मूळव्याधाची लक्षणं म्हणून दुर्लक्ष करू नका; असू शकतो आतड्यांचा कॅन्सर

मूळव्याधाची लक्षणं म्हणून दुर्लक्ष करू नका; असू शकतो आतड्यांचा कॅन्सर

बदलती जीवनशैली आणि चुकीच्या सवयींमुळे आतड्यांवर दुष्परिणाम होतो. परिमाणी मोठ्या आतड्यांचा कॅन्सर (colorectal cancer) होतो.

  • Share this:

मुंबई, 16 सप्टेंबर : कॅन्सर (cancer) या आजाराचं नाव जरी ऐकलं तरी अनेकांच्या पायाखालची जमीन सरकते. कॅन्सर असल्याचं निदान झाल्यास आता मृत्यू अटळ असं मानून अनेक जण जगण्याची आशाच सोडून देतात. कॅन्सरचे विविध प्रकार आहेत. त्यातील एक म्हणजे आतड्यांचा कॅन्सर. वैद्यकीय भाषेत याला कोलोरेक्टल कॅन्सर (colorectal cancer) असं म्हणतात.

आतडं हा पचनप्रणालीचा एक महत्त्वाचा भाग आहे. शरीरातील पोषक घटक, खनिजं आणि पाणी शोषण्याचं कार्य ते करतं. बदलती जीवनशैली आणि चुकीच्या सवयींमुळे आतड्यांवर दुष्परिणाम होतो. परिमाणी आतड्यांचा कॅन्सर होतो. मोठ्या आतड्यांचा कॅन्सर हा आतड्याच्या आतील आवरणापासून सुरू होऊन पुढे पसरतो. आतड्यांमध्ये गाठी तयार होतात. काही वेळेला मोठ्या आतड्यांमध्ये लहान गाठी दिसून येतात. त्या सुरुवातीला कॅन्सरच्या नसतात. मात्र अनेक वर्षे त्या आतड्यामध्ये राहिल्यास त्याचं रूपांतर कॅन्सरच्या गाठींमध्ये होऊ शकते.

कोलोरेक्टल कॅन्सरची लक्षणं

बद्धकोष्ठता

गुदाशयातील रक्तस्त्राव

पोटदुखी

वारंवार गॅस होणं

काळा किंवा गडद रंगाचा मल

अशक्तपणा

मुंबईतील अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलचे कोलोरेक्टल सर्जन डॉ. प्रवीण गोरे यांनी सांगितलं, "कोलोरेक्टल कॅन्सर आणि मूळव्याधाची लक्षणं जवळपास सारखी आहेत. बद्धकोष्ठता, आतड्यांमधील रक्त, गुदाशयातील रक्तस्त्राव, पोटदुखी, वारंवार गॅस होणं, काळा किंवा गडद रंगाचा मल तसंच अशक्तपणा यासारखी लक्षणं दिसल्यास मूळव्याधाचा त्रास आहे, असं म्हणून दुर्लक्ष न करता मोठ्या आतड्याचा कर्करोग तर नाही ना याची खात्री करून घेणं आवश्यक आहे"

हे वाचा - लॉकडाऊनमध्ये पोटदुखी, अपचनावर महिलेनं घरीच केले उपचार; काय परिणाम झाला पाहा

वेळीच निदान आणि उपचार झाल्यास रुग्ण बरा होऊ शकतो, असं कॅन्सर तज्ज्ञांनी सांगितलं. कोनोस्कोपीसारख्या वैद्यकीय चाचणीद्वारे याचं निदान होतं. वेळीच निदान झालं तर वैद्यकीय उपचारांनंतर आतड्यांचा कॅन्सर बरा होऊ शकतो.

"केवळ प्रौढच नव्हे तर तरुणांनाही कोलोरेक्टल कॅन्सर असल्याचे निदान झालं आहे. याला कारणीभूत गोष्टी म्हणजे अनियमित वेळापत्रक, खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि व्यस्त जीवनशैली. योग्य निदानासाठी आणि उपचारांच्या या क्षेत्रातील तज्ञ डॉक्टरांची मदत घेणं फायदेशीर ठरेल", असं डॉ. गोरे यांनी सांगितलं.

कोलोरेक्टल कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी काय कराल?

जीवनसत्त्वं, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्सयुक्त आहार घ्यावा.

आहारात फळं आणि भाज्यांचा समावेश करा.

जंक फूड, खारट, मसालेदार आणि तेलकट पदार्थांचे सेवन टाळा, विशेषत: ज्यात प्रिझर्व्हेटिव्ह्ज आहेत अशा पदार्थांपासून लांबच राहा.

हे वाचा - Appendix च्या ऑपरेशननंतरची काळजी; काय करावं आणि काय नाही वाचा

मद्यपान आणि धूम्रपान टाळा.

व्यायामाला महत्त्व द्या. कोणताही व्यायाम सुरू करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

वजन नियंत्रणात ठेवा.

कौटुंबिक इतिहासात जर कोलोरेक्टल कॅन्सर असल्यास नक्कीच स्वतःची तपासणी करा

Published by: Priya Lad
First published: September 16, 2020, 12:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading