Home /News /lifestyle /

मॉर्डन किचनमुळे महिलांच्या आरोग्यावर होतोय परिणाम? जाणून घ्या तुम्ही कसं वाचाल!

मॉर्डन किचनमुळे महिलांच्या आरोग्यावर होतोय परिणाम? जाणून घ्या तुम्ही कसं वाचाल!

एकदा उभं राहिलं की पटापट काम होणाऱ्या या मॉडर्न किचनचा प्रसार अगदी छोट्या शहरांपर्यंत पोहोचला. पण ज्या महिलांसाठी म्हणून मॉडर्न किचनची संकल्पना प्रत्यक्षात आणली त्या महिलांच्या आरोग्यावरच या किचनमुळे परिणाम होऊ लागला आहे.

    नवी दिल्ली, 11 डिसेंबर : माणसाची जशी प्रगती होत गेली तशा सुखसोयीही वाढत गेल्या. आपलं जीवन जास्तीत जास्त सुखकर होईल यावर भर दिला जाऊ लागला. महिला घराबाहेर पडल्या. करिअर, नोकरी या निमित्तानं जास्त वेळ घराबाहेर राहू लागल्या तशा घराची रचना विशेषत: किचनची म्हणजेच स्वयंपाकघराची रचनाही बदलली. मॉडर्न किचन (Modern Kitchen) हा परवलीचा शब्द झाला. एकदा उभं राहिलं की पटापट काम होणाऱ्या या मॉडर्न किचनचा प्रसार अगदी छोट्या शहरांपर्यंत पोहोचला. पण ज्या महिलांसाठी म्हणून मॉडर्न किचनची संकल्पना प्रत्यक्षात आणली त्या महिलांच्या आरोग्यावरच या किचनमुळे परिणाम होऊ लागला आहे. सतत उभं राहून कामं केल्यामुळे कंबर, पाय आणि गुडघेदुखी वाढली आहे असं लक्षात येत आहे. याबद्दलच ‘टीव्ही 9’ नं अधिक माहिती दिली आहे. पूर्वी घरांमध्ये मोठमोठी स्वयंपाक घरं (Old Big Kitchen) होती. चुली आणि त्यानंतर शेगड्या आल्या. पण बसून स्वयंपाक केला जायचा. तसंच स्वयंपाकघरातच बसून जेवणही होत असे. चुलीपाशी, पाटावर बसून महिला सगळ्या घरादाराचा स्वयंपाक करत असतं. स्वयंपाक करताना बसण्याच्या स्थितीमुळे त्यांची पावलं जमिनीला स्पर्श करत असत. या पोझिशनमुळे पाठ, पोट आणि हिप्सच्या स्नायूंवर प्रेशर पडत असे..त्यामुळेच हे स्नायू लवचिक राहत असत. पोट वाढत नसे आणि कंबरदुखीचा त्रासही होत नसे. या मॉडर्न किचनमुळे महिलांना अनेक त्रास सुरु झालेत हे खरं. तासन् तास उभं राहून काम केल्यामुळे महिलांच्या शरीराच्या आकारात फरक पडत आहे. त्यांच्या पाठीला बाक(Curve In Back) येण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यातच अनेक महिलांना काम करताना आपला फोनही जवळ ठेवण्याची सवय असते. हातानं काम करताना फोन त्यांच्या खांदा आणि कानाच्या मध्ये असतो. या पोझिशनमध्ये काम केल्यामुळे शरीराच्या हालचाली (Body Movements) बदलतात आणि मानेच्या जवळपासच्या भागात वेदना जाणवतात. हे दुखणं वाढूही शकतं. त्यामुळेच फोनवर बोलायचं असेल तर दोन मिनिटं काम थांबवा आणि मग फोनवर बोला. हे ही वाचा-या गोष्टींवरून ओळखा तुमचं प्रेम, नातं एकतर्फी तर नाही ना? असे पडू शकाल बाहेर हल्ली बहुतेक सगळीकडेच स्वयंपाक घराची पारंपरिक रचना बदलली आहे. महिलाही घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे घरात असलेल्या मर्यादित वेळत स्वयंपाक करण्याची जबाबदारी त्यांना पार पाडावी लागते. साहजिकच बसून उठून करण्यात वेळ जाण्यापेक्षा उभ्यानं काम करणं सोयीस्कर वाटतं. पण याचमुळे समस्या वाढल्या आहेत.उभं राहूनच काम केल्यामुळे शरीराचा सगळा भार पाठीचा खालचा भाग आणि अँकल्सवर पडतो. त्यामुळेच महिलांच्या स्नायूंमध्ये आणि कंबरेत दुखणं सुरु होतं. वर्षानुवर्ष असं काम केल्यानं हे दुखणं वाढत जातं. हल्ली स्वयंपाकघरंही छोटी असतात. त्यामुळे हालचालींवर मर्यादा येतात. तिथे जेवायला बसायलाही जागा नसते. तसंच पायदुखी, कंबरदुखीमुळे जमिनीवर खाली बसून जेवण्यापेक्षा खुर्चीवर बसून जेवलं जातं. अर्थातच या सगळ्याचा परिणाम शरीरावर होतो. महिलांनो हे लक्षात ठेवा- - स्वयंपाकघर छोटं असलं किंवा तुमच्याकडे वेळही कमी असला तरी काही कामं खाली बसूनच कार. भाजी चिरणं, निवडणं, कणिक मळणं ही कामं जमिनीवर बसून केली जाऊ शकतात. चटई किंवा पाटावर बसून ही कामं करा. - स्वयंपाक करताना मोबाईल वापरू नका. अगदीच अत्यावश्यक असेल तर इयरफोनचा वापर करा. - अर्थातच हे मॉडर्न कल्चर लगेचच बदलणं शक्य नाही. पण आपण आपल्या काही सवयी मात्र नक्की बदलू शकतो. स्वयंपाकघरात सतत उभं राहून काम करू नका. तिथे एखादा स्टुल किंवा खुर्ची ठेवा. अधूमधून त्यावर बसा. - सगळ्या कामांची जबाबदारी तुमच्यावरच घेऊ नका. घरातील सदस्यांनाही घरकामात, स्वयंपाकाच्या कामात सहभागी करून घ्या. असं केल्यानं सगळा भार तुमच्यावर येणार नाही आणि तुमच्या कामाचा वेळही कमी होईल. - कितीही व्यस्त दिनक्रम असला तरी स्वत: साठी, स्वत:च्या आरोग्यासाठी वेळ काढा. योगासनं आणि व्यायाम न चुकता रोज नियमित करा. त्यामुळे तुमच्या आरोग्याच्या तक्रारी वाढणार नाहीत. पद्मासन, बटरफ्लाय, पवनमुक्तासन आणि मत्स्यासन ही आसनं दररोज करा. यामुळे लोअर बॅक म्हणजेच पाठीचा खालचा बाग आणि पोटाचे स्नायू मजबूत होतील. घरातली स्त्री ही घराचा कणा असते असं म्हटलं जातं. जर या कण्यालाच वेदना झाल्या तर घर कोलमडून पडतं. त्यामुळे तुमच्या सोयीसाठी मॉडर्न किचन असलं तरी सुखासाठी, आरोग्यासाठी या टीप्स नक्की लक्षात ठेवा.
    First published:

    Tags: Health, Women safety

    पुढील बातम्या