दोन्ही हातांचं वेगवेगळं Blood pressure; तुमच्यासाठी धोक्याची घंटा

दोन्ही हातांचं वेगवेगळं Blood pressure; तुमच्यासाठी धोक्याची घंटा

दोन्ही हातांचा रक्तदाब (Blood Pressure) वेगळा असणं हे गंभीर आजाराचं लक्षण आहे.

  • Share this:

लंडन, 24 डिसेंबर : अलीकडे हृदयरोग (heart disease) कोणत्याही वयात, अगदी तरुणपणीही होत असल्याची अनेक उदाहरणं आपल्या आजूबाजूलाही पाहायला मिळतात. ताणतणाव, आधुनिक जीवनशैली (Modern Lifestyle), आहार अशी अनेक कारणं त्यामागे आहेत. आपल्या आरोग्याकडे योग्य पद्धतीने लक्ष ठेवणं हाच यावरचा चांगला उपाय आहे. शरीरातल्या  बारीकसारीक बदलांवरही लक्ष ठेवल्यास पुढच्या एखाद्या मोठ्या धोक्याची पूर्वसूचना आपल्याला मिळू शकते. या संदर्भातलं एक नवं संशोधन ब्रिटनमध्ये झालं आहे. आपल्या दोन्ही हातांचा रक्तदाब (Blood Pressure) वेगळा असल्याचं आढळलं, तर भविष्यात आपल्याला हृदयरोग होण्याची किंवा हृदयविकाराचा झटका (Heart Attack) येण्याची शक्यता आहे, असं हे संशोधन सांगतं. 'सीएनएन'ने या संशोधनाबद्दलचं वृत्त दिलं आहे.

या नव्या संशोधनाबद्दल पाहण्याआधी रक्तदाबाबद्दलच्या काही मूलभूत गोष्टी पाहू. 120/80 mmHg हे नॉर्मल ब्लड प्रेशर असतं. यातलं 120 हे सिस्टॉलिक (Systolic) म्हणजे वरचं आणि 80 हे डायस्टोलिक (Diastolic) म्हणजे खालचं ब्लड प्रेशर असतं. हृदय पंपासारखं कार्य करतं हे आपल्याला माहिती आहे. हृदयाचे स्नायू आकुंचन पावलेले असतात, तेव्हाचं प्रेशर सिस्टॉलिक. ते स्नायू प्रसरण पावतात म्हणजेच दोनदा धडधडण्याच्या मधल्या वेळेत शिथिल असतात तेव्हाचं प्रेशर डायस्टोलिक म्हणून ओळखलं जातं. ब्लड प्रेशर मोजण्यासाठी स्फिग्मोमॅनोमीटर (Sphygmomanometer) हे उपकरण वापरतात आणि त्यातल्या नळीत पारा (Hg) किती मिलिमीटर (mm) दर्शवेल, त्यानुसार ब्लड प्रेशर ओळखलं जातं. उदा.  120-80 mmHg

दोन्ही हातांच्या सिस्टॉलिक ब्लड प्रेशरमध्ये लक्षणीय फरक दिसत असेल, तर ती भविष्यातल्या हृदयविकाराची किंवा हार्ट अॅटॅकची पूर्वसूचना असू शकते. जागतिक पातळीवरच्या 24 अभ्यासांच्या विश्लेषणावर आधारित लेख हायपरटेन्शन (Hypertension) नावाच्या जर्नलमध्ये नुकताच प्रसिद्ध झाला आहे. त्यात संशोधकांनी ही माहिती दिली आहे. दोन्ही हातांच्या ब्लड प्रेशरमध्ये 10 mmHg यापेक्षा जास्त फरक असेल, तर हृदयविकाराचा झटका येण्याचा, नव्याने छातीत दुखण्याचा (Angina) धोका जास्त असेल. येत्या दशकभरात हे प्रमाण एक टक्क्यापेक्षा वाढत जाईल. दोन्ही हातांवरच्या ब्लड प्रेशरमधला फरक 5 mmHgपेक्षा अधिक असेल, तर ती हृदयविकार आणि त्याच्याशी संबंधित घटनांची पूर्वसूचना असेल.

