नवी दिल्ली, 24 डिसेंबर: कोरोनाबाधितांच्या (Coronavirus) संख्येत पुन्हा काहीशी वाढ होत असल्याच्या, तसंच ब्रिटनमध्ये नवा विषाणू (New strain of coronavirus in UK) आढळल्याच्या पार्श्वभूमीवर एक दिलासादायक बातमी आली आहे. कोविड-19चा (COVID-19) एकदा संसर्ग (Infection) झाला असेल, तर भविष्यातल्या संसर्गांपासून काही प्रमाणात संरक्षण मिळू शकतं, असं संशोधकांना आढळलं आहे. कोरोना विषाणूच्या अँटिबॉडीज (Antibodies) ज्यांच्या शरीरात तयार झाल्या आहेत, त्या व्यक्तींना पुढचे किमान सहा महिने तरी पुन्हा कोरोनाची लागण होण्याची शक्यता कमी आहे, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.
हे निष्कर्ष कोरोनाच्या लसीसाठीही (Vaccine) चांगले असल्याची चिन्हं दिसत आहेत. कारण लसीमुळे प्रतिकारशक्तीला (Immunity) चालना मिळून शरीरात अँटिबॉडीजची निर्मिती केली जाणार आहे. त्यामुळे विषाणूला नष्ट करण्यात त्यांची मदत होणार आहे.
ज्यांना आपोआप कोरोनाची लागण झाली आहे, त्यांच्या शरीरातल्या अँटिबॉडीजपासून त्यांना प्रभावी लसीइतकंच संरक्षण मिळणार आहे. अमेरिकेच्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. नेड शार्पलेस यांनी ही माहिती दिली. अशा व्यक्तींना पुन्हा विषाणूची लागण होण्याची शक्यता फार दुर्मीळ असेल, असं ते म्हणाले.
सध्या कोरोना विषाणूमुळे जगभर साथ पसरली असल्यामुळे या कॅन्सर इन्स्टिट्यूटमधले बहुतांश संशोधक कॅन्सरच्या संशोधनाकडून कोरोनाच्या संशोधनाकडे वळले आहेत.
या संशोधनासाठी दोन चाचण्या घेण्यात आल्या. रक्तातल्या अँटिबॉडीज प्रत्यक्ष लागण झाल्यापासून अनेक महिने राहतात. त्यामुळे त्यांची चाचणी घेण्यात आली. तसंच, नाकातला स्राव किंवा अन्य नमुन्यांचीही चाचणी करून विषाणूच्या अस्तित्वाचा शोध घेण्यात आला.
'न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन'मध्ये नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासात ब्रिटनमधल्या ऑक्सफर्ड (Oxford) युनिव्हर्सिटी हॉस्पिटल्समधल्या 12 हजार 500 हून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश होता. त्यापैकी 1265 जणांच्या शरीरात कोरोना विषाणूच्या अँटिबॉडीज होत्या. त्यापैकी दोघांच्याच टेस्ट सहा महिन्यांत पुन्हा पॉझिटिव्ह आल्या. त्यांच्यामध्ये कोणतीही लक्षणे दिसत नव्हती.
याउलट, 11 हजार 364 कर्मचाऱ्यांच्या शरीरात अँटिबॉडीज नव्हत्या. त्यापैकी 223 जण सहा महिन्यात पुन्हा पॉझिटिव्ह आले.
नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटने (National Cancer Institute) तीस लाख लोकांच्या अँटिबॉडी टेस्ट अमेरिकेतल्या दोन खासगी प्रयोगशाळांमधून करून घेतल्या. ज्यांच्या शरीरात आधी अँटिबॉडीज होत्या, त्यांच्यापैकी केवळ 0.3 टक्के जणांची टेस्ट कोरोना पॉझिटिव्ह आली. ज्यांच्या शरीरात अँटिबॉडीज नव्हत्या, त्यापैकी 3 टक्के जणांच्या टेस्ट्स पॉझिटिव्ह आल्या.
ऑक्सफर्डच्या संशोधकांनीही अशाच प्रकारचे निष्कर्ष काढले, हे आनंददायी आहे, असं शार्पलेस यांनी म्हटलं आहे.
हे निष्कर्ष आश्चर्यकारक नाहीत; पण माहिती असलेल्या सत्यावर शिक्कामोर्तब करणारे आहेत. कारण विषाणूविरोधात प्रतिकारशक्ती निर्माण होणे ही सामान्य गोष्ट आहे, ही गोष्ट ते लोकांना पटवून देत आहेत, असं मत मेम्फिस इथल्या सेंट ज्यूड चिल्ड्रन्स रिसर्च हॉस्पिटलच्या संसर्गजन्य रोग विभागप्रमुख जोशुआ वुल्फ यांनी व्यक्त केलं.
कदाचित अँटिबॉडीजद्वारे थेट संरक्षण मिळत नसेल; पण टी सेल्स किंवा प्रतिकारशक्ती असलेल्या अन्य पेशी या विषाणूच्या नव्याने संपर्कात आल्यानंतर योग्य प्रकारे काम करत असल्याचे लक्षण यातून दिसत असेल, असं जोशुआ यांनी सांगितलं.
लोकांनी पुन्हा इन्फेक्शन होऊ न देण्याची काळजी घेतली पाहिजे. ही इम्युनिटी (प्रतिकारशक्ती) किती काळ राहील, हे आपण सांगू शकत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.