Home /News /lifestyle /

Corona पासून बचावासाठी दररोज पीत होता 5 लिटर पाणी; उपाय अंगाशी आल्याने थेट ICU मध्ये भरती

Corona पासून बचावासाठी दररोज पीत होता 5 लिटर पाणी; उपाय अंगाशी आल्याने थेट ICU मध्ये भरती

कोरोना विषाणूपासून (Corona Virus) स्वतःचा बचाव करण्यासाठी या व्यक्तीनं दिवसाला 5 लिटरपेक्षा अधिक पाणी प्यायलं आणि तो थेट मृत्यूचं दार ठोठावून आला.

    ब्रिस्टल (UK) 30 डिसेंबर:  प्राणघातक कोरोना विषाणूने (Deadly CoronaVirus) अक्षरशः जगभर थैमान घातलं आहे. त्यातच आता नव्या कोरोना विषाणूचा (Mutation of coronavirus) माग लागल्यााने  आणखी दहशत पसरली आहे. अनेक लोक कोरोना होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय करत आहेत. जगभरात लॉकडाऊन (Lock down) जाहीर करण्यात आला होता. पण कोरोना होऊ नये म्हणून काही घरगुती उपायही सांगितले जात आहेत. यातले अनेक उपाय whatsapp किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून फिरत असतात. सोपे आहेत, घरगुती आहेत, अपाय होणार नाही म्हणून ते अवलंबलेही जातात. त्यातून खरंच किती जण कोरोनाला दूर ठेवू शकलं ते कळायला मार्ग नाही, पण असा वरवर दिसणारा साधा घरगुती उपाय एका व्यक्तीच्या अंगाशी आला याचं उदाहरण मात्र ब्रिटनमध्येच समोर आलं आहे. जगभरातील बहुतेक लोकं त्यांची रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी विविध उपाय करीत आहेत. बर्‍याच लोकांनी कोरोना विषाणूच्या लक्षणांपासून बचाव करण्यासाठी घरगुती उपचारांचा अवलंब केला आहे. विविध आंतरराष्ट्रीय संस्थांच्या मते, अशा काळात सुरक्षित राहण्याचा मार्ग म्हणजे चेहरा मास्क घालणे, सतत हात धुणे आणि जास्तीत जास्त घरात थांबणे. बरीच लोकं हे उपाय न अवलंबता  कोणाचं तरी ऐकून विविध घरगुती उपाय करत असल्याचं समोर आलं आहे. काही वेळा असे उपाय जीवावर देखील बेतू शकतात. ब्रिस्टल इथल्या एका 34 वर्षांच्या व्यक्तीनं प्रमाणापेक्षा अधिक पाणी प्यायल्याने कसा त्रास झाला याविषयी एक बातमी इंग्लंडच्या स्थानिक माध्यमांनी दिली आहे.  सरकारी कर्मचारी असलेल्या ल्युकने  कोरोना विषाणूपासून (Coronavirus) स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि अतिकाळजीपोटी दिवसाला 5 लिटरपेक्षा अधिक पाणी प्यायलं. त्याला आवश्यक असलेल्या पाण्यापेक्षा हे दुपटीपेक्षा अधिक आहे. त्यामुळे शरीरातल्या सोडियमची लेव्हल अचानक कमी झाली. ल्युक बाथरूममध्येच कोसळला. पत्नी लॉराने तातडीने वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केल्यानं त्याचे प्राण कसेबसे वाचले. जेमतेम  1 ते 2 लीटर पाणी प्यायची आवश्यकता असताना ल्युकने मुद्दाम कुणीतरी सांगितलं म्हणून दुप्पट पाणी प्यायला सुरुवात केली. याचा परिणाम असा झाला की, त्याच्या शरीरात नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेलं सोडियम उत्सर्जित झालं. परिणामी त्याला थेट ICU मध्ये भरती करावं लागलं. रिपोर्टमध्ये नमूद केल्याप्रमाणे या व्यक्तीला Water intoxication ची समस्या असल्याचं समोर आलं आहे. त्याचबरोबर अति पाणी पिल्याने त्याच्या मेंदूवर सूजदेखील आली होती. वेळीच उपचार मिळाले म्हणून तो मरणाच्या दारातून वाचला.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Coronavirus, Symptoms of coronavirus

    पुढील बातम्या