नवी दिल्ली, 01 डिसेंबर : काही कोरोना लशी (corona vaccine) क्लिनिक ट्रायलच्या तिसऱ्या टप्प्यात आहे. त्यांचे सुरुवातीचे परिणाम सकारात्मक दिसून आले आहेत. आता भारतानं तयार केलेली कोरोना लश कोवॅक्सिनच्या (Covaxin) ट्रायलकडेही सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. या लशीचं (covid 19 vaccine) तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरू झालेलं असून या लशीचा परिणाम कसा असेल, याची उत्सुकता सर्वांना आहे. दरम्यान तिसऱ्या टप्प्यातील चाचणीत सहभागी होणाऱ्या दिल्लीती एम्सच्या (Aiims) डॉक्टरनं या लशीच्या परिणामाबाबत मोठी माहिती दिली आहे.
एम्सच्या प्रमुख न्यूरोसायन्सेस डॉ. एमव्ही पद्मा श्रीवास्तव यांनी ही लस घेतली आहे. गेल्या आठवड्यात त्या तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलमध्ये सहभागी झाल्या होत्या. त्यांना लशीचा पहिला डोस देण्यात आला आहे.
डॉ. श्रीवास्तव यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितलं की, ट्रायलमध्ये सहभागी झालेल्या एका व्यक्तीनं तिला दुष्परिणाम झाल्याचं जाणवलं. गेल्या गुरुवारी मी दिल्लीतील एम्समध्ये कोवॅक्सिनचा पहिला डोस घेतला होता. आतापर्यंत तरी मला कोणताच साइड इफेक्ट झाला नाही. आता त्यानंतर 28 दिवसांनी मला दुसरा डोस दिला जाणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एम्समध्ये आतापर्यंत 40 ते 50 जणांनी तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी नोंदणी केली आहे, ज्यांना पहिला डोस देण्यात आला आहे. एक हजार पेक्षा जास्त लोकांची नोंदणी करण्याची योजना एम्सची आहे.
हे वाचा - Moderna कंपनीनं दिली GOOD NEWS! गंभीर कोरोनावर 100% प्रभावी ठरली लस
भारत बायोटेक (Bharat Biotech) आणि इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) तयार केलेली ही लस. या लशीचं तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरू आहे. याच महिन्यात हे ट्रायल सुरू झालं आहे. सुरुवातीला ही लस पुढील वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीपर्यंत येण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र त्याआधीच ही लस लाँच केली जाणार आहे, अशी माहिती आयसीएमआरचे शास्त्रज्ञ आणि कोव्हिड टास्क फोर्सचे सदस्य रजनी कांत यांनी याआधी दिली होती.
हे वाचा - तुमच्यापर्यंत कशी पोहोचणार CORONA VACCINE? एका क्लिकवर पाहा मोदी सरकारचा प्लॅन
रॉयटर्सनं दिलेल्या वृत्तानुसार रजनी कांत म्हणाले, "लशीचा परिणाम चांगला दिसून आला आहे. प्राण्यांवरील चाचणी आणि माणसांवरील पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील ट्रायलमध्ये ही लस सुरक्षित आणि प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे. तशी ही लस सुरक्षित आहे मात्र तरी तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल पूर्ण होईलपर्यंत 100% हमी देऊ शकत नाही"