लंडन, 11 नोव्हेंबर : कोरोनाव्हायरसची (coronavirus) लागण झाल्यानंतर शारीरिक त्रासाबरोबरच मानसिक त्रासही होत असल्याचं समोर येत आहे. कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेल्या 20 टक्के रुग्णांमध्ये 90 दिवसांच्या आत मानसिक आजारांची (mental illness) लक्षणं दिसून आली आहेत. चिंता, नैराश्य आणि निद्रानाश ही सामान्य लक्षणं या कोरोनातून बाहेर आलेल्या व्यक्तींमध्ये दिसून आली आहेत. त्याचबरोबर स्मृतिभ्रंश, मेंदूचा तोल जाणं असे गंभीर मानसिक आजार होण्याची शक्यताही संशोधकांना आढळून आली आहे.
द लॅन्सेट सायकियाट्री जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या या अभ्यासात अमेरिकेतील जवळपास 69 दशलक्ष लोकांच्या आरोग्याच्या नोंदींचं इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं विश्लेषण नोंदवलं गेलं आहे. यामध्ये 62,000 हून अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा समावेश आहे.
सलग तीन महिने कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमधील 5 पैकी एका रुग्णात पहिल्यांदा चिंता, नैराश्य किंवा निद्रानाश यांची लक्षणं दिसून आली. याच काळात रुग्णांच्या इतर गटांपेक्षा या गटातील प्रमाण दुप्पट होते, असंदेखील निरीक्षण संशोधकांनी नोंदवलं आहे. त्याचबरोबर पूर्वीपासून मानसिक आजार असलेल्या रुग्णांना कोरोना पॉझिटिव्ह होण्याचा धोका 65 टक्के अधिक आहे.
ब्रिटनच्या ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीत मानसोपचार शास्त्राचे प्राध्यापक असलेल्या पॉल हॅरिसन म्हणाले, "कोविडमधून बऱ्या झालेल्या रुग्णांना मानसिक आजार होण्याचा मोठ्या प्रमाणात धोका आहे याची चिंता लोकांना लागली आहे. आणि आमचं संशोधन तेच दाखवतं आहे. जगभरातील डॉक्टरांनी आणि वैज्ञानिकांनी यावर नवीन उपचार पद्धतीचा शोध लावून तात्काळ उपचार करण्याची गरज आहे. आमच्या संशोधनातील आकडेवारी कदाचित मानसिक आजार होणाऱ्यांची संख्या कमी दाखवेल पण त्याची वाट न पाहता आपण सेवा आणि उपचार देण्यासाठी तयार राहणं गरजेचं आहे"
हे वाचा - आता TATA करणार Covid test; फक्त 75 मिनिटांत अचूक निदान करण्याचा दावा
या संशोधनात थेट सहभाग नसलेल्या मानसोपचार तज्ज्ञांनी सांगितलं की, कोरोनाचा मेंदू आणि मनावर परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे मानसिक आजारांचा धोका वाढतो या निरीक्षणाला अभ्यासामुळे बळ मिळालं आहे. तसंच मानसिक आजार होऊ शकत असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन येथील मानसोपचार सल्लागार मायकेल ब्लूमफिल्ड यांनी याविषयी सांगितलं, कोरोनामुळे शरीरावर आणि मनावर होणाऱ्या परिणामांमुळे हे मानसिक ताणतणाव निर्माण झाले असावेत.
हे वाचा - आता सहजासहजी शरीरात घुसू शकणार नाही CORONA; शास्त्रज्ञांनी शोधला उपाय
दरम्यान किंग्ज कॉलेज लंडन येथील मानसशास्त्राचे प्रोफेसर सायमन वेस्ली म्हणाले की, "ज्या व्यक्ती पूर्वीपासून मानसिक आजाराने ग्रस्त आहेत त्यांना देखील कोरोना होण्याची शक्यता अधिक आहे हे या अभ्यासातलं निरीक्षण आहे. या आधीच्या संक्रामक आजारावेळीही अशीच निरीक्षणं नोंदवली आहेत. कोरोनाचा मध्यवर्ती मज्जासंस्थावर परिणाम होत असल्यानं मानसिक आजार होत असावेत.