मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

कोरोना रुग्णासोबत असताना...; कोरोना योद्धा डॉक्टरने मांडला काळीज पिळवटून टाकणारा अनुभव

कोरोना रुग्णासोबत असताना...; कोरोना योद्धा डॉक्टरने मांडला काळीज पिळवटून टाकणारा अनुभव

कोरोना वॉर्डमध्ये कोरोना रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉक्टराने आपला अनुभव व्यक्त केला आहे.

कोरोना वॉर्डमध्ये कोरोना रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉक्टराने आपला अनुभव व्यक्त केला आहे.

कोरोना वॉर्डमध्ये कोरोना रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉक्टराने आपला अनुभव व्यक्त केला आहे.

डॉ. निदा सरफराज/मुंबई, 26 मे : सध्याचा कोरोना महासाथीचा (Corona Pandemic) काळ हा माझ्या आयुष्यातला विचित्र, परंतु महत्त्वाचा शिकण्याचा कालावधी आहे. गेल्या काही महिन्यांत मला हे जाणवलं आहे, की कोविड वॉर्डमध्ये काम करून माझा जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा बदलला आहे. मी माझ्या आयुष्यातल्या माणसांचं मूल्य पूर्वीपेक्षाही अधिक ओळखू लागले आहे. मी तरुण असले तरी आता मला खूप थकल्यासारखं (Exhausted) वाटतं आहे. प्रचंड कामामुळे निश्चित वेळापत्रक नाही. त्यामुळे लाइफस्टाइल बदलली आहे. औषधोपचारांनी जीव वाचवण्याचं प्रशिक्षण डॉक्टर म्हणून आम्ही घेतलेलं असतं; पण या महासाथीमुळे मला अधिकाधिक लोकांचे जीव वाचवण्यासाठी त्यांची काळजी घेण्याचं, त्यांना प्रेम देण्याचं महत्त्वही प्रकर्षाने जाणवत आहे. अनेक लोक जगण्यासाठी संघर्ष करत आहेत. कर्त्या माणसाच्या/महिलेच्या मृत्यूमुळे कुटुंबं उद्ध्वस्त होत आहेत. एका घटनेनं तर मी पूर्ण हादरले. वडील आणि मुलाला कोविडसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यात मुलगा गेला, पण वडील वाचले. वडिलांना कोणत्या मनःस्थितीतून जावं लागलं असेल, या विचारातून मी अद्यापही बाहेर आलेले नाही. माझ्या देखरेखीखाली असलेला पेशंट दगावणं म्हणजे कुटुंबातली व्यक्ती गेल्यासारखंच वाटतं. इतके मृत्यू जवळून पाहूनही प्रत्येक नव्या मृत्यूमुळे होणारा भावनिक आघात तितकाच भीषण आणि दुःखदायक असतो. हे वाचा - गर्भवती असतानाही केली रुग्णांची सेवा, डिलिव्हरीवेळी कोरोनानं गाठल्यानं मृत्यू माझ्या पेशंट्सची स्थिती जेव्हा हाताबाहेर जाते, तेव्हा त्यांचे हात हातात घेऊन धीर देण्याचं, हसवण्याचं काम मी करते. त्यांचं दुःख, वेदना कमी करण्याचा तो एक थोड्या काळासाठीचा प्रयत्न असतो. पण पेशंट्सना (Corona Patients) कायम प्रोत्साहन देणं गरजेचं असतं. त्यांना मानसिक आणि भावनिकदृष्ट्याही उत्तम वाटणं हे डॉक्टर म्हणून आमचं कर्तव्य असतं. रुग्णांना या काळात त्यांच्या नातेवाईकांना भेटण्याची परवानगी नसल्याने त्यांचा एकटेपणा पाहून वेदना होतात. काही रुग्ण मला अक्षरशः मिठी मारून त्यांच्या चिंता, स्वप्नं, अडचणी सगळं काही सांगतात. थोड्या काळासाठीचं असलं तरी हे मित्रत्व आनंद देतं. काही रुग्ण मात्र डोळ्यांत पाणी आणून विचारतात, की 'मी वाचू शकणार नाही ना?'