पाहा विचित्र प्रथेचा VIDEO : रस्त्यावर झोपलेल्या स्त्रियांच्या पाठीवर चालून साधू देतायत मूल होण्याचा आशीर्वाद!

पाहा विचित्र प्रथेचा VIDEO : रस्त्यावर झोपलेल्या स्त्रियांच्या पाठीवर चालून साधू देतायत मूल होण्याचा आशीर्वाद!

अशा प्रकारे पाठीवरून साधू किंवा पुजारी चालत गेले की म्हणे बाई गर्भार राहते. 500 वर्षांची ही परंपरा असल्याचं सांगतात. हा तथाकथित आशीर्वाद बायकांना मूल होण्यास फायद्याचा ठरतो अशी दृढ श्रद्धा इथल्या स्थानिक समाजाची आहे.

  • Share this:

रायपूर, 23 नोव्हेंबर : मूल व्हावं म्हणून नवस, दुवा, अंगारे-धुपारे, पूजा-पाठ, व्रत-वैकल्य करणं आपल्याकडच्या समाजात नवं नाही. पण छत्तीसगडमध्ये लग्न झालेल्या स्त्रिया मूल व्हावं म्हणून साधूंचा आशीर्वाद घेतात आणि तोही एका विचित्र प्रथेच्या माध्यमातून. सोशल मीडियावर सध्या या विचित्र प्रथेचा VIDEO व्हायरल झाला आहे. छत्तीसगढच्या धमतरी जिल्ह्यातील एका विचित्र परंपरेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. धरमतरी इथे दरवर्षी एक जत्रा भरते. त्यामध्ये शेकडो विवाहित महिला रस्त्यावर झोपतात. साधू हातात पताका घेऊन त्यांच्या पाठींवरून चालत जातात. त्यामुळे त्या बायकांना गर्भधारणा होते अशी इथल्या समाजाची मान्यता आहे. पुजाऱ्यांचा किंवा साधूंचा हा तथाकथित आशीर्वाद बायकांना गर्भधारणेला फायद्याचा ठरतो अशी दृढ श्रद्धा इथल्या स्थानिक समाजाची आहे.

न्यू इंडियन एक्स्प्रेसच्या म्हणण्यानुसार, जिल्ह्यातील ‘माढाई मेळा’ (Madhai Fair) या जत्रेत दरवर्षी हा प्रकार होतो. दिवाळीनंतर पहिल्या शुक्रवारी हा मेळा आयोजित केला जातो आणि हजारो भाविक एकत्र येऊन अंगारमोती देवीची प्रार्थना करतात.

स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितलं की, ही प्रथा 500 वर्षांहून अधिक काळ चालू आहे आणि स्थानिकांना या परंपरेच्या सामर्थ्यावर ठाम विश्वास होता. मेळ्याला हजेरी लावल्यानंतर बऱ्याच महिलांना गर्भधारणा झाल्याचा दावाही त्यांनी केला.

व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये, सुमारे 200 महिला हात जोडून जमिनीवर पालथ्या (पोटावर) झोपलेल्या दिसतात. मंत्रोच्चार करत आणि हाती पताका हातात घेऊन दोन साधू त्यांच्या पाठीवरून चालताना दिसत आहेत.

छत्तीसगढ राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा किरणमयी नायक यांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितलं की, "मी अशा प्रथा मानत नाहीत. त्यांचं समर्थनही करत नाहीत. या परंपरा घातक आहेत. असल्या विकृत प्रकारांमुळे महिलांच्या पाठीला कायमस्वरूपी इजा होऊ शकते. गावकऱ्यांना, विशेषत: महिलांना अशा प्रथांमुळे उद्भवणाऱ्या धोक्यांविषयी जागृत करण्यासाठी मी त्या गावाला भेट देणार आहे."

ह्या प्रथेपेक्षा जास्त आश्चर्यकारक आणखी काही तरी होते. मेळ्यात शेकडो लोक उपस्थित होते आणि त्यातील बहुतेक लोक मास्क नसलेले होते. प्रथा पार पडण्यासाठी अनेकजण जमले म्हणून सोशल डिस्टनसिंगचा ही फज्जा उडाला. कोरोना व्हायरस महामारी ज्याने आधीच भारतात हजारो लोकांचा बळी घेतला आहे, त्यात हे असे दृश्य पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. ट्विटरवर अनेकांनी या प्रथेचा व्हिडिओ टाकून त्याच्यावर सणकून टीका केली आहे.

कोरोना व्हायरस (Covid-19) सध्या पाश्चिमात्य देशांमध्ये पुन्हा हाहाकार उडवत आहे. आपल्या देशातही दिल्ली, गुजरातनंतर आता महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वेगाने वाढते आहे. सोशल डिस्टन्सिंग, मास्क असे उपाय सांगितले जात असताना अशा प्रकारे गर्दी करून भरवल्या जाणाऱ्या जत्रांमुळे धोक्याचं प्रमाण वाढत आहे, ही आणखी चिंताजकन गोष्ट.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: November 23, 2020, 6:04 PM IST

ताज्या बातम्या