तुम्ही खाताय बनावट जिरे? जाणून घ्या कशी ओळखायची भेसळ

तुम्ही खाताय बनावट जिरे? जाणून घ्या कशी ओळखायची भेसळ

बनावट जिरे तयार करणाऱ्या फॅक्टरीवर छापा टाकण्यात आला असून त्या ठिकाणी तब्बल 19 हजार किलोचे जिरे जप्त करण्यात आले आहेत. याचा पुरवठा देशासह परदेशातही केला जात असल्याचं समोर आलं आहे.

  • Share this:

मुंबई, 20 नोव्हेंबर : जेवणात वापरल्या जाणाऱ्या मसाल्याच्या पदार्थांमध्ये जिऱ्यांचा समावेश असतो. भाजी, डाळ, रायता यापासून अनेक देशी औषधांमध्येही याचा वापर केला जातो. मात्र, बनावट जिरे बाजारात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दिल्लीतील पोलिसांनी अशा एका फॅक्ट्रीवर छापा टाकून नकली जिरे तयार केले जात असल्याचा प्रकार उघडकीस आणला आहे. या ठिकाणी तब्बल 19 हजार किलो वजनाचे जिरे जप्त करण्यात आलं आहे. हे जिरे गवत, दगडाचा चुरा आणि इतर पदार्थांपासून तयार केले जात होते.

राजस्थान आणि गुजरातमध्ये सुरु असलेला हा बनावट जिरे तयार करण्याचा उद्योग आता दिल्लीपर्यंत पोहचला आहे. राजधानीत पहिल्यांदाच अशी कारवाई करण्यात आली आहे. बनावट जिरे आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहेत. यामुळे फक्त मुतखड्याचाच नाही तर शरीराच्या रोग प्रतिकार क्षमतेवरही परिणाम होऊ शकतो. तसेच हे जिरे कर्करोगाचे कारण होऊ शकतात. जिऱ्यांची भेसळ धोकादायक असून सर्वसामान्यांच्या जिवांशी खेळ सुरू आहे.

बनावट जिरे तयार करण्यासाठी एका खास प्रकारच्या गवताचा वापर केला जातो. त्याला गुळाच्या पाण्यात टाकून नंतर वाळवण्यात येतं. या गवताचा रंग जिऱ्यांसारखा होतो. पुन्हा जिरे चमकण्यासाठी त्याला दगडाच्या पावडरसोबत मिसळलं जातं. गुजरात आणि राजस्थानमध्ये नकली जिऱ्यांचा उद्योग काही महिन्यांपासून सुरु आहे. या ठिकाणी छाप्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर बनावट जिऱ्यांसाठीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. फक्त देशातच नाही तर देशाबाहेर हे जिरे पाठवले जातात.

कसे ओळखायचे बनावट आणि खरे जिरे

तुमच्याकडे असलेले जिरे खरे की नकली हे ओळखण्यासाठी ते एक वाटी पाण्यात टाका. बनावट जिरे विरघळायला सुरु होते आणि ते फुटतात. त्यांचा रंग निघतो. मात्र जे जिरे ओरिजनल असतात ते पाण्यात टाकल्यानंतरही बदलत नाहीत.

जिरे आरोग्यासाठी फायद्याचे

जिऱ्यांचा वापर जेवणात जितका चवीसाठी होतो तितकाच तो आरोग्यासाठीही केला जातो. फक्त एक महिना काळे जिरे खाल्ल्यास शरिराती चरबी कमी होते. तसेच वजन कमी करण्यासही त्याची मदत होते.

वातावरणात बदल झाल्यानंतर होणाऱ्या सर्दी पडसे या आजारांवरही जिऱे उपयोगी पडतात. एक महिना दररोज चिमुटभर काळे जिरे खाल्ल्याने शरीरात रक्त प्रवाह वेगाने होतो. यामध्ये कोलेस्ट्रॉल कमी करण्याची क्षमता असते तसेच रक्तदाबही नियंत्रणात राहतो.

पोटविकारांवरसुद्धा जिऱ्यांचा उपयोग होतो. सकाळी रिकाम्या पोटी जिरे खाल्ल्यास अॅसिडिटीच्या त्रासातून सुटका होते. काळे जिरे पचनशक्ती सुधारतात. या जिऱ्यांमध्ये अँटी मायक्रोबिअल गुण असतात यामुळे पोटाचे विकार होत नाहीत. जिरे खाल्यामुळे पचनक्रिया वेगानं होते. यामुळे चरबीचा त्रास कमी होतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 20, 2019 01:30 PM IST

ताज्या बातम्या