बुलडाणा, 06 फेब्रुवारी : नवरा-बायको (husband and wife) म्हटलं की भांडणं आलीच. अगदी छोट्या छोट्या कारणांवरूनही त्यांच्यामध्ये भांडणं होतात. कधी कधी दोघं इतक्या विचित्र कारणावरून भांडतात की हे काय भांडणाचं कारण आहे का असंच कुणालाही वाटेल. असंच प्रकरण सध्या समोर आलं आहे. बुलडाण्यातील दाम्पत्यामध्ये चक्क (egg)अंड्यावरून वाद झाला आहे. फक्त वाद झाला नाही तर हे भांडण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलं.
भावंडांमध्ये अंडी खाण्यावरून वाद होणं ठीक आहे. पण नवरा-बायकोत असा वाद. विश्वासच बसणार नाही. पण हे खरं आहे. बुलडाण्याच्या साखरखेडा गावातील पती-पत्नी दोघांमध्ये तीन अंड्यांवरून भांडणं झाली. दोघंही एकमेकांविरोधात तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात गेले. सुरुवातीला भांडणाचं कारण ऐकून पोलिसांनाही आश्चर्य वाटलं. पण त्यांनी त्यांची तक्रार सविस्तर ऐकून घेतली नेमकं प्रकरण काय आहे, ते जाणून घेतलं.
हे वाचा - गर्लफ्रेंड बनून बायकोनंच भेटायला बोलावलं; भररस्त्यात आंबटशौकिन नवऱ्याला धुतलं
पतीनं पोलिसांना सांगितलं, त्यानं बाजारातून कोंबडीची तीन अंडी आणली आणि बायकोला त्याची बुर्जी बनवायला सांगितली. नवरा बुर्जी खायला आला तेव्हा त्याला बुर्जी काही मिळाली नाही. यावर पत्नीनं सांगितलं, आपण तिन्ही अंड्यांची बुर्जी बनवली. पण ती आपल्या मुलीला खायला दिली आणि मग काय यावरूनच नवरा-बायकोत जुंपली.
त्यांच्यातील भांडण इतकं वाढलं की सुटता सुटत नव्हतं. मग हे भांडण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलं. हे सर्व ऐकून पोलिसांनाही हसू आवरलं नाही. पण त्यांनी वाद सोडवण्यासाठी आणि नवरा-बायकोला एक करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी अनोख्या पद्धतीनं हा वाद सोडवला.
हे वाचा - बापरे! अधिक सुंदर दिसण्याच्या नादात अभिनेत्रीनं नाकाची अक्षरश: लावली वाट
आज तकच्या रिपोर्टनुसार पोलीस अधिकारी जितेंद्र अडोले यांनी आपल्या स्टाफमधील एका कर्मचाऱ्याला बाजारात पाठवलं आणि त्याला तीन अंडी आणायला सांगितलं. ही अंडी त्यांनी नवरा-बायकोच्या हातात ठेवली. मग काय दोघंही खूश. हातात अंडी घेऊन आनंदी चेहऱ्यानं दोघंही आपल्या घरी गेले.