Home /News /lifestyle /

नावडत्या कामाचे तुमच्या मनावर नकारात्मक परिणाम होतातयंत का? ही लक्षणं वेळीच ओळखा

नावडत्या कामाचे तुमच्या मनावर नकारात्मक परिणाम होतातयंत का? ही लक्षणं वेळीच ओळखा

अनेकदा आपल्याला एखादी नोकरी अनिच्छेनं करावी लागते. त्याचा आपल्या मनावर नकारात्मक परिणाम होतो. तुमचं काम, नोकरी तुमच्या आरोग्यासाठी हितकारक नाही याची ही पाच महत्त्वाची लक्षणे आहेत.

मुंबई, 05 जानेवारी : आपली नोकरी, काम आपल्या आवडत्या क्षेत्रात असावी, जिथं आपल्याला आपलं ज्ञान, कौशल्य याचा योग्य उपयोग करता येईल. ज्याचं शिक्षण आपण घेतलं आहे, त्या कार्यक्षेत्रात नोकरी असणं अतिशय महत्त्वाचं असतं. कामातून आपल्याला शिकण्याचा अनुभव आणि आनंद मिळणं महत्त्वाचं आहे. दुर्दैवानं, अनेकदा हे प्रत्यक्षात घडत नाही. पण आपल्याला नोकरी टिकवून ठेवणं भाग असतं. याचा आपल्या मनावर नकारात्मक परिणाम होत असतो. तुमची नोकरी तुमच्यासाठी आरोग्यदायी नसल्याची ही पाच चिन्हे आहेत. कामाबाबत उदासीनता (Reluctance of Work) : कार्यालयात उशिरा जाणं किंवा दुसऱ्या ठिकाणी कामासाठी जायचं असेल तर किंवा घरी बसून काम करायचं असेल तर उशिरा लॉग इन करणं, उशिरा जाणं ही तुम्हाला तुमचं काम आनंद देत नसल्याची प्राथमिक चिन्हं असू शकतात. कामाच्या ठिकाणी कर्मचार्‍याच्या मानसिक आरोग्यावर (Mental  Health)परिणाम होत असल्याचंही हे लक्षणं आहे. कंटाळवाणे कामाचे तास (Joyless Work Hours) : काम कंटाळवाणं वाटणं, काम करताना उत्साह, आवड नसणं, ऑफिसमधल्या आपल्या कामाच्या जागेविषयी, क्यूबिकलबाबत कोणतीही सकारात्मक भावना नसणं हीदेखील याच मानसिकतेची लक्षणं आहेत. अशावेळी रोज असाइनमेंटस कराव्या लागल्या तर मनात भीतीची भावना निर्माण होते. सहकारी किंवा वरिष्ठांशी संबंध बिघडतात. त्यामुळे कामाच्या जागेबाहेर मोकळं वाटतं. शारीरिक आजार (Physical Ailments) : अनेक कामांमध्ये आठ तासांपेक्षा अधिक काळ टायपिंग करण्याची गरज असते. यामुळे मस्क्युलोस्केलेटल त्रास (Musculoskeletal Issues), गॅस्ट्रोइंटेस्टाइनल डिसऑर्डर, डोकेदुखी अशा आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. कामाच्या अतिताणामुळे झोपदेखील उडते. या आरोग्याच्या समस्या अधिक गंभीर झाल्यास त्याचा आपल्या मनावर नकारात्मक परिणाम होतो. चिडचिड : कामाचा ताण (Stress) वेगवेगळ्या मार्गांनी सहन करावा होतो. शारीरिक आजारांव्यतिरिक्त, आपल्या मनःस्थितीवरही त्याचा परिणाम होतो. अनिच्छेनं कराव्या लागणाऱ्या कामामुळे दु:ख आणि निराशा (Frustration) वाढते. मनासारखं काही घडलं नाही, तर चिडचिड होते. या सगळ्याचा राग प्रिय व्यक्तींवर, मित्रमैत्रिणी, नातेवाईक यांच्यावर काढला जातो. अनेकदा त्यांच्याशी चुकीचं वागतो. चिंता आणि नैराश्य (Anxiety and Depression): कामाच्या ताणामुळं (Work Load)सतत चिंता जाणवू लागते, त्यामुळं सहकारी किंवा वरिष्ठ यांच्याशी संवाद कमी होतो. मनावर प्रचंड ताण येतो. त्यावेळी हे लक्षात येतं की या कामामुळे, नोकरीमुळे त्रास होतो आहे. औदासिन्य (Depression) म्हणजे दुःख, निराशा यांची वारंवार निर्माण होणारी मानसिकता होय. यामुळं आयुष्य रटाळ वाटू लागते. त्यात कसलाही आनंद, उर्जा वाटत नाही. आत्महत्येचे विचार येऊ लागतात. अशावेळी मानसोपचार तज्ञांची मदत घेणं आवश्यक आहे आणि वरील पाच लक्षणे दिसल्यास नावडतं काम करणं बंद केलं पाहिजे.
Published by:Amruta Abhyankar
First published:

Tags: Lifestyle

पुढील बातम्या