हे वाचा - पौष्टिक आहेत म्हणून अति खाऊ नका; 5 पदार्थांमुळे वाढू शकतं तुमचं वजन

ब्रिटनमधल्या एक्सेटर मेडिकल स्कूल विद्यापीठातले वरिष्ठ प्राध्यापक डॉ. ख्रिस क्लार्क या संशोधनपर लेखाचे मुख्य लेखक आहेत. ते म्हणाले, "दोन्ही हातांवरच्या ब्लड प्रेशरमध्ये फरक असणं ही गोष्ट हृदय कमकुवत असण्याशी निगडित आहे, याची माहिती फार आधीपासून होती. आता मात्र अभ्यासातून हे सिद्ध झालं आहे, की दोन्ही हातांवरच्या ब्लड प्रेशरमध्ये असलेला फरक जितका जास्त, तितका हृदयविकाराचा धोका अधिक. त्यामुळे दोन्ही हातांवरचं ब्लड प्रेशर मोजणं अत्यावश्यक आहे, जेणेकरून कोणत्या पेशंटना हृदयविकाराचा धोका आहे, हे निश्चित करता येऊ शकेल"

अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या  (AHA) म्हणण्यानुसार, सिस्टॉलिक प्रेशर 120पेक्षा कमी आणि डायस्टोलिक प्रेशर 80पेक्षा कमी असेल, तर नॉर्मल मानलं जातं. दोन्ही हातांच्या ब्लड प्रेशरमधला फरक 10mmHg किंवा त्यापेक्षा कमी असेल, तर तो नॉर्मल असेल आणि काळजीचं काही कारण नसेल, असं AHAचं म्हणणं आहे. मात्र हा फरक त्यापेक्षा जास्त असेल, तर रक्तवाहिन्या (Arteries) अरुंद आणि कडक (Stiff) होत असल्याचं लक्षण असण्याची शक्यता आहे. त्याचा रक्तप्रवाहावर दुष्पपरिणाम होऊ शकतो.

हे वाचा - आरोग्य आणि जीवन विमा घ्यायचा आहे? पॉलिसी घेण्यापूर्वी या घटकांची पडताळणी आवश्यक

अमेरिका आणि ब्रिटन, युरोप यांच्यातील निकषांमध्ये थोडा फरक आहे. ब्रिटन आणि युरोपीय युनियनमधल्या शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, दोन्ही हातांच्या ब्लड प्रेशरमध्ये 15 mmHg किंवा त्यापेक्षा जास्त फरक असेल, तर ते संभाव्य हृदयविकाराचं लक्षण असू शकतं.

फ्रान्समधल्या लिमोगेस येथील ड्युपायट्रेन युनिव्हर्सिटीच्या कार्डिओलॉजी विभागाचे प्रमुख प्रा. व्हिक्टर अबोयान्स हे या संशोधनपर लेखाचे सहलेखक आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, दोन भागांमधली निरीक्षणं वेगवेगळी असल्याने या संदर्भात आंतरराष्ट्रीय निकष नव्याने तयार करण्याची गरज आहे. "दोन्ही हातांच्या ब्लड प्रेशरमधला 10 mmHg एवढा फरक नॉर्मल समजला जायला हवा, असं आम्हाला वाटतं. हृदयविकाराचा धोका निश्चित करण्याच्या चाचण्यांमध्ये, मार्गदर्शक सूचनांमध्ये याचा समावेश करायला हवा. जेणेकरून त्यांना हृदयविकार होण्याची, झटका येण्याची किंवा त्यांचा त्यात मृत्यू होण्याची शक्यता कमी करता येईल", असं अबोयान्स म्हणाले.

"तपासणीवेळी दोन्ही हातांचं ब्लड प्रेशर मोजलं जावं, असं आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक सूचनांनी आधीच सूचित केलेलं आहे. मात्र बहुतेक जणांकडून त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. दोन्ही हातांचं ब्लड प्रेशर मोजण्यासाठी थोड्या जास्त वेळाव्यतिरिक्त वेगळं काहीही लागणार नाही. पण त्यामुळे अनेकांचे जीव वाचू शकतात. त्यामुळे ज्या पेशंटना वारंवार ब्लड प्रेशर तपासावं लागतं, त्यांनी किमान एकदा तरी ते दोन्ही हातांवर तपासून घ्यावं", असा सल्ला क्लार्क यांनी दिला आहे.

Published by: Priya Lad
First published: December 24, 2020, 10:11 PM IST

ताज्या बातम्या