परमा (इटली), 15 जानेवारी: भूमध्य समुद्राच्या सभोवतलाचे देश (Mediterranean Region) आणि फ्रान्स (France) यांच्याप्रमाणेच चित्रविचित्र खाद्यसंस्कृती आता युरोपातही विकसित होणार असल्याचं दिसतं. युरोपीय महासंघाच्या (Europen Union) अन्न सुरक्षितता यंत्रणेनं नुकताच निर्वाळा दिला आहे, की किडे खाण्यास योग्य आहेत. प्रोटीन्सयुक्त आहारासाठी किड्यांचा समावेश जेवणात करायला हरकत नाही.
इटलीतल्या परमा येथे असलेल्या या यंत्रणेने या विषयावरचं शास्त्रज्ञांचं मत नुकतंच प्रसिद्ध केलं. येलो मीलवर्म्स (Yello Mealworms) नावाने ओळखले जाणारे किडे आहारात ठेवण्यास काहीही हरकत नसून, ते शरीरासाठी सुरक्षित आहेत. असं या यंत्रणेनं म्हटलं आहे. सुकवलेले मीलवर्म्स अख्खे किंवा पावडर स्वरूपात आहारात ठेवल्यास प्रथिनांनी समृद्ध (Protein Rich) असा आहार म्हणून उपयुक्त ठरतील. अन्य पदार्थांत घटक पदार्थ म्हणूनही त्यांचा वापर करता येऊ शकतो, असं या यंत्रणेनं सुचवलं आहे.
त्या किड्यांना कोणत्या प्रकारचं खाद्य दिलं आहे, त्यानुसार कदाचित काही वेळा अॅलर्जिक रिअॅक्शन येऊ शकते; पण एकंदरीत विचार करता प्रस्तावित प्रकारे आणि ठरवून दिलेल्या प्रमाणात हे किडे आहारात ठेवल्यास शरीराला अपायकारक नाहीत, असं या शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. Tenebrio molitor असं शास्त्रीय नाव असलेल्या किड्यांच्या अळ्यांची खाण्यासाठी शिफारस करण्यात आली आहे.
संयुक्त राष्ट्रसंघानेही (UN) यापूर्वी किड्यांच्या आहारात समावेशासाठी हिरवा कंदील दाखवला होता. 2013मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न आणि कृषी संघटनेने (FAO) हे किडे म्हणजे माणसांसह पाळीव जनावरांसाठीही लो-फॅट आणि हाय प्रोटीन फूड असल्याचं सांगितलं होतं. तसंच, हे अन्न पर्यावरणाच्या दृष्टीनेही चांगलं असल्याचं मत त्या संस्थेने नोंदवलं होतं.
विचित्र काही तरी खाण्याच्या स्पर्धेत अमेरिकाही मागे नाही बरं. अजगर (Python) हे खाण्यायोग्य प्राणी आहेत का, याबद्दल अमेरिकेतले शास्त्रज्ञ सध्या संशोधन करत आहेत.
फ्लोरिडा फिश अँड वाइल्डलाइफ काँझर्व्हेटिव्ह कमिशनने (FWC) आरोग्य विभागाच्या सहकार्याने एक संशोधन प्रकल्प हाती घेतला आहे. अजगर खाण्यासाठी सुरक्षित आहेत का, याबद्दलचं संशोधन त्यात केलं जात आहे. अजगराच्या शरीरात असलेलं पाऱ्याचं प्रमाण मानवी शरीरासाठी घातक ठरणार नसेल, तर या संस्थांची अजगराचा आहारात समावेश करण्याला परवानगी मिळू शकते. तसं झालं तर फ्लोरिडातल्या हॉटेल्स-रेस्तराँमध्येही अजगर मिळू लागतील.
अमेरिकन अजगराला खायला उत्सुक
अजगराला खाद्य बनविण्याचा विचार अमेरिकी नागरिकांना सुचण्यामागे आणखीही एक कारण आहे. दक्षिण फ्लोरिडात बर्मीज अजगर (Burmese Python) आढळतात. ते प्रचंड विध्वंसक आहेत. कारण त्यांच्यामुळे स्थानिक वन्य प्राण्यांच्या अस्तित्वाला मोठा धोका निर्माण झाला आहे. FWC ही संस्था अन्य काही संस्थांसोबत या बर्मीज अजगरांच्या नियंत्रणासाठी कार्यरत आहे. त्यात लोकसहभाग वाढण्यासाठीही ती संस्था काम करते आहे. खासगी शेत किंवा जमिनीवर अजगर आढळल्यास तो हाकलण्यासाठी किंवा त्याला मारून टाकण्यासाठी नागरिकांना आवाहन केलं जात आहे. अर्थात, त्यासाठी संबंधित जमीनमालकाची परवानगी असणं आवश्यक आहे. आपल्याला काही करणं शक्य नसेल, तर अजगर दिसल्यावर यंत्रणेला तरी कळवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
या अजगरांच्या नियंत्रणाचा एक मार्ग म्हणून त्यांना खाण्याची परवानगी मिळण्याकडे शास्त्रज्ञ डोळे लावून बसले आहेत. शास्त्रज्ञांचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर त्या अजगरांचं काही खरं नाही!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.