लंडन, 22 डिसेंबर : प्रसिद्ध क्रिकेटपटू सुरेश रैनावर मुंबईत लॉकडाऊनचे नियम मोडत पबमध्ये पार्टी केल्याप्रकरणी कारवाई केली गेल्याची बातमी ताजी आहे. आता ब्रिटनमध्ये कोरोनाचा (Corona) नवीन घातक अवतार समोर आलेला असताना ड्युक ऑफ केंब्रिज आणि डचेस ऑफ केंब्रिज, (Duke and Duchess) असं बिरूद मिरवणारे प्रिन्स विल्यम (Prince William) आणि केट (Kate Middleton) यांच्याबाबतही असंच बेजबाबदारपणे वागल्याचं वृत्त समोर आलं आहे.
क्वीन एलिझाबेथ (दुसरी) आणि शाही घराणं यांच्यावर बेतलेली 'क्राऊन' ही चार सीझन्समधली वेब सिरीज लोकप्रिय ठरल्याने लोकांचं शाही घराण्याकडं जास्तच लक्ष वेधलं जात आहे. त्यातच आता ख्रिसमस साजरा करण्यासाठी विल्यम्स आणि केट सँड्रियमला गेले आणि सोशल डिस्टन्सिंग आणि प्रवासाचे नियम मोडले असं समोर आलं आहे.
कोरोना आणि लॉकडाऊनअंतर्गतच्या नियमावलीनुसार, पब केवळ रात्री 11.30 पर्यंतच उघडे ठेवले जाऊ शकतात. सुरेश रैना आणि इतर लोकांवर पार्टी करताना जिथे कारवाई केली गेली तो पब पहाटे 4 पर्यंत खुला होता. या कारवाईत हॉटेल कर्मचाऱ्यांसह 34 लोकांना अटक केली गेली. आणि आता ब्रिटनमधील शाही घराण्याबाबतही अशीच एक घटना समोर आली आहे. कोरोनाचं नवीन म्युटेशन समोर आल्याच्या पार्श्वभूमीवर या घटनेकडे अधिकच गांभीर्यानं पाहिलं जात आहे.
Dailymail ने दिलेल्या
वृत्तानुसार, विल्यम आणि केट हे प्रिन्स एडवर्ड ( प्रिन्स विल्यम्सचे काका)आणि त्याच्या कुटुंबीयांना भेटायला गेले होते. सॅंड्रिहमला ही भेट आयोजित केली होती आणि त्यासाठी विल्यम आणि केट आपल्या पूर्ण कुटुंबासहित गेले होते. आता त्यांना कोविड-19 संदर्भातील नियमांचा भंग केल्याबाबत दोषी मानलं गेलं आहे. या भेटीत त्यांची तीन मुलं सोबत होती. प्रिन्स जॉर्ज (7), प्रिन्सेस शार्लट (5) आणि प्रिन्स लुइस (2). हे सगळे विल्यमचे काका एडवर्ड आणि त्यांची पत्नी सोफी यांना भेटायला गेले होते. यांची दोन मुलंही तिथं उपस्थित होती.
ब्रिटनमध्ये सध्या कुठल्याही ठिकाणी सहापेक्षा अधिक माणसांनी एकत्र येण्यास किंवा जमून उत्सव साजरा करण्यास बंदी आहे. रॉयल फॅमिलीनेच हा नियम मोडला आहे.
वृत्तानुसार, ही दोन्ही कुटुंबं ल्युमिनेटला भेट द्यायला गेली होती. हा ख्रिसमसची थीम असलेला सॅंड्रींगहॅम इथला एक वॉक आहे. या दोन्ही कुटुंबांच्या व्हायरल झालेल्या फोटोजमध्ये सगळे एकमेकांशी गप्पा करत सोबत चालताना दिसत आहेत.
या कुटुंबांनी 'रूल ऑफ सिक्स' मोडल्याचं सांगत त्यांना दोषी ठरवलं गेलं आहे. हा नियम ब्रिटीश शासनाने लोकांना सार्वजनिक जागी एकत्र येण्यापासून रोखण्यासाठी बनवला आहे. या नियमानुसार एकाच घरातले नसलेल्यांपैकी केवळ 6 जणांनाच एकत्र येता येतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.