मुंबई, 6 फेब्रुवारी : परफ्युम आणि डिओड्रंट या अनेकांच्या दैनंदिन आयुष्यातील अविभाज्य गोष्टी आहेत. घराच्या बाहेर पडताना बहुतांश व्यक्ती यांचा वापर करतात. मात्र मनमोहक सुंगध असणाऱ्या या दोन्ही वस्तू जीवघेण्या ठरू शकतात, असं निदर्शनास आलं आहे. डिओड्रंटमधून (डिओ) निघणारा धोकादायक वायू श्वासननलिकेत गेल्यानं ब्रिटनमधील एका मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
14 वर्षांच्या जॉर्जियानं एरोसोल डिओड्रेंटचा वास घेतल्यानंतर कार्डिअॅक अरेस्टनं तिचा मृत्यू झाला. जॉर्जियाच्या पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, ती ऑटिस्टिकदेखील (स्वमग्न) होती. खोलीत डिओ फवारल्यानंतर तिला चांगलं वाटायचं. जॉर्जियाच्या मृत्यूनंतर परफ्युम आणि डिओड्रंट खरंच जीवघेणे असतात का? त्यांच्या वापरामुळे आजार होऊ शकतात का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. 'दैनिक भास्कर'नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
सतत येणाऱ्या थकव्याकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, 'या' कॅन्सरचे असू शकते लक्षण
सर्वात अगोदर परफ्युम आणि डिओड्रंटमध्ये काही फरक आहे का? हे जाणून घेणं गरजेचं आहे. परफ्युममध्ये डिओपेक्षा इसेन्सचं प्रमाण जास्त असतं. सामान्य परफ्युममध्ये 25 टक्क्यापर्यंत इसेन्स असू शकतो. तुम्ही कोणत्या श्रेणीतील परफ्युम खरेदी करत आहात यावर ते अवलंबून आहे. जर तुम्ही स्ट्राँग इसेन्स असलेलं परफ्युम वापरत असाल तर त्याचा सुगंध बराच काळ टिकेल. त्याच्या फक्त एका स्प्रेमुळे तुम्हाला दिवसभर सुगंध मिळू शकेल. डिओमध्ये इसेन्सचं प्रमाण कमी असतं. काही वेळा त्याचं प्रमाण केवळ दोन ते तीन टक्के इतकंच असतं. त्यामुळे त्याचा सुगंध जास्त काळ टिकत नाही पण घाम येत नाही. शरीराच्या दुर्गंधीचं सर्वांत मोठं कारण म्हणजे घाम येणं. डिओ दुर्गंधाला प्रतिबंध घालतो आणि त्यात असलेला अँटिपर्स्पिरंट घटक घाम रोखतो.
डिओड्रंटमध्ये असलेल्या एरोसोलमध्ये विषारी रसायनं आणि वायू असतात. हे घटक मृत्यूसाठी कारणीभूत ठरू शकतात. केवळ लहान मुलंच नाही तर प्रौढ व्यक्तीही त्याचे बळी ठरू शकतात. एरोसोल हे वायूच्या स्वरूपात घन आणि द्रव कण यांचे मिश्रण आहे. हे नैसर्गिक आणि कृत्रिम दोन्ही प्रकारचं असू शकतं. सोप्या शब्दांत सांगायचं झाल्यास धुकं हे एक नैसर्गिक एरोसोल आहे, तर समुद्रावरील हवा एक कृत्रिम एरोसोल आहे.
डिओच्या वापरामुळे, खाज येणं, पिग्मेंटेशन, रॅशेस, श्वास घेण्यास अडचण आणि स्वेट ग्लँडमध्ये ब्लॉकेज होणं, यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. इनसाइट ऑफ द कन्झ्युमर एज्युकेशन अँड रिसर्च सोसायटी (सीईआरएस) या मासिकात प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, काही डिओ किंवा अँटीपर्स्पिरंट्स त्वचा, डोळे आणि यकृताला हानी पोहोचवू शकतात. त्यात मिसळलेल्या काही रसायनांमुळे अल्झायमर आणि कॅन्सरसारखे आजारही होऊ शकतात. फुफ्फुस आणि यकृताचं नुकसान होऊ शकतं. यूएस एफडीएच्या म्हणण्यानुसार, किडनीच्या आजाराने ग्रस्त लोकांसाठी डिओचा नियमित वापर धोकादायक ठरू शकतो. त्यात वापरलेले अॅल्युमिनियम त्यांच्यासाठी खूप घातक ठरू शकते.
