इंदूर, 17 डिसेंबर : लग्नाच्या नावाखाली फसवणुकीचे प्रकार काही नवे नाहीत. लग्नानंतरही जोडीदाराच्या विवाहबाह्य संबंधांमुळे संसार उद्धवस्त झाले आहेत. फसवणुकीच्या या प्रकारात पुरुष आणि महिला या दोघांचाही सहभाग वारंवार उघड झाला आहे. आता आणखी एका धोकेबाज महिलेचं प्रकरण उघडकीस आले आहे. ही महिला एका नवऱ्याकडून तिच्या पालनपोषणाचा खर्च मागत होती. त्याचवेळी दुसऱ्या पुरुषाशी लग्न करुन त्याच्या पैशांवर तिचं मस्त आयुष्य सुरू होतं. तब्बल तीन वर्षांनी या प्रकरणातलं सत्य समोर आलं.
काय आहे प्रकरण?
मध्य प्रदेश (M.P.) इंदूरमधील (Indore) शहजाद या व्यक्तीचे लग्नानंतर पत्नीशी पटत नव्हते. त्यांच्यात जवळपास रोज वाद होत असत. या भांडणाला कंटाळून शहजादची पत्नी माहेरी वडिलांकडे निघून गेली. त्यानंतर तिने शहजाद विरुद्ध कोर्टात केस दाखल केली. कोर्टानं या प्रकरणात दिलेल्या आदेशानंतर शहजाद तिला दरमहा 5 हजार रुपये देत होता.
दरम्यान, पत्नीची वागणूक पाहून तिचे दुसरे लग्न झाले असावे असा संशय शहजादला होता. त्याने सुमारे तीन वर्ष पत्नीवर पाळत ठेवून सर्व पुरावे गोळा केले आणि कोर्टासमोर सादर केले. कोर्टानं हे पुरावे पाहिल्यानंतर शहजादची पत्नी आणि सासऱ्यांच्या विरोधात केस दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.
काही महिन्यांपूर्वीही घडला होता प्रकार
मध्य प्रदेश पोलिसांनी चार महिन्यांपूर्वी देखील अशा प्रकारची फसवणूक करणाऱ्या मिनाक्षी नावाच्या विवाहित महिलेला अटक केली होती. मिनाक्षीनं अवघ्या सहा महिन्यात गुजरातमध्ये तीन आणि राजस्थानात एक लग्न केलं होतं.
पोलिसांना महेंद्र कलाल या 29 वर्षांच्या व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. महेंद्रच्या खिशात मोबाईल फोन आणि 4500 रुपये सापडले होते. त्यानंतर पोलिसांनी तपास केल्यानंतर महेंद्रचं लग्न मिनाक्षीशी झालं असल्याची माहिती समोर आली. लग्नासाठी महेंद्रकडून मिनाक्षीला 10 हजार रुपये देखील मिळाले होते. लग्नानंतर काही दिवसांनीच त्याचा मृतदेह सापडला.