वॉशिंग्टन, 03 ऑक्टोबर : कोरोनाव्हायरसपासून (coronavirus) स्वत:चं आणि इतरांचं या विषाणूपासून संरक्षण करायचं असेल तर मास्क (mask) वापरणं, हात धुणं आणि सोशल डिस्टन्सिंग ही त्रिसूत्री अत्यंत महत्त्वाची आहे. पण मास्क लावल्यामुळे गुदमरल्यासारखं होतं. आपल्या शरीराबाहेर फेकला जाणारा कार्बन डायऑक्साइड्सचं शरीरात पुन्हा जातो, जे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं, असं सांगतिलं जातं आहे. त्यामुळे मास्क वापरू नये, असे कित्येक लोक सांगत आहेत. मात्र खरंच असं होतं का?
अमेरिकेतील मियामी विद्यापीठातील शास्रज्ञांनी याबाबत संशोधन केलं आहे. मास्क लावल्याने कार्बन डायऑक्साइड शरीरात जाऊन धोका निर्माण होतो किंवा त्यामुळे धाप लागून त्रास होऊ शकतो हे दोन्हीही दावे चुकीचे असल्याचं या संशोधनातून सिद्ध झालं आहे. अनल्स ऑफ द अमेरिकन थोरॅसिक सोसायटी या जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झालं आहे.
निरोगी व्यक्तींसह सीओपीडीची समस्या असेलल्या रुग्णांचाही अभ्यास करण्यात आला. मास्क वापरण्यापूर्वी आणि मास्क वापरल्यानंतर या सर्वांच्या शरीरातील ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइडची पातळी तपासली.
हे वाचा - कोरोनाची स्वॅब टेस्ट बेतली महिलेच्या जीवावर; थोडक्यात बचावली, नेमकं काय घडलं
या संशोधनाचे अभ्यासक मायकेल कॅम्पोस म्हणाले, "COPD च्या रुग्णांना श्वास घेण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. त्यांनी मास्क लावल्यावर त्यांना दम किंवा धाप लागू शकते. ज्यांना फुफ्फुसांशी संबंधित आजार आहेत अशा रुग्णांवरही मास्क लावल्याने फारच कमी प्रमाणात परिणाम होतो. तुम्ही जेव्हा वेगात चालता किंवा एखादी टेकडी चढता तेव्हाही तुम्हाला दम लागतो. त्यामुळे मास्क वापरल्यामुळे दम लागल्यास जीवाला धोका अजिबात नाही. कोव्हिडपासून संरक्षणासाठी मास्क वापरायलाच हवा"
हे वाचा - डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कशा पद्धतीने केला जातोय कोरोनावरील उपचार?
"एखाद्या व्यक्तीला दम लागला तर त्याने आपण दुसऱ्या व्यक्तीपासून सहा फुटांच्या सुरक्षित अंतरावर असल्याची खात्री करून काही क्षण मास्क नाकावरून खाली उतरवायला हरकत नाही. मोकळा श्वास घेऊन पुन्हा मास्क लावावा", असा सल्ला कॅम्पोस यांनी दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Mask