कोरोनाबाबत देशाचं चित्र दिलासादायक पण महाराष्ट्रात धोका वाढला; केंद्रानं केलं सावध

कोरोनाबाबत देशाचं चित्र दिलासादायक पण महाराष्ट्रात धोका वाढला; केंद्रानं केलं सावध

कोरोनाशी (coronavirus) लढण्यासाठी महाराष्ट्राला (Maharashtra) आता रणनीती बदलण्याची गरज असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (health ministry) म्हटलं आहे.

  • Share this:

मुंबई, 28 ऑक्टोबर : सलग 5 आठवड्यांपासून देशातला कोरोनाचा (Coronavirus in India) आलेख घसरणीला लागला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर म्हणजे रिकव्हरी रेटदेखील 90.62 वर गेला आहे. देशातील कोरोनाची आकडेवारी दिलासादायक असली तरी महाराष्ट्राचा (Maharashtra) धोका मात्र पुन्हा वाढला आहे. सणासुदींच्या काळात महाराष्ट्रात कोरोना प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे, याबाबत केंद्र सरकारने सावध केलं आहे आणि कोरोनाशी लढण्याची रणनीती बदलण्याची गरज असल्याचंही म्हटलं आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी देशातील कोरोनाव्हायरसच्या परिस्थितीबाबत माहिती दिली. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिलेल्या माहितीनुसार, सणासुदीच्या काळात 5 राज्यांमध्ये कोरोनाचा धोका पुन्हा वाढला आहे. यामध्ये महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि दिल्लीचा समावेश आहे.

देशातील एकूण कोरोना प्रकरणांपैकी 48.57 प्रकरणं फक्त महाराष्ट्र, केरळ आणि कर्नाटकात आहेत.  24 तासांत कोव्हिड 19 मुळे मृत्यू झालेली 58 टक्के प्रकरणं महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली, छत्तीसगढ आणि कर्नाटकातील आहेत. या कालावधीतील कोरोनाची 49.4 टक्के नवीन प्रकरणं  केरळ (4,287), पश्चिम बंगाल (4,121), महाराष्ट्र (3,645), कर्नाटक (3,130) आणि दिल्लीतील (2,832) होती.

हे वाचा - खूशखबर! आणखी एक मेड इन इंडिया कोरोना लस; क्लिनिकल ट्रायलसाठी मिळाला ग्रीन सिग्नल

राजेश भूषण म्हणाले, "आपल्याला कोरोनाचे फक्त एकूण आकडे पाहून चालणार नाही. तर गेल्या 24, 48 आणि 72 तासांतील कोरोना रुग्णांची संख्या कशी बदलते आहे, यावरही लक्ष ठेवायला हवं. यामुळे आपल्याला कोरोनाशी दोनहात करण्यासाठी आवश्यक रणनीती बदलण्याची गरज असल्याचे संकेत मिळतात"

"आम्ही या राज्यांच्या संपर्कात आहोत. आमच्या टीम या राज्यांमध्ये पाठवल्या. त्यांच्याकडून आम्ही अहवाल मागवला. अहवालानुसार चर्चा करून आम्ही गरजेनुसार कोरोनाशी लढण्याच्या रणनीतीत बदल करू. एक दिवसापूर्वीच आम्ही याबाबत केरळ, पश्चिम बंगाल आणि दिल्लीशी चर्चा केली आहे. या आठवड्यात आम्ही महाराष्ट्राशीही चर्चा करणार आहोत आणि नवी रणनीती तयार करणार आहोत", असं भूषण यांनी सांगितलं.

हे वाचा - BIG NEWS: Unlock 5.0ची मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत वाढली, जाणून घ्या नवे नियम

मंगळवारी राज्यात 5,363 नव्या रुग्णांची भर पडली. कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या ही 15 लाखांच्या जवळ म्हणजे 14,78,496 एवढी झाली आहे. 7,836 रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यातील रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 89.39 टक्के एवढं झालं आहे. तर 115 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद  झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 2.63 टक्के एवढा झाला आहे.

Published by: Priya Lad
First published: October 28, 2020, 10:45 AM IST

ताज्या बातम्या