मुंबई, 23 ऑक्टोबर : खोकताना किंवा शिंकताना नेहमी तोंड आणि नाकाजवळ रूमाल धरावा, असं सांगितलं जातं. आता तर कोरोनाव्हायरसपासून बचाव करण्यासाठी म्हणून मास्क (mask) वापरणंच बंधनकारक करण्यात आलं आहे. मास्क वापरण्याचा सल्ला वारंवार दिला जातो. मात्र काही जणांना अजूनही मास्कचं महत्त्व पटलं नाही आहे. मास्क घातला नाही तर किती मोठा धोका उद्भवू शकतो, हे नुकत्याच झालेल्या एका संशोधना दिसून आलं आहे.
आयआयटी मुंबईने (IIT BOMBAY) मास्कबाबत संशोधन केलं, जे फिजिक्स ऑफ फ्लुईड्स या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालं आहे. एखादी व्यक्ती खोकली किंवा शिंकली तर त्यातून निर्माण होणारा कफ क्लाऊड (COUGH CLOUDE) म्हणजेच तोंडातील ड्रॉपलेट्स बाहेर पडून हवेत तयार होणारा त्यांचा समूह हा मास्क न वापरल्यास 23 पटींनी घातक ठरतो आणि मास्क वापरला तर 23 पटींनी कमी होतो, असं या संशोधनात दिसून आलं.
संशोधक अमित अग्रवाल आणि रजनीश भारद्वाज यांना असं आढळलं की, मास्क न लावता खोकल्यामुळे तयार होणार कफ क्लाऊड हा सर्जिकल मास्क वापरल्यानंतर तयार होणाऱ्या कफ क्लाउडच्या तुलनेत 7 पटींनी आणि N95 मास्कच्या तुलनेत 23 पट अधिक आहे. कोणत्याही व्यक्तीच्या संरक्षणासाठी तयार केलेल्या मास्कमुळे हवेतील सूक्ष्मातील सूक्ष्म कण त्याच्या श्वासोच्छवासात जाऊ नयेत हाच उद्देश असतो. मास्क लावला असला किंवा नसला तरीही हा कफ क्लाउड पाच ते आठ सेकंद हवेत राहतो आणि त्यानंतर तो पसरतो असं निरीक्षणही या अभ्यासात मांडण्यात आलं आहे.
हे वाचा - धक्कादायक: दूषित हवा ठरतेय बाळांच्या मृत्यूचं कारण; आकडेवारी ऐकून थक्क व्हाल !
महामासाथीच्या प्रसाराची कारणं शोधण्याच्या दृष्टिने खोकताना किंवा शिंकताना नाक आणि तोंडावाटेबाहेर पडणारी हवा आणि ती आजूबाजूच्या हवेत मिसळणं हे कसं घडतं हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे, असं या संशोधकांनी म्हटलं आहे. खोकला किंवा शिंकल्यानंतर श्वासोच्छवासातून बाहेर पडलेले कण प्रसारित होण्याच्या दृष्टिने पहिली पाच ते आठ सेकंदं अत्यंत महत्त्वाची आहेत असंही त्यांचं मत आहे. खोकल्यानंतर बाहेर पडलेल्या शिंतोड्यांच्या तुलनेत कफ क्लाऊडचा आकार 23 पट अधिक असतो.
हे वाचा - भारतात स्वस्तात मिळणार CORONA VACCINE; पाहा एका डोससाठी किती रुपये द्यावे लागणार
मास्क वापरल्यामुळे कफ क्लाउड निर्माण होण्याच्या प्रमाणात प्रचंड प्रमाणात घट होते आणि त्यामुळेच संसर्गाचा धोका कमी होतो. शर्टच्या बाहीवर किंवा हाताच्या कोपऱ्यात शिंकणं आणि हातरुमाल वापरणं यामुळे कफ क्लाउडच्या प्रवासाचं अंतर खूप कमी होतं आणि त्यामुळे बाहेर पडणाऱ्या शिंतोड्यांचं आकारमानही कमी होतं त्याने विषाणूचा संसर्ग रोखला जातो. त्यामुळेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी वापरायला सांगितलेला चेहऱ्याचा मास्क हा 2020 मधील अत्यावश्यक वस्तूंच्या यादीतील एक झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Coronavirus, Mask