मुंबई, 23 मार्च- सध्याचा ऋतु आंब्याचा, म्हणजेच फळांच्या राजाचा आहे; मात्र लहान-मोठ्या सगळ्यांना आवडणारं आणि सगळ्या ऋतूंमध्ये मिळणारं एक फळ म्हणजे केळं. भारतातच नव्हे, तर विविध देशांमध्ये केळ्यांच्या अनेक जाती पाहायला मिळतात. काही जातींची केळी अगदीच छोटीशी असतात, तर काही जातींची केळी आकारानं मोठी असतात. अर्थात मोठं असलं तरी एका केळ्याचं वजन जास्तीत जास्त 200 ग्रॅमपर्यंत असू शकतं. तीन किलो वजनाचं केळं कधी पाहिलं किंवा खाल्लंय का? या ‘वजनदार’ केळ्याचा एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होतोय.
जगात केळ्यांच्या अनेक जाती पाहायला मिळतात. अगदी भारतातही केळ्यांच्या जातींमधलं वैविध्य पाहता येऊ शकतं. आकार, रंग, चव या बाबतीत प्रत्येक जातीचं केळं वैशिष्ट्यपूर्ण असतं; मात्र सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसणारं केळं तब्बल 3 किलो वजनाचं आहे. इंडोनेशियाच्या जवळ असणाऱ्या पापुआ न्यु गिनी आयलंडवर अशा प्रकारच्या केळ्यांची लागवड केली जाते. सर्वसाधारण केळीची झाडं जितकी उंच असतात, त्याच्या कित्येक पट अधिक उंचीची या केळीची झाडं असतात. नारळाच्या झाडाएवढी या जातीची उंची असते. या झाडावर आलेल्या प्रत्येक केळ्याचं वजन साधारणपणे 3 किलोच्या आसपास असतं.
वाचा-एअर कंडिशनर बसवण्यापूर्वी ही गोष्ट माहिती हवीच, नाही तर कंपनी अशी करते फसवणूक
व्हायरल व्हिडिओमध्ये एक महिला आणि एक पुरुष या केळ्याचा आस्वाद घेताना दिसत आहेत. केळ्याचं उंच झाड व त्यावर लगडलेली केळीही व्हिडिओत दिसत आहेत. त्यानंतर तो पुरुष केळ्याची उंची त्याच्या कोपरापर्यंत असल्याचं व्हिडिओत दाखवतो. या अनोख्या केळ्याचा व्हिडिओ सध्या नेटिझन्समध्ये प्रचंड लोकप्रिय होतोय. हा व्हिडिओ ट्विटरवर अनंत रूपनगुडी यांनी शेअर केलाय. ते 1997 च्या बॅचचे IRAS आहेत. ते रेल्वेमध्ये नोकरी करत असून सध्या चेन्नईत आहेत. त्यांनी शेअर केलेल्या 38 सेकंदांच्या या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. या व्हिडिओला आतापर्यंत 2 हजारांहून जास्त लाइक्स मिळाले आहेत, तर 91 हजाराहून अधिक व्ह्यूज या व्हिडिओला मिळाले आहेत. या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत. अशा प्रकारचं केळं याआधी कधी पाहिलं नसल्याचं अनेकांनी म्हटलंय.
The biggest size of banana is grown in Papua New Guinea islands close to Indonesia. The plantain tree is of the height of a coconut tree and the fruits grow huge. Each banana weighs around 3 kg. pic.twitter.com/33oUfB8ppu
— Ananth Rupanagudi (@Ananth_IRAS) March 22, 2023
अनेक तज्ज्ञांच्या मते, केळं हे पौष्टिक फळ आहे. डोळे, फुफ्फुस, त्वचा आणि हृदय निरोगी ठेवण्यासाठी केळं उपयुक्त असतं. केळ्यात भरपूर पोटॅशियम असतं. त्यामुळे पचन सुधारण्यासाठीही त्याचा उपयोग होतो. केळं हे सुपरफूड मानलं जातं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Lifestyle