नवी दिल्ली, 7 सप्टेंबर : कोरोनातून (Corona) जग सावरत असताना आता कार्यालयात (Office) येऊन काम करण्यासाठी कंपन्या (Companies) कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या ऑफर (Offer) देत असल्याचं चित्र आहे. कोरोना काळात अनेक एम्प्लॉयी घरातून काम करत होते. आतादेखील बऱ्याच कर्मचाऱ्यांनी घरातूनच काम करणं पसंत केलं आहे. मात्र काही कंपन्यांनी मात्र कर्मचाऱ्यांनी कार्यालयात यावं, यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली आहे.
कोरोनामुळे अनेक कर्मचारी अद्यापही कार्यालयात यायला तयार नाहीत. मात्र काही कामं अशी असतात ज्यासाठी कर्मचाऱ्यांनी कार्यालयात येणं गरजेचं असतं. विशेषतः ज्या कर्मचाऱ्यांनी कोरोनाचे दोन्ही डोस घेतले आहेत, अशा कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलावण्यास कंपन्या उत्सुक असल्याचं चित्र आहे. गार्डियन वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार युकेतील पीडब्ल्युसी कंपनीनं आपल्या 22 हजार कर्मचाऱ्यांना कार्यालयात हजर राहण्याची विनंती केली आहे. आठवड्यातून जर दोन किंवा तीन दिवस कर्मचारी कार्यालयात आले, तर त्यांना अतिरिक्त 1000 पाऊंड देण्याची घोषणा कंपनीनं केली आहे.
अमेरिकेतील गोल्डमन सॅश बँकेनं कार्यालयात हजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नाश्ता, जेवण आणि त्यानंतर जिलेटो आईस्क्रीम देण्याची ऑफर दिली आहे. तर वॉलस्ट्रीटवरील एका संस्थेनं त्यांच्या 6 हजार कर्मचाऱ्यांना जिमची फी, रुफटॉफची सोय आणि कार्यालयात मुलं सांभाळण्याची सोयही केली आहे.
कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्याची सक्ती कुठलीच कंपनी सध्या करू शकत नाही. कर्मचाऱ्यांकडे घरून काम करण्याचे अनेक पर्याय उपलब्ध असल्यामुळे कार्यालयात यायला कर्मचारी उत्सुक नाहीत. त्यामुळे वेगवेगळ्या ऑफर देऊन कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्याचं आवाहन कंपन्या करत आहेत. तर काही संस्थांनी पुढील वर्षभरासाठी वर्क फ्रॉम होमच सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
हे वाचा - कपडे वाळत घालत असताना 8 व्या मजल्यावरून पडून महिलेचा मृत्यू, पुण्यातील घटना
भारतातील स्थिती
भारतातील बहुतांश कंपन्या सध्या आपल्या कर्मचाऱ्यांना घरूनच काम करायला सांगत आहेत. भारतातील 95 टक्के कंपन्यांनी तर पुढील 2 वर्षं घरूनच काम करण्याची ऑफर कर्मचाऱ्यांना दिली आहे. दुसरी लाट ओसरत असताना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर पुढील काही महिने तरी बहुतांश कर्मचारी घरातूनच काम करतील, अशी चिन्हं आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.