Home /News /lifestyle /

गर्भनिरोधक गोळ्यांचा अतिवापर ब्रेस्ट कॅन्सरला देतंय आमंत्रण

गर्भनिरोधक गोळ्यांचा अतिवापर ब्रेस्ट कॅन्सरला देतंय आमंत्रण

नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी सतत गर्भनिरोधक गोळ्या (contraceptive pill) घेणं महागात पडू शकतं.

    मुंबई, 30 ऑक्टोबर :  जीवनशैलीत होणारे बदल, उशिरा मूल होणे, स्तनपानाचा अभाव, त्याचप्रमाणे वैद्यकीय चाचण्यांबाबत जागृतीचा अभाव, कॅन्सरतज्ज्ञ तसंच तपासणीसाठी सोयीसुविधांचा अभाव यामुळे महिलांमधील ब्रेस्ट कॅन्सरचं (breast cancer) प्रमाण झपाट्यानं वाढत आहेत. ग्लोबोकन 2018 च्या अहवालानुसार स्तनाचा कर्करोग हा जगातील दुसरा सर्वात सामान्य कर्करोग असून जगभरात 2.1 दशलक्ष नवीन प्रकरणं नोंदवली गेली आहेत. भारतात स्तनाचा कर्करोग हा सर्वात सामान्य कर्करोगाचा प्रकार आहे, ज्यामध्ये दर 1 लाख महिलांपैकी 12.7 टक्के महिलांचा मृत्यू होतो आहे. स्तनांचा कर्करोग हा 40 ते 60 वर्षे वयोगटात पहायला मिळतो. आता मात्र तरुण मुलींमध्येही याचा धोका वाढला आहे. पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत स्तन कर्करोगाचा भारतीय परिस्थिती काहीशी वेगळी आहे. अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटल मुंबई येथील कन्सल्टंट ब्रेस्ट कॅन्सर सर्जन डॉ. रेश्मा पालेप यांनी सांगितलं, "स्तनाचा कर्करोग आनुवंशिक आहे आणि आधुनिक जीवनशैली देखील याला आमंत्रण देऊ शकते. तरुण रुग्णांमध्ये स्तनाच्या कर्करोगाला कौटुंबिक इतिहास आणि बहुतेक वेळा तोंडावाटे गर्भनिरोधक गोळ्यांचा वापरही कारणीभूत असतो. प्रौढांच्या तुलनेत तरुण रुग्णाचे या आजारातून पूर्णपणे बरे होण्याची शक्यता कमी असते कारण तुलना करता त्यांच्यातील ट्युमर हा अधिक तीव्र स्वरूपाचा असतो" मृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी, स्तन कर्करोगाचा सामना करण्यासाठी वेळोवेळी निदान आणि वेळेवर उपचार करणं तसंच त्याविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती करणं ही काळाची गरज आहे. स्तनाच्या कर्करोगाचं वेळीच निदान आणि यशस्वी उपचारांसाठी डॉक्टरांकडून नियमित शारीरिक तपासणी आणि मॅमोग्राफी तसंच सेल्फ ब्रेस्ट तपासणी या महत्त्वाच्या बाबी आहेत. हे वाचा - WEIGHT LOSS TIPS: वाढत्या वजनामुळे फेव्हरेट ड्रेस घालता येत नाहीत? हे खाऊन पाहा दरमहिन्याला सर्वच महिलांनी किमान 10 मिनिटं वेळ स्वतःसाठी राखून ठेवत पाळीच्या सातव्या दिवशी सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन केल्यास नक्कीच फायदेशीर ठरेल. आपल्या स्तनाचे स्वत: परीक्षण करण्याचे काही मार्ग आहेत. ते म्हणजे आंघोळ करताना गोलाकार पद्धतीने आपला डावा हात आपल्या उजव्या स्तनावर फिरवा. आपण आपले संपूर्ण स्तन आणि त्याजवळील भागाचं परीक्षण केलं पाहिजे. दुसरं म्हणजे आरशासमोर उभे राहून स्तनातील गुठळ्या, सूज येणं, त्वचा निस्तेज दिसणं आणि स्तनाग्र बदलणं यासारख्या बदलांचं परीक्षण करा. यामुळे स्तनाचा कर्करोग ओळखला जाऊ शकतो. एखादी गाठ आढळल्यास किंवा स्तनांमध्ये बदल जाणवल्यास त्वरीत डॉक्टरांशी सपर्क साधा. हे वाचा - सांध्यांतील वेदनांकडे वेळीच द्या लक्ष नाहीतर बेतू शकतं जीवावर खारघर येथील मदरहूड हॉस्पिटलच्या प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अनू वीज म्हणाल्या, "दुर्दैवाने महिलांमध्ये स्तनांबद्दल जागरूकतेचा अभाव आहे. महिलांनी न लाजता आपल्या स्त्रीरोगतज्ज्ञांसोबत बोलावं आणि वेळीच स्तनाच्या कर्करोगाला आळा घालावा. डॉक्टरांनी सुचवल्यानुसार स्तन तपासणी आणि मॅमोग्राम सारखे पर्याय निवडणं आवश्यक आहे"
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Cancer, Health, Woman

    पुढील बातम्या