अजूनही संपली नाही शेकडो वर्षांपूर्वीची महासाथ; 102 वर्षे जुन्या व्हायरसशी लढा सुरूच

अजूनही संपली नाही शेकडो वर्षांपूर्वीची महासाथ; 102 वर्षे जुन्या व्हायरसशी लढा सुरूच

1918 साली उद्रेक झालेल्या या विषाणूचं रूप बदलत गेलं आणि त्याची मनुष्याचा जीव घेण्याची क्षमता कायम राहिली.

  • Share this:

मुंबई, 14 डिसेंबर : कोरोनाव्हायरसच्या महासाथीला (corona pandemic) एक वर्ष झालं. ही महासाथ कधी संपेल याची प्रत्येक जण वाट पाहतो आहे. मात्र तुम्हाला माहिती आहे का 102 वर्षांपूर्वी जी महासाथ आली होती ती अजूनही कायम आहे. त्या व्हायरसचा अजूनही पूर्णपणे नाश झाला नाही. ही महासाथ म्हणजे स्पॅनिश फ्लू (spanish flu).  100 वर्षांपूर्वी जेव्हा स्पॅनिश फ्लूची वैश्विक साथ आली होती, तेव्हा 5 ते 10 कोटी जणांचे प्राण गेले होते. 1918 ते 1920च्या दरम्यान फैलावलेल्या महासाथीमध्ये जगभरातल्या एक तृतीयांश लोकसंख्येला लागण होईपर्यंत भीषण रूप धारण केलं होतं. त्या दोन वर्षांत जगभरातले सुमारे 50 कोटी लोक बाधित झाले होते. 1918 मध्ये फैलावलेली फ्लूची साथ 102 वर्षांनंतरही कायमची संपलेली नाहीच.

गेल्या वर्षभरात कोरोना विषाणूची लागण 7.12 कोटी लोकांना झाली असून, 16 लाख जणांचा मृत्यू झाला आहे. H1N1 विषाणूमुळे होणाऱ्या स्पॅनिश फ्लूमध्ये अमेरिकेत जीवनमान 12 वर्षांनी घटत असल्याचं निरीक्षण आहे. हा विषाणू अन्य वेगवेगळ्या प्रकारच्या साथींवेळी सक्रिय झालेला पाहायला मिळतो. याचाच अर्थ असा, की 102 वर्षं जुन्या असलेल्या या विषाणूमुळे आतापर्यंत झालेल्या मृत्यूंची संख्या एकत्र केली, तर ती खूप मोठी होईल. आतापर्यंत पसरलेल्या जागतिक महामारीपैकी सर्वांत भयानक असलेला स्पॅनिश फ्लू रूप बदलून कसा समोर येत राहिला?

तिसऱ्या लाटेनंतर महामाथ थांबली होती?

स्पॅनिश फ्लूचा फैलाव झाल्यानंतर 12 महिन्यांच्या आत प्रादुर्भावाच्या तीन लाटा पाहायला मिळाल्या होत्या. पहिल्या जागतिक महायुद्धाच्या दरम्यान 1918च्या अखेरच्या दिवसांत या विषाणूने सर्वांत भयंकर रूप धारण केलं होतं. सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळात मृतांची संख्या मोठी होती. मग 1919मध्ये तिसऱ्या लाटेनंतर ही साथ किंवा विषाणू नष्ट झाला होता का? तज्ज्ञांच्या मते, या प्रश्नाचं उत्तर ‘नाही’ असं आहे.

हा विषाणू सगळ्या जगभरात पसरला होता. त्यामुळे त्यासाठीची विशेष अशी प्रतिकारशक्ती विकसित झाली आहे; पण या विषाणूची 1918मध्ये जी ‘स्ट्रेन’ (Strain) होती, त्यात ‘अँटिजेनिक ड्रिफ्ट’ (Antigenic Drift) या प्रक्रियेद्वारे सातत्याने म्युटेशन (Mutation) (जनुकीय बदल) होत राहिलं. 1918च्या स्पॅनिश फ्लूच्या (Spanish Flu) विषाणूची नवी रूपं 1919-1920 आणि 1920-1921मध्ये फैलावलेल्या फ्लूच्या साथीमध्ये, तसंच सीझनल फ्लूमध्येही दिसत राहिली. हाच विषाणू वेगवेगळ्या महामारी पसरलेल्या असताना नव्या रूपांत समोर येत राहिला.

