पुणे, 24 डिसेंबर : पुण्याच्या (pune) सीरम इन्स्टिट्युनं ऑफ इंडियानं (serum institute of india) देशाला कोरोना लस उपलब्ध करून दिली. या लशीचं ट्रायल सुरू आहे. पुढच्या वर्षातच ही लस उपलब्ध होईल अशी आशा आहे. त्यातच कंपनीकडून आणखी एक आनंदाची बातमी मिळते आहे. ती म्हणजे कोरोना लशीसह आणि एका गंभीर आजाराविरोधातील स्वदेशी लस पुढच्या वर्षात मिळणार आहे आणि ही लस म्हणजे न्यूमोनियाविरोधातील लस (Pneumonia Vaccine).
न्यूमोनिया हा श्वसनसंबंधीआजार आहे. यूनिसेफच्या आकडेवारीनुसार भारतात दर वर्षी पाच वर्षांपर्यंतच्या एक लाखांपेक्षा अधिक मुलांचा मृत्यू न्यूमोनियामुळे होता. भारतात सध्या दोन विदेशी कंपन्यांच्या न्यूमोनिया लस उपलब्ध आहेत. फायझरची एनवायएसई पीएफई ( (NYSE: PFE) आणि ग्लॅक्सोस्मिथक्लाइनची एलएसई जीएसके (LSE: GSK) या दोन लशी आहेत. पण आता भारतानंही आपली लस तयार केली आहे.
न्यूमोकोकल पॉलिसॅक्रीइड कांजुगेट लस (Pneumococcal Polysaccharide Conjugate vaccine) पुढच्या आठवड्यातच लाँच केली जाणार आहे. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल पूर्ण झालं. हे ट्रायल भारत आणि आफ्रिकेतील गाम्बियामध्ये करण्यात आलं होतं. त्याचा अहवाल पाहिल्यानंतर जुलैमध्ये या लशीला मंजुरी देण्यात आली होती.
हे वाचा - घाबरू नका! नव्या कोरोनाविरोधातही प्रभावी लस; औषध कंपनीकडून मोठा दिलासा
सूत्रांचा हवाला देत पीटीआयनं दिलेल्या वृत्तानुसार भारतात तयार होणारी ही पहिली न्यूमोनिया लस आहे. विदेशी लशींच्या तुलनेत ही स्वदेशी लस खूपच स्वस्त असणार असल्याचं सांगितलं जातं आहे. या लशीच्या माध्यमातून लहान मुलांमध्ये‘स्ट्रेप्टोकॉकस न्यूमोनियाविरोधात रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, असं याआधी आरोग्य मंत्रालयानं सांगितलं होतं. कोरोनाच्या महासाथीत न्यूमोनियाची लस खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे.