मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

कोविड रुग्णांच्या संपर्कातील हे दिवस धोक्याचे; कोरोना संसर्गाची सर्वाधिक शक्यता

कोविड रुग्णांच्या संपर्कातील हे दिवस धोक्याचे; कोरोना संसर्गाची सर्वाधिक शक्यता

या दिवसात सर्वाधिक कोरोनाचा धोका.

या दिवसात सर्वाधिक कोरोनाचा धोका.

या दिवसांमध्ये कोरोना रुग्णाकडून निरोगी माणसाला कोरोना संक्रमणाचा धोका जास्त असतो.

वॉशिंग्टन, 27 ऑगस्ट : कोरोना विषाणूचा (Coronavirus) संसर्ग जगभरात पसरून आता दीड वर्ष होऊन गेलं आहे. शास्त्रज्ञ अविरतपणे संशोधन करून कोरोना विषाणूच्या (Corona infection) संसर्गाचे विविध पैलू शोधून काढत आहेत, जेणेकरून त्याच्यापासून बचाव करणं सोपं होऊ शकेल. एखाद्या व्यक्तीला कोरोना विषाणूचा संसर्ग झाला असेल, तर त्यांच्यापासून दुसऱ्या व्यक्तींना संसर्ग होण्याचा सर्वांत जास्त धोका त्या व्यक्तीला लक्षणं (Corona symptoms) दिसण्याच्या दोन दिवस आधीपासून लक्षणं दिसू लागल्यानंतरच्या तीन दिवसांपर्यंत या पाच दिवसांमध्ये असतो, असं चीनमध्ये झालेल्या एका नव्या अभ्यासातून स्पष्ट झालं आहे.

जामा इंटर्नल मेडिसीन (JAMA Internal Medicine) या जर्नलमध्ये या अभ्यासाबद्दलचा सविस्तर लेख प्रसिद्ध झाला आहे. लक्षणं न दिसणाऱ्या एखाद्या व्यक्तीकडून संसर्ग झालेल्या व्यक्तीही असिम्प्टमॅटिक (Asyptomatic) असण्याची, म्हणजेच त्यांच्यामध्येही लक्षणं न दिसण्याची शक्यता जास्त असते, असंही त्या संशोधनात आढळलं आहे.

अमेरिकेतल्या बॉस्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ या संस्थेत सहायक प्राध्यापक असलेल्या लिओनार्डो मार्टिनेझ यांनी सांगितलं, 'व्हायरल लोडचा (Viral Load) वापर इनडायरेक्ट ट्रान्समिशन (Indirect Transmission) अर्थात थेट न होणारा संसर्ग म्हणून आधीच्या अभ्यासात केला जात होता. बहुतांश कोविड रुग्ण ठराविक दिवसांतच संसर्ग पसरवण्यास कारणीभूत असतात, याची खात्री करण्यासाठी हे संशोधन करण्यात आलं.'

हे वाचा - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भविष्यवाणी खरी ठरणार? 'या' जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक

चीनमधल्या (China) झीजियांग प्रांतात जानेवारी 2020 ते ऑगस्ट 2020 या कालावधीत हे संशोधन करण्यात आलं. त्यात प्रायमरी केसेस अर्थात कोरोनाचा संसर्ग झालेल्या मूळ व्यक्तींच्या अगदी जवळच्या संपर्कातल्या सुमारे 9000 व्यक्तींपर्यंत कोरोनाचा संसर्ग कसा होतो, हे अभ्यासण्यात आलं. त्यात संबंधित कोरोनाबाधितांसह एकाच घरात राहणाऱ्या व्यक्ती, एकत्र जेवलेल्या व्यक्ती, कामाच्या ठिकाणचे सहकारी, हॉस्पिटलमधले कर्मचारी आणि एकत्र प्रवास केलेल्या व्यक्ती आदींचा समावेश होता.

अमेरिकेतल्या युनिव्हर्सिटी ऑफ जॉर्जिया कॉलेज ऑफ पब्लिक हेल्थ या संस्थेतल्या यांग गे यांच्यासह अन्य शास्त्रज्ञांचाही या संशोधनाच्या टीममध्ये समावेश होता. कोरोनाबाधित रुग्णांवर या संशोधकांनी त्यांचा पहिला कोविड पॉझिटिव्ह रिझल्ट आल्यापासून किमान 90 दिवस लक्ष ठेवलं. असिम्प्टमॅटिक आणि प्री-सिम्प्टमॅटिक (Pre-Symptomatic) रुग्णांमधला फरक ओळखण्यासाठी हा अभ्यास करण्यात आला. प्रायमरी केसेस म्हणून गणल्या गेलेल्या कोरोनाबाधितांपैकी 89 टक्के जणांना सौम्य किंवा मध्यम प्रकारची लक्षणं दिसून आली. केवळ 11 टक्के व्यक्ती असिम्प्टमॅटिक होत्या. एकाही व्यक्तीला गंभीर लक्षणं नव्हती.

प्रायमरी रुग्णांच्या (Primary Cases) घरातले सदस्य किंवा त्यांच्या अनेकदा किंवा जास्त वेळ संपर्कात आलेल्या व्यक्तींना संसर्ग होण्याचं प्रमाण अन्य क्लोज काँटॅक्ट्सच्या तुलनेत जास्त होतं. त्याव्यतिरिक्त, क्लोज काँटॅक्ट्सचा संपर्क संबंधित रुग्णाला लक्षणं दिसण्याआधी काही काळ किंवा लक्षणं दिसल्यानंतर काही काळाने झाला असेल, तर संसर्गाची शक्यता जास्त असल्याचं दिसून आलं.

हे वाचा - चीनविरोधात पुरावा सापडला? अमेरिकेच्या हाती लागला कोरोनाच्या स्रोताचा रिपोर्ट

'आमच्या अभ्यासाचे निष्कर्ष असं सुचवतात, की प्रायमरी रुग्णांची लक्षणं आणि त्यांच्याशी अन्य व्यक्तींचा संपर्क येणाचा कालावधी यांत परस्परसंबंध आहे. यावरून असं लक्षात येतं, की एखाद्या व्यक्तीला बरं वाटत नसेल, तर तातडीने विलगीकरणात राहणं आणि रॅपिड टेस्टिंग करून घेणं हे संसर्ग रोखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे,' असं मार्टिनेझ यांनी सांगितलं. सौम्य किंवा मध्यम लक्षणं असलेल्या प्रायमरी रुग्णांच्या तुलनेत लक्षणं नसलेल्या प्रायमरी रुग्णांकडून त्यांच्या अत्यंत जवळून संपर्कात आलेल्या व्यक्तींना संसर्ग होण्याची शक्यता खूप कमी असते; मात्र त्यांच्याकडून कोणाला संसर्ग झालाच, तर त्या व्यक्तींनाही लक्षात येण्यासारखी लक्षणं दिसण्याची शक्यता फारशी नसते, असंही संशोधकांनी म्हटलं आहे.

या अभ्यासामुळे लसीकरणाचं (Vaccination) महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. कारण लसीकरणामुळे गंभीर संसर्गाची शक्यता कमी होते, असं मार्टिनेझ यांनी म्हटलं आहे.

First published:

Tags: Corona patient, Corona spread, Coronavirus