मुंबई, 01 डिसेंबर : खोकला हा कायमस्वरूपी आजार नाही. बाहेरून घशात आलेले धुळीचे कण किंवा विषाणू निघून गेले की, खोकलाही दूर होतो. मात्र काही वेळा खोकला दीर्घकाळ राहतो, अशावेळी मात्र इलाज करणं आवश्यक असतं. धूळ, मातीचे कण, प्रदूषण अशी अनेक कारणं यामागे असू शकतात. कोरडा खोकला झाला असेल तर त्यावर खालील घरगुती उपाय अगदी रामबाण ठरतात.
मध : खोकल्यावर मध अतिशय गुणकारी ठरतो. यातील अँटी ऑक्सिड्न्टस रोगकारक घटकांशी लढण्यासाठी उपयुक्त असतात. याशिवाय घशातील घरघर कमी करण्यातही हे महत्त्वाचे ठरतात. सर्दी, खोकला झाल्यावर मधाचा वापर करणं, इतर औषधांपेक्षा गुणकारी ठरत असल्याचे सिद्ध झाले आहे. हर्बल टी किंवा लिंबू पाणी यात दोन चमचे मध मिसळून दिवसातून दोन वेळा घेतल्यास त्याचा चांगला फायदा होतो.
मिठाच्या पाण्याने गुळण्या : मिठाच्या पाण्याने गुळण्या करण्यानेही घशातील खवखव कमी होते. तसेच फुफ्फुसातील कफही कमी होतो. एक कप गरम पाण्यात पाव चमचा मीठ घालून दिवसातून काही वेळा गुळण्या कराव्यात. यामुळे टॉन्सिलचाही त्रास कमी होतो.
आलं : आल्याचा वापर केल्यास खोकला कमी होतो. थंडीत काळीमिरी, आलं यांचा वापर करून केलेला चहा पिणं गुणकारी ठरतं. मध आणि आलं घालूनही चहा घेता येतो. अर्थात आले जास्त प्रमाणात वापरल्यास पोट खराब होऊ शकतं. यामुळे आले घालून केलेला चहा कमी प्रमाणात घेणेच योग्य ठरते.
पेपरमिंट : पेपरमिंटमधील मेंथॉलचा खोकल्यावर गुणकारी ठरतो. घशातील खवखव आणि दुखणं यावरही पेपरमिंट उपयुक्त ठरतं. दिवसातून दोन ते तीन वेळा पेपरमिंटचा चहा पिण्याने खोकल्याचा त्रास कमी होतो. अरोमाथेरपी अंतर्गत पेपरमिंटच्या तेलाचाही वापर करता येतो. थंडीच्या काळात पेपरमिंटचा वापर गुणकारी ठरतो.
निलगिरी तेल : निलगिरी तेलाचा वापर केल्याने श्वासनलिका स्वच्छ होते. खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह तेलात निलगिरी तेलाचे काही थेंब मिसळून छातीला मालीश करा. याशिवाय पाण्यात निलगिरी तेलाचे काही थेंब घालून वाफही घेता येते. यामुळे छाती हलकी होऊन श्वास घेण्यास सुलभता निर्माण होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.