मुंबई, 16 ऑक्टोबर : जगात वेगवेगळे ट्रेंड (trend) येत असतात, त्यापैकी काही ट्रेंड खूपच विचित्र असतात. सध्या असाच एक ट्रेंड जगभर पाहायला मिळतो आहे, तो म्हणजे गायीला मिठी मारणं (Cow huggingh). भारत आणि दक्षिण आशियातील निम्म आणि मध्यम आर्थिक स्थितीतील देशांच्या नागरिकांच्या दैनंदिन आयुष्यातील एक गोष्ट. हॉलंड (holland) म्हणून प्रसिद्ध असलेल्या नेदरलँडमधील (Netherlands) रूवर या ग्रामीण भागातून सुरू झालेला हा ट्रेंड आता जगभरात पोहोचला आहे. कोरोना काळात जगभरात काऊ हगिंग ट्रेंड होऊ लागला.
हॉलंडच्या रूवरमध्ये को नफलेन (डच भाषेत Koe Knuffelen) म्हणजे गायीला मिठी मारण्याची पद्धत रूढ झाली आणि आता ती जगभर ट्रेंड होते आहे. हा ट्रेंड अमेरिका, रॉटरडम, स्वित्झर्लंड अशा श्रीमंत देशांमध्येही पोहोचला आहे. या देशांमध्ये गायीला मिठी मारण्यासाठी खास सामुदायिक कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं आहे.
अॅनिमल थेरेपीतून हे सिद्ध झालं आहे की कोणत्याही पाळीव प्राण्याच्या संपर्कात माणूस आला की त्याला मानसिक शांतता मिळते, ताण कमी होतो. मिठी मारण्यासाठी सर्वांत प्रेमळ जनावर म्हणजे गाय आहे 2007 मधील एका संशोधनातून दिसून आलं आहे. जगभरातील ग्रामीण भागात गायींचं किंवा म्हशीचं दूध काढण्यापूर्वी त्यांना प्रेमानं कुरवाळलं जातं, म्हणजे ती गाय भरपूर दूध देते हे सर्वांना माहीत आहे. त्याच आधारावर जर तुम्ही गायीला मिठी मारली तर तुमचं मनही शांत होतं हेही तितकंच खरं आहे. बीबीसीच्या वृत्तानुसार गाईला मिठी मारली तर सकारात्मक ऊर्जा मिळते आणि माणसाच्या शरीरातील ऑक्सिटोसिन हे हॉर्मोन स्रवतं. त्यामुळे त्यांचं मन शांत होतं.
हे वाचा - कसं शक्य आहे? सहारा वाळवंटात आढळली 1.8 अब्ज झाडं, सॅटेलाइट PHOTO आले समोर
कोरोना महासाथीमुळे जगभर लॉकडाउन लागू झाला आणि सगळे घरात अडकून पडले. त्यामुळे एकाकीपणा प्रचंड वाढला त्यातूनच हा ट्रेंड प्रचंड लोकप्रिय झाला आहे. लॉकडाऊन आणि कोरोनाची भीती यामुळे लोक एकटे पडले आहेत. त्यामुळे संवाद हरवला आहे. सामाजिक कार्यक्रम होत नाही आहेत. या एकटेपणामुळे जगात मानसिक आजार वाढले आहेत. या काळात पाळीव प्राणी पाळण्याचं प्रमाण कमी झालं आहे. पण एका संस्थेच्या सर्वेक्षणातून लक्षात आलं आहे की एकटेपणामुळे लोक पशूसंवर्धन केंद्रात जाऊन पाळीव प्राण्यांसोबत खेळत आहेत आणि त्यांची सेवा करण्यात वेळ घालवण्याला प्राधान्य देत आहेत.
हे वाचा - शापाच्या भीतीने 2005 मध्ये चोरलेले प्राचीन अवशेष पाठवले परत, व्यक्त केली दिलगिरी
भारत, दक्षिण आशियाई देशात गायींसोबत खेळणं आणि त्यांच्यावर प्रेम करून त्यांची सेवा करणं काही नवं नाही. ही पाळीव जनावरं शेतकरी आणि पशूपालन करणाऱ्या कुटुंबाचा अविभाज्य भाग असतात. दहा वर्षांपूर्वी हॉलंडमधील गावात एक मजा, विरंगुळा म्हणून गायीला मिठी मारली जाऊ लागली. आता त्याला एका चळवळीचं रूप मिळालं आहे. लोकांनी निसर्गाशी जोडलेलं राहवं आणि निसर्गासह जास्तीत जास्त वेळ घालवावा यासाठी एक मोहीम म्हणून जनजागृती करण्यात आली.
अमेरिका, स्वित्झर्लंड, रॉटरडम यासारख्या श्रीमंत देशांची प्रगतीच्या नादात ग्रामीण जीवनाशी असलेली नाळ तुटली आहे. पण गायीला मिठी मारल्याने मिळणाऱ्या शांतीचा अनुभव मात्र त्यांना खूप आवडत आहेत. हॉलंडमधील ही मोहीम जेव्हा या देशात पोहोचली तेव्हा ती लोकप्रिय झाली आणि जागतिक ट्रेंड बनली.