वॉशिंग्टन, 30 ऑक्टोबर : कोरोनाव्हायरसने (coronavirus) जगभर धुमाकूळ घातला आहे. यातून अनेक रुग्ण बरे होत आहेत. पण त्यानंतर त्यांच्या शरीरात तयार होणाऱ्या कोरोनाविरोधातील अँटिबॉडीज (antibody) फार काळ शरीरात टिकत नसल्याचं विविध संशोधनांतून समोर आलं होतं. मात्र नव्या संशोधनातून दिलासादायक माहिती मिळाली आहे. कोरोनाविरोधात शरीरातील अँटिबॉडीज किमान पाच महिने राहतात, असं दिसून आलं आहे.
अमेरिकेतील माउंट सिनाई या रुग्णालयातील संशोधकांनी हा अभ्यास केला. सायन्स जर्नलमध्ये हे संशोधन प्रकाशित करण्यात आलं आहे. रुग्णालयातील रुग्णांची ELISA टेस्ट करण्यात आली. मार्च ते ऑक्टोबर 2020 या कालावधीत हा अभ्यास करण्यात आला. ऑक्टोबरच्या सुरुवातीला या हॉस्पिटलमध्ये 72,401 जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. त्यामध्ये 30,082 जण हे पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्याचबरोबर या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात अँटीबॉडीजदेखील आढळून आल्या.
हे वाचा - Corona test : आता एका मिनिटात श्वासातून कळणार तुम्ही Covid पॉझिटिव्ह आहात का?
लंडनच्या इम्पिरियल कॉलेजमधील अभ्यासानुसार इंग्लंडमधील हजारो लोकांमध्ये अँटीबॉडी कमी होत असल्याचं आढळलं आहे. मात्र या संशोधनात त्याच्या उलट दिसून आलं.
मुख्य अभ्यासक फ्लोरियन क्रॅमर यांनी सांगितलं, कोरोनाव्हायरसविरोधातील अँटिबॉडीजबाबत आमचं निरीक्षण इतर अभ्यासापेक्षा उलटं आहे ज्यांना सौम्य किंवा माध्यम स्वरूपाचा कोरोना आजार झाला आहे अशा 90 टक्क्यांहून अधिक नागरिकांमध्ये अँटीबॉडीचा प्रतिसाद विषाणूला निष्क्रिय करण्याइतका बळकट होता आणि अनेक महिने ही क्षमता टिकली.
हे वाचा - गुड न्यूज! डिसेंबरपर्यंत भारताला मिळणार कोरोनाची लस, पुण्यातून आली मोठी बातमी
या चाचणीच्या मदतीने आम्ही अभूतपूर्व वेगाने आणि योग्य निदान चाचणी राबवू शकलो, असं या अभ्यासात सहभागी झालेले संशोधक कार्लोस कॉर्डन-कार्डो यांनी सांगितलं. त्याचबरोबर या चाचणीच्या मदतीने भविष्यकाळात कोरोनासंबंधी लस तयार करताना आणि आणखी माहिती मिळण्यास मदत होणार असल्याचंदेखील कार्डो म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.