ठरलं! भारतात दिली जाणार रशियन लस; ट्रायलसाठी भारतीय कंपनीने केला करार
रशिया भारताला कोरोना लशीच्या (russian corona vaccine) 10 कोटी डोसचा पुरवठा करणार आहे. डॉ. रेड्डीज (Dr. Reddy's) कंपनी भारतात या लशीचं ट्रायल करणार आहे.
नवी दिल्ली, 16 सप्टेंबर : रशियाची Sputnik V कोरोना लस अखेर भारतात दिली जाणार आहे. भारतीय औषध कंपनीने रशियासह याबाबत करार केला आहे. त्यानुसार रशिया भारताला 10 कोटी डोसचा पुरवठा करणार आहे. त्यानंतर भारतात या लशीचं तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरू केलं आहे. भारताच्या डॉ. रेड्डीज (Dr. Reddy’s Laboratory Ltd.) कंपनीचा रशियन डायरेक्ट इन्व्हेसमेंट फंडशी (RDIF-Russian Direct Investment Fund) करार झाला आहे. RDIF ने याबाबत प्रेसनोट जारी केली.
भारतात रशियन लशीचं उत्पादन आणि तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल याबाबत दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली होती. त्याच्या आठवड्याभरानंतरच डॉ. रेड्डीज कंपनीने हा करार केला आहे.
डॉ. रेड्डीज लॅबचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक जी.व्ही. प्रसाद म्हणाले, भारतात रशियाची लस आणण्यासाठी RDIF सह भागीदारी करताना आम्हाला खूप आनंद होतो आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील ट्रायलमधून आशादायक असे परिणाम पाहायला मिळाले आहेत आणि या लशीचं आम्ही भारतात तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल करणार आहोत.
रशियामध्ये सध्या या लशीचं तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरू आहे. हे ट्रायल यशस्वी झाल्यानंतर आणि भारताकडून नोंदणी झाल्यानंतर 2020 मध्येच या लशीचा पुरवठा केला जाईल, असंही आरडीआयएफने सांगितलं आहे. रशियाच्या गॅमेलिया रिसर्च इन्स्टिट्युट ऑफ एपिडेमिओलॉजी अँड मायक्रोबायोलॉजीने ही लस तयार केली आहे. तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल पूर्ण होण्याआधीच लशीला परवानगी दिल्याने या लशीवर अनेक प्रश्नचिन्हं उपस्थित करण्यात आले.
पुण्यातील सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया आणि हैदराबादमधील बायोलॉजिकल-ई या दोन भारतीय कंपन्यांनी अनुक्रमे ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेका आणि जॅनसेन फार्माक्युटिका एनव्ही या लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांसह भागीदारी केली आहे. ज्यामुळे या लशींचं भारतात उत्पादन केलं जाईल.