लंडन, 21 डिसेंबर : संपूर्ण 2020 हे कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) दहशतीखीली संपत आले आहे. त्यातच आता ब्रिटनच्या नव्या Coronavirus च्या भीतीने जगाची चिंता वाढली आहे. कोरोनाची (COVID-19) लागण होऊन बऱ्या झालेल्या अनेक व्यक्ती आपल्या आजूबाजूला आहेत. या सर्वांसाठी एक अत्यंत काळजीची बातमी आहे. कोरानातून बऱ्या झालेल्या दहा पैकी एका व्यक्तीला (10 टक्के) लाँग कोव्हीड (Long Covid) ची लागण होते, अशी माहिती एका संशोधनातून समोर आली आहे.
ब्रिटनमधील ऑफिस फॉर नॅशनल स्टॅटेटिक्सने (ONS) याबाबत एक संशोधन केले आहे. या संशोधनानुसार, कोरोनामधून बरं झाल्याच्या तीन महिन्यानंतरही 9.9 टक्के ब्रिटीश नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षणं होती. तर, अन्य 21 टक्के नागरिकांमध्ये ते बरे होऊन पाच आठवड्यांचा कालावधी उलटल्यानंतरही थकवा, डोकेदुखी, सततचा खोकला यासारखी प्रमुख लक्षणं आढळली आहेत.
संशोधनातून कोणती माहिती समोर?
‘कोराना व्हायरस नसलेल्या रुग्णांच्या तुलनेत कोरोनाची लागण होऊन हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या रुग्णांमध्ये हार्ट अॅटॅक (Heart attack) येण्याचे प्रमाण हे 12 पट जास्त आहे,’ अशी माहिती देखील या संशोधनातील आकडेवारीमधून समोर आली आहे. हे रुग्ण या व्हायरसमधून 15 दिवसांमध्ये बरे होतात. मात्र खोकला, ताप येणे, वास आणि चव जाणे ही लक्षणे त्यांच्यात नंतर दीर्घ काळ टिकतात. कोरोनातून बरं झालेल्या ज्या रग्णांमध्ये व्हायरस अधिक काळ राहतो अशा रुग्णांना संशोधकांनी ‘लाँग कोव्हिड रुग्ण’ असे नाव दिले आहे.
लाँग कोव्हिडचा शरिरातील अवयांवर तसेच प्रतिकार शक्तीवर परिणाम होतो. डॉक्टरांनी आणि संशोधकांनी यांची तुलना पोलिओनंतरच्या सिंड्रोमशी (Post-Polio syndrome) केली आहे. संशोधकांना ही अवस्था अजून पुरेशी समजलेली नाही. रुग्णांमध्ये अगदी दहा वर्षांनंतरही याची लक्षणं आढळू शकतात. ब्रिटनमध्ये या प्रकारचे साधारण 5 लाख रुग्ण आहेत, असा अंदाज आहे. मात्र याची नेमकी आकडेवारी शोधण्यात ONS च्या अधिकाऱ्यांना अद्याप यश मिळालेलं नाही.
कुणावर झाले संशोधन?
ब्रिटनमध्ये एप्रिल ते डिसेंबर या कालावधीमध्ये कोरोनाची लागण झालेल्या 8,913 नागरिकांमध्ये हे संशोधन करण्यात आले. ‘कोरोनातून बरं झाल्यानंतर त्याची कोणती लक्षणं तुम्हाला जाणवतात?’ हा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. या रुग्णांमध्ये लाँग कोव्हिडची लक्षणं ही सरासरी 40 दिवस आढळल्याची माहिती समोर आली आहे.
डायबिटीज, (Diabetes) किडनी (Kidney) आणि लिव्हरचे (Liver) आजार असलेल्या रुग्णांमध्ये हा धोका अधिक आहे. कोव्हिडच्या गंभीर आजातून बरे झालेल्या रुग्णांमध्येही लाँग कोव्हिडचे प्रमाण जास्त आहे. कोव्हीडनं गंभीर आजारी असलेल्या 1 हजार रुग्णांपैकी 112 रुग्णांमध्ये या आजाराची लक्षणं आढळली आहेत.