कोरोना... कोरोना... कोरोना! चिमुकल्यांनी घेतला धसका; या कठीण काळात असं जपा मुलांचं मानसिक आरोग्य

कोरोना... कोरोना... कोरोना! चिमुकल्यांनी घेतला धसका; या कठीण काळात असं जपा मुलांचं मानसिक आरोग्य

कोरोनाची महासाथ आणि त्यामुळे लागू करण्यात आलेला लॉकडाऊन याचा लहान मुलांच्या मानसिक आरोग्यावर फार वाईट प्रभाव पडत आहे.

  • Share this:

मुंबई, 11 मे : कोरोना काळ (Corona pandemic) हा प्रत्येकासाठी अतिशय कसोटीचा आहे. कोरोना संसर्गाच्या भीतीपायी घरातच रहावं लागत असल्याने वयस्करासह, लहान मुलांच्या मनावरही (Child mental health) याचा परिणाम होऊ लागला आहे. कोरोनामुळे शाळा बंद आणि मित्रांना भेटता येत नसल्याने लहान मुलांच्या मानसिक आरोग्यावर फार वाईट प्रभाव पडत आहे. बरीच लहान मुलं आता नैराश्य, चिंता आणि तणाव यांसारख्या मानसिक त्रासातून जात आहेत. अशा स्थितीत आपल्या मुलांचं मानसिक आरोग्य जर चांगलं राखायचं असेल तर त्याची महत्त्वाची जबाबदारी पालकांची आहे, असं तज्ज्ञ डॉक्टर सांगत आहेत.

कोरोना आणखी काही महिने आपली पाठ सोडणार नाही. वर्षभराहून अधिक काळ राहिलेल्या या लॉकडाऊनमुळे प्रत्येकाचाच मानसिक ताण वाढत चालला आहे. रोजचं रूटीन गडबडल्या कारणाने लहान मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे. जर लॉकडाऊन अधिक काळ असाच सुरू राहिला तर लहान मुला-मुलींना अनेक मानसिक समस्याचा सामना करावा लागू शकतो, असे मानसोपचार तज्ज्ञ सांगत आहेत.

हे वाचा - Toilet pipe मधूनही कोरोनाव्हायरस तुमच्या घरात घुसू शकतो का?

मीरारोड येथील वोक्हार्ट रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सोनल आनंद म्हणाल्या की, तुमची मुलं चिंताग्रस्त आहेत का? कोविडशी संबंधित बातम्या पाहिल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर त्यांना कसंतरी होतं  का? विषाणूची लागण होण्याच्या भीतीमुळे वारंवार मुलं हात स्वच्छ करतात का? आपल्या मुलांना रात्री झोपेत कोरोनाची स्वप्नं पडतात का? मुलांच्या वागणुकीत बदल जाणवत आहेत का? असं असल्यास आपल्या मुलांना मानसिक आरोग्याचा त्रास होऊ शकतो. यासाठी आपल्या मुलांकडे वेळीच लक्ष द्या आणि तातडीने मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

कोहिनूर रूग्णालयातील बालरोगतज्ज्ञ डॉ. राहुल काबरा म्हणाले की, लॉकडाऊनचा विपरित परिणाम हा मोठ्यासह लहान मुलांवरही होऊ लागला आहे. यामुळे मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होतो आहे. शाळा, मैदाने बंद असल्याने मुलांना दिवसभर घरातच बसून रहावं लागत असल्याने ती अक्षरशः कंटाळून गेली आहेत. कोरोना संसर्गामुळे पालक मुलांना खेळायला बाहेर पाठवत नसल्याने ही मुलं एकलकोंडी बनत चालली आहे. यामुळे मुलांमध्ये नैराश्य, चिंता आणि तणाव वाढतो आहे. मुलं हिंसक बनू लागली आहेत. त्यातच आजूबाजूला कोरोनाच्या चर्चा असल्याने मुलांच्या कोवळ्या मनात भीती दाटून येत आहे. अशावेळी मुलांच्या स्वभावातील हे बदल पालकांनी ओळखणं गरजेचं आहे. जेणेकरून वेळीच ही गोष्ट कळल्यास मुलांना मानसिक आजारातून पटकन बाहेर काढता येऊ शकते.

तुमच्या मुलांच्या मानसिक आरोग्याची काळजी कशी घ्याल

आपल्या मुलांना कोरोना विषाणूची पुरेशी माहिती करून द्या.

आपली मुलं घरी कोरोना नियमांचं पालन करत आहेत ना, याची खात्री करून घ्या. चेहऱ्यावर मास्क लावणं, सामाजिक अंतर पाळणं आणि हात स्वच्छ धुणं, याचं महत्त्व मुलांना पटवून द्या.

मुलांनीदिवसभर टीव्हीवर काय पाहावं हे तुम्ही ठरवा.

हे वाचा - Salute! दिवसातले 8 तास PPE किट घालून मुंबईतले हे स्त्रीरोगतज्ज्ञ करतात रुग्णसेवा

सोशल मीडियाचा मुलांना अतिरिक्त वापर करू देऊ नका.

आपल्या मुलाला घरी कंटाळा येऊ नये, यासाठी त्यांना कुठल्या ना कुठल्या कामात सतत व्यस्त ठेवा.

मुलांना घरच्या घरी शैक्षणिक चित्रपट दाखवा, जेणेकरून त्यांचं मनोरंजन होईल.

मुलांबरोबर घरी वेळ घालवण्यासाठी बुद्धिबळ, कॅरम यांसारखे बैठी खेळ खेळा.

पुस्तक वाचणं, व्यायाम करणं आणि संगीत ऐकूनही तुम्ही मुलांसोबत राहू शकता, असं केल्याने आपल्या मुलांना आनंद होईल.

मुलांना चांगल्या गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करा.

Published by: Priya Lad
First published: May 12, 2021, 7:39 AM IST

ताज्या बातम्या