विशाल देवकर, प्रतिनिधी
नागपूर, 19 मार्च: G20 परिषद 2023 चं यजमान पद यंदा भारताला लाभलं असून तमाम भारतीयांसाठी ही अभिमानास्पद बाब आहे. 21 आणि 22 मार्चला याच जी-20 अंतर्गत सी-20 च्या उपसमितीच्या बैठका नागपूरमध्ये होणार आहेत. त्यात 20 देशातील पाहुणे नागपूर शहरात येणार असल्याने संपूर्ण शहर सजवण्यात आले आहे. अशातच या देश विदेशातून आलेल्या पाहुण्यांना खास मराठमोळे खाद्य पदार्थ चाखायला मिळणार आहेत. प्रसिद्ध मास्टर शेफ विष्णू मनोहर यांच्यावर विदेशी पाहुण्यांच्या पाहुणचाराची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
तब्बल 97 मेनूंची मेजवानी
'वसुधैव कुटुम्बकम्' या प्रमाणे देश विदेशातून येणाऱ्या परदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी कुठलीही उणीव भासू नये यासाठी सर्वतोपरी तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. जी 20 साठी आलेल्या पाहुण्यांना अस्सल मराठमोळ्या पदार्थांची मेजवानी असणार आहे. त्यासाठी मास्टर शेफ विष्णू मनोहर कामाला लागले आहेत. विशेष म्हणजे त्यात खास वैदर्भीय खाद्य पदार्थांच्या मेनुचा भरणा असून तब्बल 97 मेनू तयार करण्यात येणार आहेत.
पाहुण्यांसाठी खास कार्यक्रम
20 मार्च रोजी रात्री 8 वाजता तेलंगखेडी गार्डन येथे पाहुण्यांसाठी विशेष मेजवानीचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यामध्ये मनोरंजनाचे कार्यक्रम आणि सुग्रास, स्वादिष्ट आणि रूचकर भोजन ठेवण्यात आले आहे. यात महाराष्ट्रीयन,उत्तर भारतीय,कॉन्टिनेन्टल, अस्सल वऱ्हाडी, दक्षिण भारतीय पदार्थ अश्या निरनिराळ्या 97 प्रकारचे मेनू असणार आहेत. विशेष म्हणजे यात वैदर्भीय खाद्य पदार्थांच्या मेणुचा भरणा असणार आहे.
हे पदार्थ खास आकर्षण
विष्णू मनोहर सांगतात की, विदेशी पाहुण्यांच्या भोजनाची जबाबदारी ईश्वराच्या कृपेने मला मिळाली असून ही अतिशय आनंदायी बाब आहे. जगप्रसिद्ध सावजी मटण, चिकनचे प्रकार, मात्र सावजी हे झणझणीत असतं तर या पाहुण्यांसाठी माईल्ड स्वरूपाचे सावजी असणार आहे. विदर्भातील भरडा भात, वडा भात, कोथिंबीर वडी, पटोडी वडी, पतोडी रस्सा, शेवभाजी, चंद्रपूरचा वाडा,साबुदाणा वडा, आलूबोंडा असे नानाप्रकराचे मेनू असणार आहे. सोबतच 13-14 प्रकारच्या मिठाई असणार आहेत.
Nagpur News: नागपुरातील वॉकर्स स्ट्रीटवर अवतरली 'ग्लॅमर गर्ल', पाहा Photos
शाही बैठकीची पंगत असणार
विदेशी पाहुण्यांना अस्सल मराठमोळ्या संस्कृतीचं दर्शन व्हावं यासाठी शाही बैठकीची पंगत असणार आहे. त्यात चांदीच्या ताटात पंचपकवान वाढण्यात येणार आहे. या सगळ्या मेजवानीचे तयारी आतापासून सुरू झाली असून हा मेजवानीचा सोहळा अविस्मरणीय ठराव यासाठी अमाची संपूर्ण चमू कामाला लागली आहे, अशी माहिती प्रसिध्द मास्टर शेफ विष्णू मनोहर यांनी दिली.
पारंपरिक पद्धतीने होणार स्वागत
19 मार्च रोजी सायंकाळी पाहुण्यांचे विमानतळावर आगमन होणार आहे. पाहुण्यांना फेटा बांधून पारंपरिक पद्धतीने स्वागत केले जाणार आहे. या शिवाय खास तयार करून घेतलेले भंडारा मलबेरी सिल्कचे स्टोल भेट म्हणून देण्यात येणार आहे. या स्टोलवर इंग्रजी आणि मराठीत जी-20 व सी-20 असे लिहिलेले आहे. पाहुण्यांना संत्रा ज्यूस आणि संत्रा बर्फीही भेट दिली जाईल.
Pench Tiger Project: नागपूर जवळचं वाघाचं घर, 'जंगल बुक'शी आहे खास कनेक्शन! Video
महिला पाहुण्यांसाठी खास भेट
20 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता हे विदेशी पाहुणे फुटाळा येथे संगीत कारंजाचा खेळ पाहाणार आहेत. तिथून ते तेलंगखेडी बगिच्यात येतील. बगिच्यात गोंधळ, लावणी व चिटकोर इत्यादी सारखे कार्यक्रम होणार आहे. महिलांसाठी मोगरा आणि चमेलीच्या गजऱ्याचे स्टॉल राहाणार आहे. या शिवाय महिलांसाठी मेहंदी आर्टिस्टही राहाणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Local18, Local18 food, Nagpur, Nagpur News