नवी दिल्ली 23 ऑक्टोबर : ऋतू कोणताही असो, चहा (Tea) प्यायल्याशिवाय बहुतांश जणांच्या दिवसाची सुरुवात होत नाही. शिवाय दिवसभरातही अनेकदा चहा प्यायल्याशिवाय तल्लफ जात नाही. एखाद्याची भेट झाली, तर ‘चला चहा घेऊ...’ हे वाक्य संवादादरम्यान हमखास येतं. चहा हा पाहुणचाराचा साधा-सोपा पर्याय असतो. सकाळी सकाळी चहाचा एक घोट स्वर्गसुख देऊन जातो; पण ज्या चहाने तुम्ही दिवसाची सुरुवात करता तो चहा खरंच किती शुद्ध (Pure Tea) आहे, हे तुम्हाला माहिती असतं का? तो भेसळयुक्त (Tea Adulteration) तर नाही ना? बाजारात मिळणाऱ्या कितीतरी पदार्थांमध्ये भेसळ असते, तशीच चहा पावडरमध्येही असू शकते. 'झी न्यूज'ने याबाबतची माहिती दिली आहे.
ठरावीक प्रमाणात चहा प्यायल्याने आरोग्याला फायदा होतो, हे विविध अभ्यासांमधून समोर आलं आहे. चहामध्ये फ्लेव्होनॉइड्स (Flavonoids) आणि अँटीऑक्सिडंट्स (Antioxidants) असतात. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. चहा पिणं हे कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी आणि रक्तवाहिन्यांचं कार्य सुधारण्यासाठीदेखील उपयुक्त आहे. परंतु चहा भेसळयुक्त असेल तर हे फायदे मिळणार नाहीत. शिवाय त्रासही होईल. त्यामुळे चहामध्ये भेसळ आहे किंवा नाही हे तपासणं महत्त्वाचं आहे. काही रंगीत पदार्थ आणि खराब झालेली चहा पावडर मिसळून चहा पावडरमध्ये भेसळ करतात. त्यामुळे तोंडाची चव तर खराब होतेच, पण आरोग्यावरही दुष्परिणाम होतो. तुम्हालाही चहा प्यायला आवडत असेल, तर चहाची शुद्धता कशी तपासायची याची माहिती घेण्यासाठी काही सोप्या टिप्स फॉलो करा.
चेहऱ्यावर Ice Cube चा वापर करताना या चुका अजिबात करू नका, होतील उलट परिणाम
चहामधील भेसळ कशी ओळखावी, याबाबतची माहिती फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑथोरिटी ऑफ इंडियाने (FSSAI) ट्विटद्वारे करून दिली आहे. त्याची कृती जाणून घेऊया
सर्वप्रथम एक फिल्टर पेपर घ्यावा. चहाची पावडर त्या फिल्टर पेपरवर पसरवून ठेवावी. त्यावर थोडे पाणी शिंपडावं, जेणेकरून फिल्टर पेपर ओला होईल. त्यानंतर फिल्टर पेपर पाण्यात धुवावा. त्यामुळे चहाची पावडर निघेल आणि चहा पावडरमध्ये भेसळ असेल तर तुम्हाला फिल्टर पेपरवर डाग दिसतील. चहाची पावडर खराब असल्यास फिल्टर पेपरचा रंग तपकिरी किंवा काळा होऊ शकतो. चहा पावडर शुद्ध असेल तर फिल्टर पेपरवर कोणताही डाग दिसणार नाही.
स्वयंपाक घरातील गॅस वाचवण्याच्या या आहेत सोप्या टिप्स; खर्चात होईल मोठी बचत
चहा पावडरमध्ये वापरलेल्या पावडरची भेसळही केली जाते. त्याचबरोबर प्रक्रिया केलेल्या पदार्थांची आणि रंगांची भेसळही चहा पावडरमध्ये केली जाते. यामुळे यकृताचे विकार आणि आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. चहा ठराविक प्रमाणात प्यायल्यामुळे त्याचे आरोग्याला फायदे होऊ शकतात; पण भेसळयुक्त चहा प्यायल्यामुळे आरोग्यावर अनेक विपरीत परिणाम होत असतात. त्यामुळे आपण भेसळयुक्त चहाचे सेवन तर करीत नाही ना, हे प्रत्येकाने तपासण्याची गरज आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Tea, Tea drinker