मुंबई, 9 नोव्हेंबर : सध्या स्वयंचलित दुचाकी वाहनांचा बोलबाला असला तरी सायकल (Bicycle) हा सर्वसामान्यांच्या जगण्याचा भाग आहे. लहान मुलांमध्ये तर सायकलची आवड प्रचंड असते. मैदानात, अंगणात तर कधी गच्चीवरही मुलं सायकल चालवताना दिसून येतात. लहान मुलांकडून सायकलची काळजी मात्र तेवढ्या प्रमाणात घेतली जात नाही. त्यामुळे सायकलवर गंज (Rust) चढतो. काही पालक काही वर्षांनी नवी सायकल खरेदी करतात. मात्र प्रत्येकालाच ते शक्य नसतं. सायकलवर गंज चढला असेल तर जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही. सायकलवरचा हा गंज घरातच उपलब्ध असलेल्या काही गोष्टींचा वापर करून अगदी सहज काढता येऊ शकतो. जाणून घेऊ या काही खास टिप्स (Tips).
लिंबू आणि बेकिंग सोड्याचा वापर
घराच्या साफसफाईमध्ये बेकिंग सोडा फार उपयुक्त ठरतो. बेकिंग सोड्यात असलेले एक्सफोलिएटिंग गुणधर्म वस्तू स्वच्छ ठेवण्यासाठी काम करू शकतात. बेकिंग सोड्यामध्ये लिंबाचा रस मिसळल्यास गंज काढून टाकता येतो. यासाठी तुम्हाला सर्वांत प्रथम पाणी गरम करावं लागेल. गरम पाण्यात बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस मिसळून मिश्रण तयार करायचं आणि गंजलेल्या भागावर लावून काही काळ तसंच ठेवावं. काही वेळानंतर, ब्रश किंवा टूथब्रशने घासून स्वच्छ करावं. शेवटी सायकल स्वच्छ पाण्याने स्वच्छ धुवावी. असं केल्यास सायकल एकदम नवीकोरी दिसेल.
एरोसोलचा वापर
सायकलवरचे डाग घालवण्यासाठी, तिला चमकवण्यासाठी एरोसोलचा (Aerosol) वापर केला जातो. गंजाचे डाग एरोसोलने सहज काढता येतात. यासाठी तुम्हाला एरोसोल एका स्प्रेच्या बाटलीत भरावं लागेल आणि ते गंजलेल्या भागावर शिंपडायचं. काही वेळ ते तसंच ठेवायचं आणि नंतर सायकल स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची. याने सायकलवरचा गंज संपूर्ण साफ होतो.
लिंबू आणि मीठ
लिंबाचा (Lemon) रस मीठातले (Salt) क्रिस्टल्स सक्रिय करतो. याने गंज मऊ होतो आणि काढणं सोपं जातं. गंज काढण्यासाठी तुम्ही लिंबू, मीठ वापरू शकता. यासाठी मीठ आणि लिंबाच्या रसाचं मिश्रण तयार करायचं. जाडसर पेस्ट करून सायकलच्या गंजलेल्या जागेवर लावावी. ते तसंच दोन ते तीन तास ठेवावं आणि सायकल पुसून घ्यावी. ही पद्धत वापरल्यास सायकलवरचा गंज नाहीसा होतो.
अॅल्युमिनियम फॉइल आणि पांढरं व्हिनेगार
अॅल्युमिनियम फॉइल (Aluminium Foil) आणि पांढरं व्हिनेगार (white vinegar) वापरून सायकलवरचा गंज सहज काढला जाऊ शकतो. पांढरं व्हिनेगार गंज काढून टाकण्याचे काम वेगानं करतं. यासाठी, व्हिनेगार स्प्रे बाटलीमध्ये भरून गंजलेल्या भागावर त्याची फवारणी करावी आणि अॅल्युमिनियम फॉइल व्हिनेगारवर लावायची. हे असेच काही काळ ठेवायचं. यानंतर जोपर्यंत गंज साफ होत नाही, तोपर्यंत ब्रशने तो घासावा. यास थोडा वेळ लागू शकतो. परंतु असं केल्यास काही वेळात गंज साफ होताना तुम्हाला दिसून येईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.