मुंबई, 12 नोव्हेंबर: कोरोना व्हायरसने (Corona Virus) जगभर धुमाकूळ घातला आहे. चीनमधून आलेल्या या व्हायरसवर अनेक देशांमध्ये संशोधन सुरु आहे. कोरोनाच्या लसीच्या चाचण्यांमध्येदेखील विविध लक्षणं आणि साईड इफेक्ट दिसून येत आहेत. दररोज नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. (Obsessive Compulsive Disorder) ओसीडीग्रस्त लहान मुलांना आणि जेष्ठ नागरिकांना कोरोना झाल्यास त्यांचा आजार अधिक बळावत आहे असं बीएमसी साइकेट्री मासिकात प्रसिद्ध झालेल्या संशोधनात म्हटलं आहे. याआधी ट्रॉमा आणि आघातामुळे ओसीडीग्रस्त लोकांना त्रास होत असल्याचे समोर आलं होतं.
2 ग्रुपमध्ये संशोधन
डेन्मार्कच्या आरहस युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी या अभ्यासात 7 ते 21 वर्षे वयोगटातील मुलं आणि जेष्ठ नागरिकांचा असे 2 गट केले होते. यामध्ये ओसीडी हा आजार असलेल्या एका समूहाला लहान मुलांच्या मानसोपचार केंद्रामध्ये एका विशेष विभागात उपचारासाठी दाखल केले होते. या समूहातील मुलांना हॉस्पिटलमध्ये एका थेरेपिस्टच्या संपर्कात ठेवलं होतं. तर दुसरीकडे उपचार करून एक वर्ष पूर्ण झालेल्या मुलांना आणि जेष्ठ नागरिकांना ठेवण्यात आले होते. या अभ्यासात 102 मुलांनी वैज्ञानिकांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.
ओसीडीग्रस्त व्यक्तींना धोका
कोरोनाचा सर्वांत जास्त फटका हा ओसीडी, प्रचंड राग आणि तणाव असणाऱ्या रुग्णांना जास्त बसणार असल्याचा अंदाज वैज्ञानिकांनी व्यक्त केला आहे. या अभ्यासात पहिल्या समूहातील अर्ध्या मुलांनी आणि जेष्ठ नागरिकांनी आपल्या ओसीडीच्या लक्षणांमध्ये नकारात्मक बदल झाल्याचं सांगितलं. तर तिघांनी चिंता वाढल्याचं सांगितलं. यामध्ये ज्या मुलांनी आणि जेष्ठांनी चिंता वाढल्याचं सांगितलं त्यांना आपल्या कुटुंबापासून दुरावा निर्माण होण्याची भीती सतावत होती. याचं कारण त्यांच्या ओसीडीचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. ज्या मुलांना लहान वयातच ओसीडीनी ग्रासलं आहे त्यांची परीस्थिती अजून बिघडण्याची शक्यतादेखील त्यांनी वर्तवली आहे.
या मुलांची घ्या विशेष काळजी
या संशोधनाच्या निष्कर्षांनुसार मुलं आणि तरुण मुलं कोणत्याही संकटाबाबत संवेदनशील आहेत. कोरोनाच्या काळात संकटं अधिक उग्र वाटू शकतात. यामध्ये मोठ्या प्रमाणात समाजापासून दूर राहणं आणि संक्रमणाची वाढती भीती ही प्रमुख कारणे आहेत. कोरोनाचे संकट अजूनही कमी झालेले नसून लहान मुलांची आणि जेष्ठ नागरिकांची काळजी घेण्याची गरज असल्याचे देखील वैज्ञानिकांनी म्हटले आहे.
Published by:Amruta Abhyankar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.