मुंबई, 25 नोव्हेंबर : गेल्या काही दिवसांत देशातल्या अनेक शहरांमध्ये डेंग्यूचा (Dengue) संसर्ग वाढल्याचं दिसून आलं आहे. विशेषतः लहान मुलांमध्ये डेंग्यूच्या संसर्गाचं प्रमाण अधिक आहे. हा आजार प्रामुख्याने डासांमुळे (Mosquitoes) पसरतो. सध्याचं वातावरण डेंग्यू किंवा झिका व्हायरससारखे गंभीर आजार पसरवणाऱ्या एडिस (Aedes) डासांच्या प्रजननासाठी अनुकूल आहे. डेंग्यूचे वाढते रुग्ण बघता आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रतिबंधक उपाययोजना सुरू केल्या आहेत. नागरिकांनी वैयक्तिक पातळीवरदेखील पुरेशी काळजी घ्यावी, अशी सूचना देण्यात आली आहे. नागरिकांनी डेंग्यूपासून बचावाकरिता पूर्ण बाह्यांचे कपडे परिधान करण्यापासून ते घरात पाणी साचू न देण्यापर्यंत काही मूलभूत गोष्टींचं पालन करणं आवश्यक आहे.
डेंग्यू झाला असेल तर योग्य आणि पोषक आहार, विश्रांती, तसंच काही योगासनं या आजारातून बरं होण्यासाठी मदत करू शकतात. जरी तुम्ही निरोगी असाल तरी भ्रामरी प्राणायामासह मलासन, वज्रासन आणि पश्चिमोत्तानासन यांसारखी योगासनं (Yoga) दररोज केल्यास निश्चित फायदा होईल.
हेही वाचा : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे रुग्णालयात दाखल, मुख्यमंत्र्यांकडून प्रकृतीची चौकशी
वज्रासन (Thunderbolt Pose) : हे आसन करताना प्रथम गुडघ्यावर बसा. त्यानंतर नितंब टाचांवर टेकवा. यावेळी तुमच्या टाचा एकमेकांपासून किचिंत दूर आहेत याची खात्री करा. त्यानंतर हाताचे तळवे मांडीवर ठेवा, पाठीचा कणा ताठ करा आणि समोर पाहा.
मलासन (Garland Pose) : हे आसन करताना सर्वप्रथम हात बाजूला ठेवून सरळ उभे राहा. त्यानंतर नितंब जमिनीच्या दिशेने नेण्यासाठी गुडघे वाकवा आणि ते टाचांवर ठेवा. पाय जमिनीवर सपाट राहतील याकडे लक्ष द्या. (यात तुम्ही तळवे जमिनीवर ठेवू शकता किंवा शक्य असल्यास छातीसमोर जोडू शकता.)
पश्चिमोत्तानासन (Seated Forward Bend) : हे आसन करताना सर्वप्रथम दंडासनात बसावे. यात तुमचे पाय पुढे पसरलेले हवेत. (आवश्यक वाटल्यास तुम्ही गुडघे थोडेसे वाकवू शकता) यानंतर हात वर उचलावेत आणि पाठ सरळ ठेवावी. श्वास सोडून पुढे वाकत आपले हात पायाच्या बोटांपर्यंत न्या आणि बोटं पकडण्याचा प्रयत्न करा. शरीर या स्थितीत किमान 10 सेकंद ठेवा.
भ्रामरी प्राणायाम (Bhramari Pranayam) : तुम्हाला योग्य वाटेल अशा सुखासन, अर्धपद्मासन किंवा पद्मासनात बसा. पाठीचा कणा सरळ करा आणि डोळे बंद करा. दोन्ही हातांचे अंगठे कानाच्या पाळीवर ठेवा. तर्जनी कपाळावर ठेवा. मधलं बोट दोन्ही डोळ्यांच्या मध्यभागी नाकावर ठेवा आणि अनामिका नाकपुडीच्या कोपऱ्यावर ठेवा. प्राणायामाचा हा प्रकार करताना तोंड उघडं राहणार नाही याची काळजी घ्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.