साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी
कोल्हापूर 16 मार्च : सध्या उकडा इतका वाढलाय की रणरणत्या उन्हात घराबाहेर पडायलाच नको वाटते. मात्र कामानिमित्त बाहेर पडायलाच लागते. अशावेळी दुपारच्या उन्हात अंगाची लाही कमी करण्याचे काम ताक, सरबत यासारखे थंड पेयाचे स्टॉल करतात. कोल्हापुरातील एक सरबताचा स्टॉल सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्या स्टॉलवर चक्क बेवफा सरबत मिळते.
होय, तुम्ही अगदी बरोबर वाचलं आहे. कोल्हापुरात सध्या बेवफा शरबत प्यायला मिळत आहे. इतकेच नाही तर त्यासोबत त्या स्टॉलवर मोहब्बत का शरबत आणि नफरत का शरबत देखील मिळते. आदम नदाफ या तरुणाचा ॲडीज् बिर्याणी नावाचा चिकन 65 चा गाडा आहे. रोज संध्याकाळी त्याच्या गाड्यावर गर्दी असते. तर त्याच्या याच गाड्यावर दिवसभर हे अनोख्या नावाचे सरबत विकायला त्यानं सुरुवात केलीय.
कशी सुचली कल्पना?
आदम कोरोना काळामध्ये घरीच होता. त्यावेळी आपल्या व्यवसायाला नवी जोड दिली पाहिजे, हे त्याच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यानं पहिल्या लॉकडाऊननंतर हे सरबत विकायला सुरूवात केली. थोड्याच दिवसांमध्ये पुन्हा लॉकडाऊन झाल्यानं सर्व बंद झालं होतं. पण, नंतर हळूहळू या सरबताला चांगला प्रतिसाद मिळाला, असं आदमनं सांगितलं.
सातासमुद्रापार फेमस असलेलं कोल्हापुरी मटणाचं लोणचं कसं बनतं? पाहा Recipe Video
कलिंगड, सफरचंद आणि दोन्ही मिक्स असे तीन वेगवेगळ्या फ्लेवरचे सरबत आदम विकतो. ज्यांना त्याने अनुक्रमे मोहब्बत, नफरत आणि बेवफा शरबत अशी नावे दिली आहेत. त्याच्याकडे या सरबताचा हाफ ग्लास 20 रुपयांना आणि फुल ग्लास 30 रुपयांना मिळतो.
कसं बनवतात सरबत ?
आदम याच्याकडे मिळणारे सरबत हे दुधातले सरबत असतात. मोहब्बत का शरबत बनवताना बर्फ, दूध, त्यामध्ये साखरेचा पाक, रुहफ्जा, इसेन्स, बारीक कलिंगडाचे काप हे जिन्नस टाकले जातात. तर, नफरत का शरबत बनवताना बर्फ, दूध, त्यामध्ये साखरेचा पाक, इसेन्स, किसून घेतलेला सफरचंदाचा किस हे जिन्नस वापरले जातात.
सामान्यतः मोहब्बत-ए-शरबत, नफरत-ए-शरबत असे सरबत पाहायला मिळतात. मात्र दोन्हींचे एकत्र मिश्रण करून अदील हा बेवफा शरबत बनवतो. मोहब्बत आणि नफरत एकत्र येतात तेव्हा बेवफाई होतेच. त्यामुळे या शरबतला बेवफा शरबत नाव दिल्याचे अदील सांगतो.
ताज्या कच्च्या दुधामुळे या सरबताला पाण्यातील सरबत पेक्षा एक वेगळीच चव येते, अशा प्रतिक्रिया ग्राहक व्यक्त करतात. त्यामुळे दूध आणि फळांचे असे हे पौष्टिक सरबत चाखायला नागरिकांची गर्दी येथे वाढतानाच पाहायला मिळत आहे.
गूगल मॅपवरून साभार
कुठे मिळेल सरबत?
व्हिनस कॉर्नरजवळ, स्टेशन रोड, बी न्यूज ऑफिससमोर हा ॲडीज बिर्याणी नावाचा गाडा आहे. त्या गाड्यावर हे सरबत मिळते.
संपर्क (आदम नदाफ) : 9673893101
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Kolhapur, Local18, Local18 food