मुंबई, 31 मार्च : कर्मचाऱ्यांनी उत्तम काम करावं म्हणून कंपन्या अनेक उपक्रम राबवत असतात. कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करत असतात. कर्मचाऱ्यांच्या चुकांसाठी वेळोवेळी मेमो देणं किंवा समज देणं हेही कंपन्या करतात; मात्र कर्मचाऱ्यांच्या चुकांबाबत त्यांना सहकाऱ्यांकडून थोबाडीत मारायला सांगणाऱ्या कंपनीबाबत कधी ऐकलंय का? हाँगकाँगमधल्या एका कंपनीनं तसे आदेश दिलेत. कंपनीच्या या भूमिकेवर जगभरातून टीका होत आहे.
काही दिवसांपूर्वी एका कंपनीने त्यांच्या ऑफिसमध्ये चीअरलीडर्स ठेवल्याचं वृत्त आलं होतं. कर्मचाऱ्यांचं मनोरंजन व्हावं व त्यामुळे ते कामासाठी प्रेरित व्हावेत असा त्यामागचा कंपनीचा उद्देश होता. एका कंपनीनं तर स्लीप डेला कर्मचाऱ्यांना सुट्टीच दिली. कारण कर्मचाऱ्यांची झोप पूर्ण व्हावी असं कंपनीला वाटत होतं; मात्र हाँगकाँगच्या एका कंपनीने घेतलेला निर्णय काहीसा विचित्र आहे. वाईट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी एकमेकांना सर्वांसमोर थोबाडीत मारावी असा आदेश कंपनीनं दिला.
हेही वाचा - विमान प्रवासात शूज काढून अनवाणी फिरणं नका; कारण वाचून घाम फुटेल
साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, एका विमा कंपनीमध्ये ही घटना घडली. फेसबुकवर काही कर्मचाऱ्यांनी त्यांची गोष्ट शेअर केली तेव्हा ही घटना जगासमोर आली. कंपनीचा वार्षिक समारंभ ठेवण्यात आला होता. रात्रीचं जेवण सुरू होतं. त्याच वेळी कंपनीचे मालक मंचावर आले व त्यांनी वाईट कामगिरी केलेल्या कर्मचाऱ्यांना मंचावर बोलावलं. या कर्मचाऱ्यांनी एकमेकांच्या थोबाडीत मारण्याच्या सूचना केल्या. कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करण्याचा उद्देश असल्याचं कंपनीनं म्हटलं; पण कर्मचाऱ्यांना ते अपमानास्पद वाटलं. त्यांनी याबाबत सोशल मीडियावरून त्यांच्या भावना मांडल्या.
सोशल मीडियावर या पोस्ट्सनी चांगलाच धुमाकूळ घातला. कंपनीच्या या भूमिकेवर सर्वांनी चांगलीच टीका केली. अशी कंपनी ताबडतोब बंद केली पाहिजे असं अनेकांनी म्हटलंय. विमा कंपनीचं नाव कळलं तर त्यांची विमा पॉलिसी आमच्याकडे असल्यास आम्ही ती रद्द करू असंही काहींनी म्हटलंय. जी कंपनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना चांगली वागणूक देऊ शकत नाही, ती इतरांना चांगली वागणूक कशी देईल, असा प्रश्नही एकानं विचारलाय.
कंपनीच्या अपमानास्पद वागणुकीमुळे काही कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. काही कर्मचाऱ्यांनी पोस्ट वाचून राजीनामा देण्याचा विचार असल्याचं कळवलंय. कंपनी कर्मचाऱ्यांना खेळण्याप्रमाणे वागवते, असं एका कर्मचाऱ्यानं म्हटलंय. काही जणांनी असंही म्हटलंय, की राजीनामा देण्यासाठी उद्युक्त करण्याआधी याबाबत कंपनीनं हाँगकाँगच्या कामगार विभागाला कळवायला हवं होतं. असं असलं तरी या वृत्ताबाबत साशंकता असणाऱ्याही काही प्रतिक्रिया आल्या आहेत. या घटनेचा कोणताही व्हिडिओ उपलब्ध नसल्यानं त्याच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Lifestyle