कोरोना लशीसाठी माध्यम असलेलं Cowin नेमकं आहे तरी कसं; 10 वैशिष्ट्यं

कोरोना लशीसाठी माध्यम असलेलं Cowin नेमकं आहे तरी कसं; 10 वैशिष्ट्यं

कोरोना लसीकरणाच्या (corona vaccination) मोहिमेची सर्व माहिती देण्यासाठी सरकारच्या वतीनं Cowin App लवकरच उपलब्ध होणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 07 जानेवारी : जगातील 18 देशांमध्ये कोव्हिड 19 वरील (Covid 19) लसीकरणाची (Vaccination) मोहीम सुरू झाली आहे. भारतातही 13 जानेवारीपासून लसीकरणाची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचं सरकारनं जाहीर केलं आहे. भारतात सीरम इन्स्टिट्यूटची (Serum Institute) कोव्हीशिल्ड (CovieShield) आणि भारत बायोटेकची (Bharat Biotech) कोव्हॅक्सिन (Covaxin) या लशींना आपात्कालीन वापराची परवानगी देण्यात आली आहे. या लसीकरणाच्या मोहिमेची सर्व माहिती देण्यासाठी सरकारच्या वतीनं कोविन अॅप (Cowin App) लवकरच दाखल करण्यात येणार आहे.

या अॅपच्या माध्यमातून कोव्हिड 19 लसीकरणासाठी मोफत नोंदणी करता येणार आहे. हे अॅप गुगल प्ले स्टोअरवर (Google Play Store) मोफत उपलब्ध होणार असून युझर्स सहजपणे ते डाउनलोड करू शकता. या अॅपमध्ये आधार प्रमाणीकरण आणि 12 भाषांमध्ये ही लस घेण्यासाठी मान्यता देणारा एसएमएस असे अनेक विशेष फीचर्स आहेत. या अॅपच्या माध्यमातून लस देण्यात आलेल्या व्यक्तीला काही त्रास झाला, दुष्परिणाम जाणवले, तर त्यावर लक्ष ठेवण्यात येणार आहे.

Cowin App बाबत जाणून घेऊ या दहा महत्त्वाच्या बाबी

1) सर्वप्रथम कोविन अॅप गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करावं लागेल. त्यानंतर त्यात तुमची नाव नोंदणी करावी लागेल. त्यासाठी तुमचं नाव, आधार कार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी ओळखपत्रं आवश्यक असतील.

2) आरोग्य सेवक आणि फ्रंटलाईन वर्कर्सना यावर नावनोंदणी करण्याची गरज नाही, यांची माहिती सरकारकडे आधीच जमा झालेली आहे.

3) या लसीकरणाच्या मोहिमेत सहभागी असणारे हेल्थ वर्कर्स आणि इतर लोकांना माहिती देण्यासाठी 12 भाषांमध्ये एसएमएस पाठवण्यात येतील. यावर नाव नोंदणी केल्यानंतर माहितीची पडताळणी करण्यासाठी आणि सोयीच्या तारखेसाठी तुमची सहमती विचारली जाईल.

हे वाचा - कोरोना उद्रेकाच्या संकटाचा 2 आठवडे आधीच मिळणार इशारा; शास्त्रज्ञांनी मार्ग शोधला

4) कोविन अॅपच्या माध्यमातून युनिक हेल्थ आयडी निर्माण करण्यात येऊ शकतो. ऑनलाईन नोंदणी झाल्यानंतर अॅपवर देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना जरूर वाचाव्यात.

5) सरकारी डॉक्युमेंट अॅप डिजीलॉकरचा वापर क्यूआर कोड आधारीत सर्टिफिकेटसाठीही होऊ शकतो. यासाठी चोवीस तास हेल्पलाईन उपलब्ध असेल. लस घेतल्यानंतरही एक क्यूआर कोड सर्टिफिकेट दिलं जाईल. तेही या डिजीलॉकरमध्ये सेव्ह करता येईल.

6) कोविन अॅपचं सॉफ्टवेअर तपासण्यासाठी वेगवेगळ्या स्तरांवर अनेक वेळा पूर्व अभ्यास करण्यात आला आहे. 700 जिल्ह्यांमधील 90 हजारांपेक्षा जास्त लोकांना या सॉफ्टवेअरच्या वापराबद्दल माहिती देण्यात आली आहे.

7) प्राधान्यक्रमाच्या गटातील लोकांच्या वयानुसार कोविन अॅपद्वारे वेळापत्रक निश्चित केलं जाईल. जिल्हा न्यायाधीश लसीकरण कार्यक्रमाची तारीख निश्चित करतील.

8) सर्व राज्यांमधील 125 जिल्ह्यांमध्ये कोविन अॅपची माहिती देण्यासाठी 285 सत्रं आयोजित करण्यात आल्याचं आरोग्य मंत्रालयानं मंगळवारी जाहीर केलं आहे. या पूर्व अभ्यासात मिळालेल्या प्रतिसादाच्या आधारावर लशीला परवानगी मिळताच 10 दिवसांच्या आत लसीकरण मोहीम सुरू करण्यात येईल, असंही आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं.

हे वाचा - तुम्ही कोरोना लस घेणार का? मोदी सरकार लसीकरणासाठी सज्ज असताना 69% लोक संभ्रमात

9) कोविन अॅपमध्ये छोटे, छोटे बग्ज सापडले होते मात्र त्यांचं निराकरण करण्यात आलं आहे. सर्व राज्यांनी या अॅपच्या माध्यमातून लसीकरण मोहीम राबवण्याबाबत आणि त्याच्या मार्गदर्शक सूचनांवर विश्वास व्यक्त केला आहे.

10) देशात कोरोना लसीकरणाचे काम पाच तत्वांवर होणार आहे. तंत्रज्ञानाच्या आधारावर याची अंमलबजावणी करणे, एक वर्ष किंवा अधिक काळासाठी तयारी करणे, सध्याच्या स्थितीतील आरोग्य सेवेच्या उपलब्धतेबाबत कोणतीही तडजोड न करणं, निवडणुका आणि जागतिक लसीकरण मोहिमांच्या अनुभवांचा उपयोग करणं.

Published by: Priya Lad
First published: January 7, 2021, 8:41 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading