नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर: चहा हे भारतातील सर्वांत लोकप्रिय पेय आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन गेल्या काही वर्षांमध्ये अनेक उच्चशिक्षित तरुणांनी चहाचा व्यवसाय सुरू केला आहे. काही वर्षांपूर्वी एक 'एमबीए चायवाला' सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्यानंतर बिहारची राजधानी असलेल्या पाटण्यातील एक 'आयआयटीयन चायवाला'ही प्रसिद्धीच्या झोतात आला होता. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत पाटण्यातील वुमन्स कॉलेजसमोर प्रियंका गुप्ता नावाच्या मुलीनं 'ग्रॅज्युएट चायवाली' या नावानं चहाविक्री सुरू केली होती. आता या यादीमध्ये आणखी एका तरुणाचा समावेश झाला आहे. विशेष म्हणजे प्रेमात फसवणूक झाल्यामुळे हा तरुण चहाविक्रीच्या व्यवसायामध्ये आला आहे. मध्य प्रदेशातील राजगड येथील अंतर गुर्जर नावाच्या तरुणानं 'एम बेवफा चायवाला' नावानं चहाविक्री सुरू केली आहे. प्रेमात फसवणूक झाल्यानंतर अनेकजण चुकीचं पाऊल उचलतात. मात्र, अंतर गुर्जर याला अपवाद ठरला आहे. ‘आज तक’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
अंतर गुर्जरनं खिलचीपूर नगर बस स्थानकाजवळ 'M बेवफा चायवाला' नावाचं दुकान सुरू केलं आहे. त्याच्या माजी प्रेयसीचं नाव 'एम' अक्षरानं सुरू होतं. तिला चिडवण्यासाठी आणि ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्यानं आपल्या दुकानाचं नाव 'M बेवफा चायवाला' असं ठेवलं आहे. प्रेमात फसवणूक झालेल्या व्यक्तींना या दुकानात स्वस्त चहा मिळतो. प्रेमात असलेल्यांसाठी चहाची किंमत दुप्पट आहे. दुकानाचं नाव आणि दुकानातील चहा ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे. रिलेशनशीपमध्ये असलेल्यांना 10 रुपयांना तर ब्रेकअप झालेल्यांना पाच रुपयांना चहा मिळतो. अंतर गुर्जर चहा विकण्यासोबतच सध्या बीएच्या शेवटच्या वर्षांत शिक्षण घेत आहे.
हेही वाचा - 'या' कारणांमुळे शरीरात रक्तस्राव होऊ शकतो, लक्षणांकडे करु नका दुर्लक्ष
दुकानाला 'एम बेवफा चायवाला' नाव देण्याचं कारण विचारल्यावर त्यानं आपली 'लव्हस्टोरी' उघड केली. तो म्हणाला, "पाच वर्षांपूर्वी लग्न समारंभासाठी आलेल्या एका मुलीशी माझी भेट झाली. ती मुलगी एका नातेवाईकाच्या लग्नासाठी आली होती. पहिल्या भेटीतच दोघांची मैत्री झाली. जवळपास दीड वर्षे एकमेकांशी फोनवर बोलणं झालं." एकाच समाजाचे असल्यानं लग्नात कोणताही अडथळा येणार नव्हता. अंतरनं आपल्या प्रेयसीसोबत लग्न करण्याची सुंदर स्वप्नंही पाहिली होती. पण, प्रेयसीनं दुसऱ्याच मुलाशी लग्न केल्यानं अंतरची स्वप्नं भंगली. अंतर काहीही काम करत नाही, हे कारण देऊन तिनं त्याच्याशी लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला होता. तिनं त्याच्याशी बोलणंही बंद केलं होतं.
अंतरला प्रेमात झालेली फसवणूक सहन झाली नाही. त्यानं आवेशात ब्लेडनं आपल्या प्रेयसीच्या नावाचं पहिलं अक्षर 'एम' हातावर व छातीवर लिहिलं. एकेदिवशी त्यानं आत्महत्या करण्याचाही विचार केला. मात्र, त्याच्या एका मित्रानं त्याची समजूत घातली आणि स्वत:ला सिद्ध करून दाखवण्यासाठी प्रोत्साहन दिलं.
प्रेमात फसवणूक झाल्यानंतर दीड वर्षानंतर अंतर गुर्जरनं चहाचं दुकान सुरू केलं. जेव्हा अंतर रिलेशनशीपमध्ये होता तेव्हा त्याच्या प्रेयसीनं त्याच्याकडून वचन घेतलं होतं. त्या वचनानुसार त्यांनं तिच्याच नावातील सुरुवातीच्या अक्षरावरून दुकानाचं नाव सुरू केलं, अशी त्याची कहाणी आहे या चहावाल्याची.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.