मुंबई, 15 जून : कोरोना महामारीच्या काळात अनेकांनी एकटेपणा घालवण्यासाठी प्राण्यांशी मैत्री (Pet Love) केली. अनेकांनी घरात कुत्र्या-मांजरांसारखे प्राणी पाळले. जगात कुत्रे पाळणारी (Pet Dog) माणसं खूप आहेत. दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढतेच आहे. त्यातही अनेकांना बुलडॉग जातीचे कुत्रे आवडतात; मात्र सध्याच्या परिस्थितीमुळे तज्ज्ञांनी या जातीचे कुत्रे न पाळण्याचं आवाहन केलं आहे. या कुत्र्यांपासून माणसाला काहीही धोका नाही, तर या जातीच्या कुत्र्यांनाच धोका निर्माण झाला आहे. कुत्र्यांची ही जात (Dog Breed) सध्या अतिशय संकटात आहे.
तोंडाच्या शेजारून ओघळणारी त्वचा, चपटा चेहरा आणि टोकदार दात यामुळे बुलडॉग जातीचे कुत्रे खूप लोकप्रिय आहेत; मात्र सध्या या जातीच्या कुत्र्यांना (Bulldog Breed In Danger) शारीरिक समस्या उद्भवत आहेत. कुत्र्यांची ही जात जोवर सुधारत नाही, तोवर ब्रिटनमध्ये ते पाळण्यावर बंदी घालण्यात यावी, असं रॉयल व्हेटर्नरी कॉलेजच्या तज्ज्ञांचं म्हणणं आहे. माणसांनी पाळल्यामुळेच या जातीच्या कुत्र्यांची ही अवस्था झाली आहे, असंही त्यांचं म्हणणं आहे. या कुत्र्यांची लोकप्रियता वाढू नये, म्हणून त्यांचे फोटो शेअर करू नका असं आवाहनही केलं जातंय, असं वृत्त '
टीव्ही 9 हिंदी'ने दिलं आहे.
अंदाजे 1600 साली बुलडॉग ही मस्क्युलर आणि अॅथलेटिक प्रकारातली कुत्र्याची जात होती. त्या वेळी बुल फायटिंगसाठी हे कुत्रे वापरले जात होते. ते धोकादायक कुत्रे होते. आता मात्र हे पाळीव कुत्रे बनले आहेत. त्यांच्या काही शारीरिक तक्रारीही सुरू झाल्या आहेत. इतर जातीच्या कुत्र्यांच्या तुलनेत बुलडॉगमध्ये कोणतीही समस्या उद्भवण्याचं प्रमाण दुपटीनं वाढलंय. अन्य जातीच्या कुत्र्यांच्या तुलनेत बुलडॉगमध्ये 38.12 टक्के जोखीम वाढलीय. इतरही काही बाबतींत बुलडॉगमध्ये चिंतेचं कारण आहे.
नॉर्वे आणि नेदरलँड या देशांनी या जातीच्या कुत्र्यांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त करून त्यांच्यावर बंदी घातली आहे. कुत्र्यांच्या या जातीत काही आरोग्यपूर्ण सुधारणा झाल्याशिवाय ते पाळले जाऊ नयेत, याबाबतही विचार सुरू आहे.
पग (Pugs) आणि बुलडॉग (Bulldog) किंवा बॉक्सर्स हे ब्रेकिसेफलिक प्रकारचे कुत्रे असतात. त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण चेहऱ्यामुळे ते ओळखले जातात. सध्या ब्रिटनमध्ये पग्जची लोकप्रियता वाढली आहे. ब्रिटनमध्ये 2005 पासून 2017 पर्यंत या कुत्र्यांच्या लोकप्रियतेत पाच टक्के वाढ झाली आहे; मात्र कुत्र्यांची ही जात संकटात आहे. इतर जातीच्या कुत्र्यांपेक्षा हे कुत्रे अशक्त झाले असल्याचं एका संशोधनात आढळल्याचं बीबीसीच्या एका रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. ब्रिटिश बुलडॉग जातीच्या कुत्र्यांमध्ये श्वास घेण्यास अडचण, डोळ्यांच्या तक्रारी, तसंच त्वचेच्याही तक्रारी वाढताहेत. त्यांच्या शरीराच्या घडणीमध्ये बदल होत असल्याचं तज्ज्ञांना वाटत आहे. या जातीचे कुत्रे सध्या संकटात आहेत.
पग्ज हे नाजूक प्रकारचे कुत्रे असतात. इतर कुत्र्यांच्या तुलनेत त्यांचं आजारी पडण्याचं प्रमाण 1.9 टक्के जास्त असतं. त्यांचा मेंदू डोक्यात छोट्या जागेत असतो. इतर काही नाजूक पेशीसमूहसुद्धा खूप छोट्या छोट्या जागेत असतात. त्यामुळे या कुत्र्यांना अनेक अडचणी येतात. श्वासासंबंधीचे, त्वचेसंबंधीचे व पाठीचे आजार या कुत्र्यांना होतात. प्राणी पाळण्याची अनेकांना हौस असते; पण यामुळेच कधीकधी प्राणी संकटात सापडतात. बुलडॉगच्या बाबतीत हेच झालं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.