कोरोना काळात मधुमेही रुग्णांनी कसं राखावं आपलं आरोग्य; डॉक्टरांनी दिला सल्ला

कोरोना काळात मधुमेही रुग्णांनी कसं राखावं आपलं आरोग्य; डॉक्टरांनी दिला सल्ला

कोरोना लॉकडाऊनमध्ये मधुमेही रुग्णांच्या रक्तातील साखरेच्या पातळीत वाढ होत असल्याचं डॉक्टरांना दिसून आलं आहे.

  • Share this:

मुंबई, 29 जुलै : कोविड-19  या आजाराने जगभरात एकच हाहाकार उडवला आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढताना दिसून येत आहे. त्यात मधुमेही (dibeties) रुग्णांना कोरोनाचा धोका सर्वाधिक आहे. असं असताना कोरोना लॉकडाऊनमध्ये मधुमेही रुग्णांच्या रक्तातील साखरेच्या पातळीत अधिकच वाढ झाल्याने डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली आहे.

कोरोना काळात खाण्याच्या चुकीच्या पद्धती, ताणतणाव आणि व्यायामाचा अभाव यामुळे मधुमेही रुग्णांच्या रक्तातील साखरेच्या पातळीत वाढ होत असल्याचं डॉक्टरांना दिसून आलं आहे.

पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलचे जनरल फिजिशियन डॉ. संजय नगरकर म्हणाले की, "लॉकडाऊनदरम्यान लोकांनी मधुमेहावर नियंत्रण न ठेवल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढलेल्या रुग्णांमध्ये 7 टक्क्यांनी वाढ झाली आहे. चिंतेमुळेही मधुमेही रूग्णांच्या रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते"

कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी देशभरात लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. संसर्गापासून बचाव व्हावा, यासाठी घराबाहेर न पडण्याचे आवाहन सरकारद्वारे नागरिकांना केले जात आहे. यामुळे अनेक लोक नियमित चाचणी करण्यासाठी रुग्णालयात जाण्याऐवजी घरीच राहत आहेत. वेळीच निदान न झाल्यास आजार बळावू शकतो.

हे वाचा - हसता-बोलता कोरोना रुग्णांचा मृत्यू; लक्षणं न दिसणाऱ्यांमध्ये हॅप्पी हायापोक्झिया

अपोलो डायग्नोस्टिक्स वेस्ट इंडियाचे तंत्रज्ञ प्रमुख आणि झोनल पॅथॉलॉजिस्ट डॉ. संजय इंगळे म्हणाले की, "नागरिकांना घरी राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मात्र रक्तातील साखरेचं प्रमाण वारंवार तपासून पाहणंही अतिशय गरजेचं आहे. कारण रक्तातील साखरेची पातळी वाढल्यास रक्तप्रवाह अन्य निरोगी व्यक्तीपेक्षा खूपच कमी प्रमाणात होतो. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन मधुमेही रुग्णांना अन्य आजारांचा संसर्ग पटकन होऊ शकतो आणि त्यातून रुग्णाला बरं व्हायला वेळ लागतो"

हे वाचा - रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी प्या गरमागरम बदामाचा काढा

कोरोना काळात मधुमेही रुग्णांनी आपल्या शरीरातील ग्लुकोजची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, याबाबत तज्ज्ञांनी सल्ला दिला आहे.

डॉ. इंगळे म्हणाले, "तणावामुळे, जास्त खाल्ल्याने आणि पुरेसे इन्सुलिन न घेतल्याने साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहत नाही. त्यामुळे अनेकदा थकवा जाणवणे, तहान आणि मधुमेहाच्या केटोसिडोसिसची लक्षणं दिसू लागतात. त्यामुळे वेळोवेळी आपल्या रक्तातील साखरेची मात्रा तपासून पाहण्यासाठी ग्लुकोमीटर किंवा ग्लुकोज मॉनिटर वापरावे. हे अतिशय फायदेशीर ठरू शकतं"

हे वाचा - उच्च रक्तदाबावर नियंत्रणासाठी फायदेशीर ओव्याचे पाणी

"याशिवाय रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी भरपूर पाणी प्या, फळे आणि हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करा. नियमित व्यायाम करा, योगा, प्राणायाम, आणि श्वासोच्छवासाचा सराव करा. यामुळे ताणतणाव कमी होतो. तसंच कोणतीही समस्या असल्यास फोनद्वारे संपर्क साधून डॉक्टरांचा सल्ला घ्या. आपल्या रक्तातील साखरेच्या पातळीनुसार इन्सुलिन डोस सेट करा. डॉक्टरांनी सांगितलेल्या वेळेत आपले इन्सुलिन घ्या. नियमित तपासणी करून निरोगी आयुष्य जगा",असा सल्ला डॉ. नगरकर यांनी दिला आहे.

Published by: Priya Lad
First published: July 29, 2020, 8:10 AM IST

ताज्या बातम्या