तुमच्या आयुष्यावर थेट परिणाम करणारे 'बॅक्टेरिया' असे जातात एका खंडातून दुसऱ्या खंडात

तुमच्या आयुष्यावर थेट परिणाम करणारे 'बॅक्टेरिया' असे जातात एका खंडातून दुसऱ्या खंडात

तुमच्या आमच्या भवोताली असंख्य जीवाणू (Bacteria) फिरत असतात. पण हे जीवाणू एका खंडातून (Continent ) दुसऱ्या खंडातही जातात. संशोधनातून ही माहिती समोर आली आहे.

  • Share this:

माद्रिद, 15 डिसेंबर : वातावरणातील धुळीच्या माध्यमातून रोगप्रसाराला कारणीभूत ठरणारे काही जीवाणू (Bacteria) अदृश्यपणे एका खंडातून दुसऱ्या खंडात प्रवास करीत असतात, अशी बाब संशोधनातून स्पष्ट झाली आहे. हे सूक्ष्मजीव केवळ प्राणी किंवा मानवी आरोग्यावरच नाही तर हवामान आणि पर्यावरणालादेखील धोकादायक ठरतात. अ‍ॅटमोसफेरिक रिसर्च (Atmospheric Research) या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार, या सुक्ष्मजीवांच्या प्रवासाचे गूढ उलगडण्यात यश आले असून, हे सूक्ष्मजीव मानवाकडून श्वसनाद्वारे घेतल्या जाणाऱ्या आयबेरुलाईटल नावाच्या वायूमंडलीय कणांद्वारे एका खंडातून दुसऱ्या खंडात प्रवास करतात.

स्पेनमधील युनिर्व्हसिटी ऑफ ग्रॅनडामधील (University of Granada UGR) शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, काही वातावरणीय घटक हे या सूक्ष्मजीवांसाठी वाहकाची भूमिका बजावतात. या सूक्ष्मजीवांच्या प्रसारामुळे खंडांमध्ये आजारांचा प्रसार होण्याची शक्यता असते.

आयबेरुलाईट्स  हे खनिजांपासून बनलेले एक मोठे बायोएरोसोल आहे. ते सरासरी 100 मायक्रॉनमध्ये मोजले जाते. या बायोएरोसोलचा शोध 2008 मध्ये लागला. परंतु याच्या निर्मितीत कोणत्या सूक्ष्मजीवांचा सहभाग असतो, ही बाब अद्यापपर्यंत स्पष्ट होऊ शकली नसल्याचे, शास्त्रज्ञांनी स्पष्ट केलं.

सध्याच्या अभ्यासानुसार, स्पेनमधील ग्रॅनडा शहरातील वातावरणीय धुळीचा अभ्यास केला असता, त्यात शास्त्रज्ञांना काही भिन्न असे प्रकार आढळून आले. तसेच त्यात प्रामुख्याने चिकणमातीचा समावेश होता. तसेच त्यात स्फटिकं, खनिजं, लोह आक्साईड कमी प्रमाणात होते. या एरोसोल्समध्ये ब्रोझोसोमदेखील असतात, की जे नाकतोडयासारख्या कीटकांद्वारे स्त्रवले जातात.

अभ्यासानुसार, उत्तर- ईशान्य अफ्रिकेतील सहारा वाळंवाटातील धूळ, स्थानिक भागातील माती आणि ढग यांच्यातील वातावरणीय परस्पर संबंधांचे काही पुरावे मिळाले आहेत.

आयबेरुलाईट्सबाबत अधिक संशोधन करता शास्त्रज्ञांना असे आढळून आले की ढगांमधील जलबाष्पयुक्त रेणू, सहारा वाळवंटातील धुळीमधील सूक्ष्मकण आणि धुलीकणांच्या रासायनिक आणि भौतिक संयोगातून या एरोसोलची निर्मिती झाली. पाण्याच्या थेंबाच्या आतील भागात विविध आकाराचे धूलीकण आणि सुक्ष्मजीव एकत्र असतात, असे देखील या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.

आयबेरुलाईट्समधून सूक्ष्मजीवांना पोषक घटक मिळत असल्याने हे जीव त्यात राहू शकतात. हे पोषक घटक सूक्ष्मजीवांचे अतिनील किरणांपासून संरक्षणदेखील करतात, असे संशोधनातील सहअभ्यासक अल्बर्टो मोलिनिरो ग्रासिया यांनी स्पष्ट केले. सूक्ष्मजीवांमधील स्त्राव हा खनिज कणांमध्ये एखाद्या चिकट पदार्थाप्रमाणे काम करतो. तसेच तो असंतुलन टाळून वातावरणातील मारक घटकांपासून संरक्षणासाठी सुक्ष्मजीवांमधील प्रतिकारशक्ती वाढवतो, असेही ग्रासिया यांनी स्पष्ट केले.

आयबेरुलाईटस हे सूक्ष्मजीवांना सहारा एअर लेअर्स सारख्या खंडातंर्गत असलेल्या वातावरणीय प्रवाहांवर प्रवास करण्यासाठी मदत करतात. ज्या भागात वाळवंटातील धुळीचे वहन होते, त्या भागात असे एरोसोल्स अस्तित्वात असतात, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

Published by: Amruta Abhyankar
First published: December 15, 2020, 12:43 PM IST

ताज्या बातम्या