विषाणूचा 100 वर्षांचा प्रवास

दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतर जेव्हा सीझनल फ्लूसाठी (Seasonal Flu) लस आली, तेव्हा जगभरातल्या लोकांना वाटलं, आता आपण मोकळा श्वास घेऊ शकू. तेव्हापासून या विषाणूचं रूप बदलत गेलं आणि त्याची मनुष्याचा जीव घेण्याची क्षमता कायम राहिली. 1918च्या स्पॅनिश फ्लूला H1N1 विषाणू (Virus) कारणीभूत होता. त्याने रूप बदललं आणि 1957मध्ये जगाला बर्ड फ्लूचं (Bird Flu) संकट पहिल्यांदा दिसलं. त्या वेळी तो विषाणू H2N2 या नावाने ओळखला गेला.

हे वाचा - आनंदाची बातमी! भारतात ट्रायल सुरू असलेली कोरोना लस ठरली 100% प्रभावी

या बर्ड फ्लूने लाखो जणांचे प्राण घेतले. त्यावर जगभरात संशोधन सुरू होतं, तोपर्यंत 10 वर्षांत म्हणजे 1968मध्ये पुन्हा लाखो जणांचे प्राण घेणारी हाँगकाँग फ्लू (Hong Kong Flu) महामारी दाखल झाली. त्या वेळी त्या विषाणूचं नाव H3N2 असं होतं. तो विषाणू म्हणजे 1918च्या विषाणूचंच आधुनिक रूप होतं. त्यानंतरही त्या विषाणूचा प्रवास थांबला नाही, तर 21व्या शतकातही तो सुरूच राहिला. 2009मध्ये जी स्वाइन फ्लूची (Swine Flu) वैश्विक साथ (Pandemic) आली, त्यामागेही 1918चाच विषाणू कारणीभूत होता. बर्ड फ्लू रूपात असलेल्या या विषाणूची डुकरांना लागण झाली आणि त्यांच्या माध्यमातून तो स्वाइन फ्लू होऊन मनुष्यांमध्ये फैलावला. 2009च्या या महामारीमध्ये सुमारे तीन लाख जणांचा जीव गेला आणि अजूनही त्यामुळे अनेकांचे प्राण जात आहेत. आता प्रश्न असा आहे, की विषाणू आपलं रूप बदलतो तरी कसं?

तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे, की कोणत्याही प्राण्याला एकाच वेळी दोन प्रकारच्या एन्फ्लुएंझा विषाणूची लागण झाली, तर त्या वेळी जीन्स (Genes) अशा तऱ्हेने मिसळली जातात, की नव्याच पद्धतीचा विषाणू पुढे येतो. त्याचं अस्तित्व त्यापूर्वी कधीच नसतं. उदा. 1918च्या फ्लूचं डुकरांमध्ये संक्रमण होऊन नंतर त्यातून पुढे स्वाइन फ्लू तयार झाला.

हे वाचा - आनंद गगनात मावेना! देश कोरोनामुक्त झाला आणि चक्क पंतप्रधानच नाचल्या

1918नंतर ही प्रक्रिया निरंतर होत आहे. आता तुमच्या लक्षात येईल, की 1918च्या एन्फ्लुएंझाच्या मृतांचा आकडा केवळ त्या वेळचा नाही, तर विषाणूचं रूप बदलल्यामुळे फैलावणाऱ्या महामारींमध्ये तो आकडा वाढतोच आहे.

जेफरी टॉबेनबर्गर (Jeffery Tobenberger) यांचं या बाबतीतलं संशोधन उल्लेखनीय आहे. 1918ची साथ पसरवणाऱ्या या विषाणूच्या बाबतीतल्या अनेक गोष्टी त्यांनी 90च्या दशकात शोधून काढल्या. आता ते अमेरिकेच्या नॅशनल हेल्थ इन्स्टिट्यूटच्या विषाणूसंदर्भातल्या संस्थेचे प्रमुख आहेत. कोविड-19च्या (COVID 19) संदर्भातही टॉबेनबर्गर म्हणतात, की आपण 102 वर्षांनंतरही आज 1918च्या महामारीच्या काळातच जगत आहोत.

थोडक्यात, टॉबेनबर्गर यांच्या म्हणण्यानुसार, आपल्याला सीझनल फ्लू झाला, तरी त्या विषाणूचा जनुकीय अभ्यास केल्यावर त्याचा 1918च्या विषाणूशी काय संबंध आहे ते दिसेल. गेल्या 102 वर्षांत होत असलेल्या एन्फ्लुंएझाच्या प्रत्येक संक्रमणात कोणत्या ना कोणत्या रूपाने 1918च्या विषाणूचाच सहभाग आहे, असं त्यांचं म्हणणं आहे.

Published by: Priya Lad
First published: December 14, 2020, 11:00 PM IST

ताज्या बातम्या