Home /News /lifestyle /

दोनपेक्षा जास्त वेळा वापराल तर कारवाईच; तळलेलं Oil पुन्हा वापरल्याने नेमकं असं होतं तरी काय?

दोनपेक्षा जास्त वेळा वापराल तर कारवाईच; तळलेलं Oil पुन्हा वापरल्याने नेमकं असं होतं तरी काय?

तळण्यासाठी वापरलेलं तेल पुन्हा पुन्हा वापरणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचा इशारा अन्न आणि औषध प्रशासनाने दिला आहे.

    मुंबई, 25 मे : आता पावसाळा जवळ आला आहे. पावसाळा म्हटलं की गरमागरम बटाटावडा, भजी, समोसा असे तळलेले पदार्थ आलेच. पण असे पदार्थ जर त्याच त्याच तेलात तळले जात असतील तर सावध राहा. कारण आता अन्न आणि औषध प्रशासनाचा (FDA) यावर वॉच असणार आहे. पदार्थ तळण्यासाठी जर त्याच तेलाचा पुन्हा वापर केला जात असेल तर मोठी कारवाई केली जाणार आहे (Reheating cooking oil). पावसाळ्याआधी अन्न आणि औषध प्रशासनाने (Food and drug administration) तळलेल्या पदार्थांबाबत काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. हॉटल आणि फूट स्टॉलवर तळण्यासाठी वापरण्यात आलेलं तेल दोनपेक्षा जास्त वेळा वापरल्यास संबंधित खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कारवाई होणार आहे. नियमांचं काटेकोर पालन केल्यास लायसन्स रद्द केलं जाणार आहे (Cooking oil reused). खाद्यतेलाचा तळण्यासाठी वापर करताना गॅस हा कमी आचेवर ठेवावा. तेलामधून धूर येणार नाही, याची काळजी घ्यावी.  तळण्यासाठी शक्‍यतो स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांचा वापर करावा. लोखंडी कढईचा वापर टाळावा. तळताना तेलात जमा झालेले अन्नकण हे वारंवार तळून काळे होण्यापूर्वी लगेचच काढावेत.  दररोज 50 लीटरपेक्षा अधिक तेलाचा वापर करीत असलेल्या व्यावसायिकांनी तेल साठ्याबाबत नोंद ठेवणं बंधनकारक आहे, अशा मार्गदर्शक सूचनाही एफडीएने जारी केल्या आहेत. हे वाचा - एसीमध्ये बसल्यानं त्वचा कोरडी होतेय? या सोप्या टिप्स वापरून होईल त्रास कमी दरम्यान तळलेलं तेल पुन्हा पुन्हा तळण्यासाठी वापरल्याने त्याचा आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होतो. नेमका काय काय परिणाम होतो ते पाहुयात. शरीरातल्या आम्लाचं प्रमाण वाढवतं तेल वारंवार गरम केल्यास त्यातल्या आम्लाचं (Acid) प्रमाण वाढतं. पोटात आणि घशात जळजळ होत असेल तर खाण्याचं तेल हे त्यामागचं कारण असू शकतं. अ‍ॅसिडिटीचा जास्त त्रास होत असेल तर जंक फूड आणि तळलेले पदार्थ खाणं टाळा. त्यामुळे घसा आणि पोटदुखीमध्ये आराम मिळेल. शरीरात विषारी पदार्थाचे प्रमाण वाढतं सूर्यफूल किंवा कॉर्न ऑइलसारखं (Corn Oil) काही वनस्पतींचं तेल पुन्हा गरम केल्याने त्यातल्या विषारी पदार्थांचं प्रमाण वाढतं. त्यामुळे हृदयविकार, अल्झायमर, स्मृतिभ्रंश आणि पार्किन्सन यांसारख्या अनेक समस्या उद्भवतात. वनस्पती तेल पुन्हा गरम केल्याने 4-हायड्रॉक्सी-ट्रान्स-2-नॉमिनल (HNE) नावाचा विषारी घटक बाहेर पडतो. तो डीएनए, आरएनए आणि प्रथिनांना योग्यरित्या कार्य करण्यास प्रतिबंध करतो. हे वाचा - आंब्याची सालही आहे उपयोगी, फेकून देण्यापूर्वी वाचा 'हे' फायदे खराब कोलेस्टेरॉल वाढतं काळं आणि धूर निघणारं तेल वारंवार गरम केल्यास ते शरीरातलं एलडीएल म्हणजेच खराब कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढवू शकतं. एलडीएल कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्यास हृदयविकार, स्ट्रोक आणि छातीत दुखण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे कोलेस्टेरॉलशी संबंधित समस्या टाळण्यासाठी स्वयंपाकाचं तेल पुन्हा गरम करून वापरणं टाळा. कॅन्सरचा धोका वाढतो तेल पुन्हा गरम केल्याने ते कार्सिनोजेनिक बनू शकतं. म्हणजेच ते कर्करोग होण्यास कारणीभूत ठरू शकतं. संशोधन असं सांगतं, की तेल वारंवार गरम केल्यास त्यात अल्डिहाइड्स (विषारी घटक) तयार होतात. नंतर त्याचा वापर केल्यास ते विषारी घटक शरीरात पोहोचतात आणि त्यामुळे शरीराचं नुकसान होतं. या तेलाच्या वापरामुळे कॅन्सरचा (Cancer) धोका वाढतो. तसंच शरीरातल्या टॉक्सिन्सचं प्रमाण वाढल्याने लठ्ठपणा, हृदयविकार आणि मधुमेहासह अनेक आजार होऊ शकतात.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Food, Health, Lifestyle

    पुढील बातम्या