नवी दिल्ली, 18 डिसेंबर : जगभरात पसरलेल्या ‘कोविड 19’च्या (Covid 19) महासाथीमुळं (Pandemic)2020 वर्ष वेगळं ठरलं आहे. नवीन वर्ष आलं की नव्या वर्षात प्रत्येकाला आपली स्वप्न, इच्छा पूर्ण करण्याची आशा वाटत असते. हे वर्ष माझं आहे, अशी प्रत्येकाची भावना असते; पण 2020 मात्र वेगळं ठरलं. वर्षाची सुरुवात झाली न झाली तोच कोरोना विषाणूचा (Corona Virus)प्रादुर्भाव झाला आणि अल्पावधीत त्यानं अवघ्या जगाला विळखा घातला. सगळीकडं लॉकडाउन (Lockdown) झालं, लोक घरातच बंदिस्त झाले. घरातूनच काम, आवश्यक सेवा सुरू, कमीत कमी बाहेर जाणं, मास्क वापरणं, सॅनिटायझर वापरणं, हात धुणं अशा बंधनांमध्ये आयुष्य बांधलं गेलं. मास्क, सॅनिटायझर हे आपल्या दैनंदिन जीवनातील घटक बनलं. सगळ्या जगाला हवालदिल करणाऱ्या या वर्षाचं वर्णन करणारा एक मीम व्हिडिओ सध्या प्रसिद्ध झाला आहे. हा आहे कॉफीन डान्सचा (Coffin Dance) व्हिडिओ.
Google ने सुद्धा या Video चा समावेश त्यांच्या Year In Search 2020 मध्ये केला आहे.
घाना (Ghana) या आफ्रिकन देशामध्ये असा समज आहे की, अंत्यसंस्कारावेळी शवपेटी घेऊन नृत्य केल्यानं मृताच्या आत्म्याला आनंद होतो. त्यामुळं घानामध्ये मृत व्यक्तीचे अंतिम संस्कार (Funeral) करताना अत्यंत शानदारपणे वाजत गाजत, नृत्य करून केले जातात. त्यासाठी तिथं खास ग्रुप आहेत. जे अंत्यसंस्काराच्या वेळी नृत्य, संगीत सादर करतात. कॉफीन घेऊन नृत्य (Dance) करतात. नाना ओटाफ्रिजा पॅलबिअरिंग (Nana Otafrija ) आणि वेटिंग सर्व्हिसेस (Waiting Services) हे दक्षिण घानामधील (South Ghana)अंत्यसंस्कारावेळी नृत्य करणारे ग्रुप प्रसिद्ध आहेत.
अशाच एका गटाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात अंत्यसंस्काराप्रसंगी (Funeral) घालायच्या काळ्या पोशाखातील सहा लोक कॉफीन घेऊन डान्स करत आहेत. याचे मिम बनवून लोक स्वतःचे वेगळे व्हिडिओही पोस्ट करत आहेत.
2015 मध्ये एका महिलेनं आपल्या सासूच्या (Mother in Law) अंत्यसंस्कारावेळी एका ग्रुपनं केलेल्या नृत्याचा व्हिडिओ शेअर केला होता. फेब्रुवारी 2020 मध्ये पुन्हा हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. या वर्षांनं दिलेलं दुःख, वेदना विसरून पुढे जाण्याचा सकारात्मक संदेश हा व्हिडिओ देत आहे. अनेक लोक या व्हिडिओचे स्वतःच्या शैलीत रुपांतर करून नवीन व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर शेअर करत आहेत.
या महाभयंकर साथीच्या काळात अहोरात्र रुग्णांच्या सेवेत झोकून दिलेल्या डॉक्टर, आरोग्य सेवक आणि अन्य लोकांप्रती घानामधील कॉफीन डान्सर्सनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. नाना ओटाफ्रीजा (Nana Otafrija) या ग्रुपने ‘डॉक्टर्स आणि मेडिकल वर्कर्स साठी’ (Doctors and Medical Workers)असं म्हणून इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यालाही लोकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.