नवी दिल्ली, 09 डिसेंबर : यूकेमध्ये कोरोना लशीच्या (corona vaccine) आपात्कालीन वापराला (Emergency Use Authorization) मंजुरी मिळाल्यानंतर भारतातही कोरोना लस (corona vaccine in india) उत्पादक कंपन्यांनी आपल्या लशीच्या आपात्कालीन वापरासाठी अर्ज केले होते. मात्र भारतात कोरोना लशीला आपात्कालीन वापराला मंजुरी मिळण्याची शक्यता कमीच आहे. कारण या अर्जावर सध्या विचार केला जाणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
भारतात हैदराबादमधील भारत बायोटेकनं (Bharat Biotech) कोवॅक्सिन आणि पुण्यातील सीरम इन्स्टिट्युटने (Serum Institute of India) कोव्हिशिल्ड या कोरोना लशीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी द्यावी यासाठी अर्ज केला होता. भारतीय औषध नियामक मंडळाकडे (Drugs Controller General of India) म्हणजे DCGI कडे ही मागणी करण्यात आली आहे.
या लशींचं तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरू आहे. लशीच्या सुरक्षिततेबाबत पुरेसा डाटा उपलब्ध नाही. त्यामुळे आपात्कालीन वापराबाबत डीजीसीआय अद्याप तरी विचार करणार नाही, अशी माहिती मिळते आहे.
हे वाचा - भारतात कोरोना लशीला आपात्कालीन मंजुरी मिळणं सोपं नाही; काय आहेत कारणं वाचा
भारतात सर्वात आधी Pfizer ने EUA साठी परवानगी मागितली होती. नंतर सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने देखील आपल्या 'कोविशिल्ड लशीच्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मागितली आणि त्यापाठोपाठ भारत बायोटेकने लशीकरण सुरू करण्यासाठी तातडीने परवानगी देण्यासंदर्भात अर्ज केला होता.
मात्र या लशीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी नाकारल्याच्या बातम्या समोर आल्या. मात्र असं काहीही नसल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.
हे वाचा - क्या बात है! फक्त फोटो, सेल्फी नाही; तर SMARTPHONE CAMERA कोरोना टेस्टही करणार
त्यामुळे कदाचित पुढच्या वर्षातच लस मिळण्याची आशा आहे. यासाठी मोदी सरकारनं तयारीही सुरू केली आहे. कोरोना लशीकरण मोहीम राबवली जाणार आहे. लशीकरण सुरू केल्यानंतर प्रथम कुणाला कोरोनाची लस टोचता येणार याचा प्लॅन आरोग्य मंत्रालयाने तयार केला आहे. कोरोना लशीचं वितरण करण्यासाठी CO-WIN हा कॉप्युटराइज्ड प्रोग्रॅम तयार करण्यात आला आहे. CO-WIN APP ही तयार करण्यात आलं आहे. लशीकरणात 30 कोटी जनतेला प्राधान्य दिलं जाईल. यामध्ये एक कोटी आरोग्य कर्मचारी, दोन कोटी फ्रंटलाइन वर्कर्स आणि इतर 27 कोटींमध्ये 50 पेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती आणि इतर आजार असलेल्या व्यक्तींचा समावेश असेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.