. तेव्हा मात्र काय उत्तर द्यायचं ते कळत नाही. तरीही सकारात्मक राहावंच लागतं. मृत्यूची बातमी त्या व्यक्तीच्या जवळच्या व्यक्तींना सांगणं हा माझ्या कामाचा सर्वांत कठीण भाग असतो. कुटुंबातल्या व्यक्तीचं अचानक जाणं सहन करण्यासारखं नसतं. म्हणूनच डॉक्टर्स (Doctors) आणि हॉस्पिटल स्टाफसोबत (Hospital Staff) रुग्णाच्या नातेवाईकांच्या हाणामारीचे प्रसंगही अनुभवावे लागतात. नातेवाईकांना चांगल्या पद्धतीने परिस्थितीची जाणीव करून देणं, आम्ही आमचे सर्वोत्तम प्रयत्न केले आहेत हे सांगणं एवढंच आम्ही करू शकतो. काही वेळा नातेवाईक व्यक्तच होऊ शकत नाहीत, असंही पाहायला मिळतं. हे वाचा - ...तर रुग्णाला फुलांमुळेही जीवघेण्या आजाराचा धोका; डॉक्टरांनी केलं सावध कोरोना रुग्णाची सेवा करताना आम्हालाही अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं आहे. सातत्याने N95 मास्क घालावा लागल्यामुळे चेहऱ्यावर रॅशेस उठल्या आहेत. खाण्याच्या वेळा आणि सवयी अजिबात पाळल्या जात नसल्याने वजन वाढलं आहे. ड्युटी संपल्यावर गलितगात्र व्हायला होतं. वैयक्तिक कामांसाठी किंवा कोणाशी सहज म्हणून फोनवर गप्पा मारण्यासाठीही वेळ हाती नसतो. सोशल मीडियावरूनही मित्रपरिवाराशी संपर्कात राहणं शक्य होत नाही. मानसिकआरोग्यावर विपरीत परिणाम झाला असून, आजूबाजूला एवढ्या मोठ्या प्रमाणात मृत्यू आणि मृतांची उद्ध्वस्त झालेली कुटुंबं पाहणं ताण आणणारं आहे. जगभरातले डॉक्टर्स त्यांच्या परीने ही परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत. आता लसीकरण सुरू झाल्यामुळे ही परिस्थिती सुधारेल. आपण यातून बाहेर येऊ, याचा मला विश्वास आहे. इथून पुढे आपण आरोग्य या विषयाकडे वेगळ्या दृष्टिकोनाने पाहू. सर्व डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना त्यांचं उत्तम काम असंच सुरू ठेवण्यासाठी शुभेच्छा! हे वाचा - 5 महिन्यांत 7 वेळा इन्फेक्शन, सातवी सर्जरी; ब्लॅक फंगसमुळे तरुणाची भयंकर अवस्था तसंच सोशल डिस्टन्सिंग पाळा, दृष्टिकोन सकारात्मक ठेवा, तुमच्या प्रिय व्यक्तींसह शक्य तितका वेळ घालवा, माणसं जिवंत असेपर्यंतच नातेसंबंधांचं महत्त्व आहे त्यामुळे ते ओळखून वागा, कामातून पुरेसा वेळ काढून आवडीचं काही तरी करा, आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य द्या, प्रत्येक क्षण आनंदाने, उत्साहाने जगा, इतकंच आवाहन मी प्रत्येकाला करेन. (लेखिका डॉ. निदा सरफराज मुंबईच्या परळ येथील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये असिस्टंट डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत.)
First published:

Tags: Corona patient, Coronavirus, Doctor contribution

पुढील बातम्या