युनिव्हर्सिटी ऑफ रोचेस्टर मेडिकल सेंटरच्या अहवालानुसार, एरोसोल स्प्रे किंवा सॉल्व्हंट्समध्ये असलेल्या रसायनांचा दीर्घकाळ वास घेतल्याने हृदयाच्या समस्या उद्भवू शकतात. जेव्हा तुम्ही मोठ्या प्रमाणात केमिकलचा वास घेता तेव्हा गुदमरल्यासारखं होतं आणि एखाद्या व्यक्तीचा जीव जातो. 1990 मधील एका ई-मेल लेटरमधील माहितीनुसार, बाजारात विकल्या जाणार्या सामान्य डीओचा वापर केल्यानं स्तनाचा कॅन्सर होऊ शकतो. अमेरिकन कॅन्सर सोसायटीनं हे चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. हार्वर्ड मेडिकल स्कूलमधील वैद्यकशास्त्राचे प्राध्यापक डॉ. हॅरॉल्ड बर्स्टीन यांचंही मत आहे की, डिओमुळे कॅन्सर होत नाही. ते म्हणतात की, कॉमन डीओ (अँटीपर्सपिरंट) वापरल्यानं स्तनांचा कर्करोग होऊ शकतो असा आजपर्यंत कोणताही पुरावा आढळलेला नाही.
डिओचा योग्य वापर कसा करावा?
अंघोळ केल्यानंतर लगेचच डिओ लावू नये. ओल्या अंगावर डिओ लावल्यानं त्याचा प्रभाव फार कमी काळ टिकतो. कपड्यांवरतील डिओचा वापर केल्यास काही कालावधीनंतर शरीराची दुर्गंधी जाणवते. त्यामुळे त्वचेवर डिओ वापरला पाहिजे. ज्वेलरी घातल्यानंतर डिओ स्प्रे करू नये. असं केल्यास ज्वेलरी खराब होण्याची शक्यता असते. नेहमी स्वच्छ त्वचेवर डिओचा वापर करावा. घाम आलेल्या त्वचेवर डिओ वापरल्यास त्वचा काळी पडण्याची शक्यता असते. पैसे वाचवण्याच्या नादात स्वस्त डिओ वापरू नयेत. अशा डिओंमुळे अॅलर्जी होण्याची शक्यता असते.
घामाची दुर्गंधी कमी करण्यासाठी खाण्या-पिण्याच्या सवयींमध्ये करा बदल
शरीराच्या दुर्गंधीचा संबंध केवळ स्वच्छतेशीच नाही तर आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींशीदेखील आहे. म्हणून ज्यांना फार घाम येतो ते त्यांच्या आहारात बदल करू शकतात. रिफाइंड साखर, मैदा, वनस्पती तूप यासारखे प्रक्रिया केलेले पदार्थ टाळले पाहिजेत. रेड मीट, अंडी, मासे, बिन्स, तळलेले आणि चरबीयुक्त पदार्थ श्वासाची दुर्गंधी वाढवतात. ते कमी प्रमाणात खाल्ले पाहिजेत. कॅफिन आणि अल्कोहोल टाळलं पाहिजे. तीव्र वासाचे मसाले, लसूण, कांदे जास्त प्रमाणात खाल्ल्यानं शरीरात सल्फर वायू तयार होतो. तो रक्तात विरघळतो आणि फुफ्फुसातून आणि रोम छिद्रांद्वारे बाहेर पडतो. त्याला उग्र वास असतो म्हणूनच ते कमी खा.
Cancer Symptom : नखंही देतात कॅन्सरचे संकेत! हे बदल दिसल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा
घामाची दुर्गंधी थांबवण्यासाठी घरगुती उपाय करा
घामाची दुर्गंधी थांबवण्यासाठी कोरफड, बेकिंग सोडा, तुरटी आणि गुलाबपाण्याचा वापर करू शकता. कोरफड आणि गुलाबपाणी अनेक सौंदर्य प्रसाधनांमध्ये वापरतात. ते त्वचेसाठी अतिशय चांगले असतात. बेकिंग सोडा नॅचरल क्लिंझर आहे. अंघोळीच्या पाण्यात तुरटी किंवा गुलाबपाणी वापरल्यास बँक्टेरिअल फंगससारख्या समस्या टाळता येतात.
(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips, Heart Attack, Lifestyle