स्वीकृती मॉडेल त्यांच्या लसीकरणाबाबत त्यांना एक प्रमाणपत्र पाठवेल.