मुंबई, 29 ऑक्टोबर : यंदाच्या सणावर कोरोनाचं सावट आहे. असं असलं तरीही आता अनलॉक झाल्यामुळे खरेदीसाठी बरेचजण बाहेर पडताना दिसत आहेत. अगदी हेअरकटिंपासून ते खरेदीपर्यंत अनेक गोष्टी घेताना आपली फसवणूक होऊ शकते. त्यामुळे ऑनलाइन इतकीच सजगता ऑफलाइन किंवा बाजारपेठेत खरेदी करताना असायला हवी.
1. बाजारपेठेत व्यापारी किंवा दुकानदार यांच्याकडून फसवणूक होऊ नये म्हणून आम्ही तुम्हाला काही खास गोष्टी सांगणार आहोत. यामुळे तुमची फसवणूक होण्याची शक्यता टाळता येईल आणि अधिक चांगल्या प्रकारे खरेदी देखील करता येऊ शकते.
2. सणासुदीच्या काळात दुकानदार त्यांच्या मार्केटिंगच्या नवनवीन युक्त्या वापरून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. यातच अनेकदा ग्राहकांची फसवणुकही केली जाते. आज आम्ही तुम्हाला अशा फसवणुकीतून वाचवण्याच्या काही टिप्स देणार आहोत.
3. कमी किंमती सांगून लुटणं- दुकानदार वस्तुची कमी किंमत सांगून ग्राहकांना ती घेण्यास भाग पाडतात. मार्केटमध्ये अशा युक्त्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. कोणताही ग्राहक एखाद्या दुकानात गेल्यावर ग्राहकाला जर वस्तूची खरंच गरज असेल तर तो रिकाम्या हाती जाणार नाही, हे दुकानदाराला पक्के ठाऊक असते. त्यामुळे कोणतीही वस्तू विकत घेताना घाई करू नका. ती वस्तू सर्वप्रकारे तपासून घ्या.
4. डिस्काऊंट स्ट्रॅटर्जी- दुकानदारांच्या डिस्काऊंट स्ट्रॅटर्जीपासून शक्यतो सावध रहा. अनेकदा मेगा सेल किंवा कॅशबॅकसारख्या ऑफर्स दुकानदार ग्राहकांना देऊ करतात. या ऑफर्सना फसत ग्राहक मोठ्या प्रमाणात शॉपिंग करतात. सामानाची खरेदी केल्यानंतर त्यांच्या लक्षात येते की, ज्या किंमतींच्या वस्तू असतात त्याच किंमतीत त्यांनी वस्तू घेतल्या असून त्यांना कोणताही डिस्काऊंट मिळालेला नाही.
5. एक सर्विस दिल्यानंतर दुसरी सर्विस घेण्यास सांगणं- ही देखील एक मार्केटिंग स्ट्रॅटर्जी आहे. यात बहुतांश लोकं फसतात. तुमच्याबाबतीतही असं अनेकदा झालं असेल की, तुम्ही केस कापायला गेले असाल आणि तुम्ही हेअर कटसोबत हेअर स्पा करून बाहेर पडता. तुम्ही दुकानदाराची दुसरी गोष्ट घेण्यास होकार दिला तर त्याच्यासाठी दुप्पट कमाई होते. त्यामुळे सणासुदीच्या काळात तुमच्याकडे पैशांची चणचण असेल तर अशा स्ट्रॅटजीपासून लांबच राहा.
6. दुकानदाराच्या बोलण्याला भुलू नका- कुणी कौतुक केल्यामुळे अधिकची खरेदी करणं- या फसवणुकीत सर्वात जास्त महिलाच असतात. सेल्समन अनेकदा ‘तुमच्यावर हे जास्त खुलून दिसतं’, असं सहज बोलतात. त्यांच्या या बोलण्यावर भुलून अनेक स्त्रिया आवश्यक नसलेल्या गोष्टीही खरेदी करतात.
7. लवकर करा नाही तर स्टॉक संपेल- मार्केटिंगच्या या युक्तीतही अनेक ग्राहक फसतात. यात ग्राहकांना शेवटची तारीख आणि शेवटचा स्टॉक यांची भिती दाखवून वस्तू खरेदी करण्यास भाग पाडले जाते. एखाद्या वस्तूची तुम्हाला नितांत गरज आहे, ती वस्तू फार विचारपूर्वक पद्धतीने घेणंच योग्य राहील. त्यात कोणतीही घाई करू नका.