नवी दिल्ली, 12 मार्च : जगभरात सध्या जुळी मुलं (Twins) जन्माला येण्याचं प्रमाण (Birth Rate) पूर्वीपेक्षा खूपच वाढलं असून, जगभरात दर वर्षी सुमारे 1.6 दशलक्ष जुळ्या मुलांचा जन्म होतो. प्रत्येक 42 मुलांपैकी एक जुळी असतात, असं संशोधकांचं म्हणणं आहे. मुलं होण्यासाठी केला जाणारा उशीर आणि आयव्हीएफसारख्या (IVF) वैद्यकीय तंत्राचा वापर यामुळे 1980 च्या दशकापासून जुळ्या मुलांच्या जन्माचं प्रमाण तिपटीनं वाढलं आहे. परंतु यापुढे हे प्रमाण कमी होऊ शकतं, कारण धोका कमी असल्याने प्रत्येक गरोदरपणात एकच मूल यावर भर दिला जात आहे.
ह्यूमन रीप्रॉडक्शन जर्नलमधील (Human Reproduction Journal) एका अहवालानुसार, गेल्या 30 वर्षांमध्ये सर्वत्र जुळ्या मुलांच्या जन्माचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. आशियात ( Asia) हे प्रमाण 32 टक्क्यांनी, तर उत्तर अमेरिकेत (North America) ते तब्बल 71 टक्क्यांनी वाढलं आहे.
संशोधकांनी 165 देशांमधील 2010 ते 2015 या कालावधीतील जुळ्या मुलांच्या जन्मदराची माहिती एकत्रित केली आणि त्याची तुलना 1980 ते 1985 मधील जन्मदराशी केली. युरोप (Europe) आणि उत्तर अमेरिकेत जुळ्या मुलांची संख्या जास्त असल्याचं आढळलं असून, जगभरात दर हजार जन्मांमागे हे प्रमाण नऊवरून 12 पर्यंत वाढलं आहे. परंतु आफ्रिकेतील जुळ्या मुलांचा जन्मदर नेहमीच जास्त राहिला आहे. गेल्या 30 वर्षांमध्ये त्यात फारसा फरक पडलेला नाही.
मदतीचा हात -
सध्याच्या काळात जगातील 80 टक्के जुळ्या मुलांचा जन्म आफ्रिका आणि आशियामध्ये होतो. ‘आफ्रिकेत जुळ्या मुलांच्या जन्माचं प्रमाण अधिक आहे कारण दोन स्वतंत्र अंड्यातून जन्माला येणाऱ्या डीझीगोटिक जुळ्यांचं प्रमाण तिथं मोठं आहे. आफ्रिकन लोक आणि इतर लोक यांच्यातील अनुवांशिक फरकामुळं हे घडतं, असं ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमधील या अभ्यासाचे लेखक प्रोफेसर क्रिस्टियन मोंडेन यांनी म्हटलं आहे.
युरोप, उत्तर अमेरिका आणि ओशियानिक देशांमधील जुळ्या मुलांच्या जन्मांचं प्रमाण वाढत आहे, कारण तिथं 1970 च्या दशकापासून मुलांच्या जन्मासाठी आयव्हीएफ (IVF), आयसीएसआय (ICSI), कृत्रिम गर्भाधान आदी आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या तंत्रज्ञानामुळे एकापेक्षा जास्त मुलांच्या जन्माची शक्यता वाढते. उशीरा मुल होऊ देण्याचा निर्णय, गर्भनिरोधकांचा वाढता वापर आणि कमी प्रजनन क्षमता याचाही यामध्ये मोठा वाटा आहे, असंही या अहवालात म्हटलं आहे.
‘जुळ्या मुलांच्या प्रसूतीदरम्यान मुलांच्या मृत्यूचं प्रमाण अधिक असतं, तसंच गरोदरपणात, प्रसूती दरम्यान आणि प्रसूतीनंतरही आई आणि मुलांसाठी गुंतागुंत निर्माण होण्याचं प्रमाण जास्त असतं. बहुतेक वेळा जुळी मुलं अकाली जन्म घेतात, जन्मतः त्यांचं वजन अतिशय कमी असतं तरीही त्यांचा जन्मदर जास्त असतो. त्यामुळे आता एकच गर्भधारणा होण्यावर लक्ष दिलं जात आहे, ते अतिशय महत्त्वाचं आहे,’ असं प्रोफेसर मोंडेन यांनी नमूद केलं.
जगण्याची शक्यता -
गरीब आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमधील जुळ्या मुलांचे भवितव्य चिंताजनक असल्याचं या अभ्यासात निष्पन्न झालं आहे. सहारा वाळवंटाशी संलग्न आफ्रिकेमध्ये, अनेक जुळ्या मुलांच्या जोड्या पहिल्या वर्षातच आपल्या भावाला किंवा बहिणीला गमावतात. अशाप्रकारे जीव गमावणाऱ्या मुलांचे प्रमाण वर्षाला सुमारे 2 लाख इतकं प्रचंड आहे. आता अनेक श्रीमंत पाश्चिमात्य देशांमध्ये जुळ्या मुलांच्या जन्माचा दर आफ्रिकेतील देशांच्या आसपास आहे. मात्र या देशांमध्ये जुळी मुलं जगण्याचं प्रमाण खूपच जास्त आहे,’ असं या अभ्यासाचे लेखक प्राध्यापक जेरोइन स्मिट्स यांनी म्हटलं आहे.
भविष्यात भारत (India) आणि चीनमध्ये (China) जुळ्या मुलांच्या जन्माचं प्रमाण अधिक असेल, असं संशोधकांचं म्हणणं आहे. आगामी काळात घटणारी प्रजननक्षमता, वाढत्या वयात मातृत्व स्वीकारण्याकडे कल आणि आयव्हीएफसारख्या तंत्रांचा वापर याचा प्रभाव जुळ्या मुलांच्या संख्येवर दिसून येईल, असं संशोधकांनी या अभ्यासात अधोरेखित केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.